वसिष्ठ ऋषी मंदिर

वडाळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत आणि पौराणिक दंडकारण्याच्या पवित्र भूमीत वडाळी येथे वसिष्ठ ऋषी महादेव मंदिर स्थित आहे. मेहकर परिसरात सप्तर्षींनी स्थापन केलेली जी सात शिवमंदिरे आहेत, त्या शृंखलेत वसिष्ठ महर्षींचे हे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. श्रीरामांचे कुलगुरू आणि ऋग्वेदाचे द्रष्टे असलेल्या वसिष्ठ ऋषींनी मन नदीच्या निसर्गरम्य तीरावर कठोर तपश्चर्या करून येथील शिवलिंगाची स्थापना केली, अशी मान्यता आहे. याच मंदिरापासून मेहकरच्या प्रसिद्ध ‘सप्तर्षी मंदिर परिक्रमे’चा प्रारंभ होतो. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी परिक्रमेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून जातो.

हिंदू खगोलशास्त्रानुसार, आकाशात उत्तर दिशेला सात ताऱ्यांचा जो समूह दिसतो, त्याला ‘सप्तर्षी मंडळ’ असे म्हटले जाते. हे सात तारे म्हणजे सात वैदिक ऋषी होत. लोकश्रद्धेनुसार आणि संशोधनानुसार, आकाशातील या सप्तर्षींच्या स्थानांची हुबेहूब प्रतिकृती मेहकर तालुक्यातील सात गावांमध्ये मंदिरांच्या रूपाने निर्माण करण्यात आली आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण खगोलीय-भौगोलिक रचना मानली जाते. या मंदिरांमध्ये महर्षी वसिष्ठ (वडाळी), महर्षी गौतम (गोमेधर), महर्षी विश्वामित्र (विश्वी), महर्षी पाराशर (पाथर्डी), महर्षी वाल्मिकी (वरवंड), महर्षी बगदालभ्य (देळप-उटी) आणि महर्षी दुर्वास (दुर्गबोरी) यांच्या मंदिराचा समावेश आहे. या सातही मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व मंदिरे महादेवाला समर्पित आहेत व ती त्या-त्या ऋषींनी स्थापित केल्याचे मानले जाते. वडाळीचे मंदिर हे या शृंखलेतील प्रमुख मंदिर आहे. ते वसिष्ठ ऋषींच्या नावाने ओळखले जाते.

वैदिक साहित्य आणि पुराणांमध्ये वसिष्ठ ऋषींना अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे. ते ब्रह्मदेवाचे ‘मानसपुत्र’ मानले जातात. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने आपल्या निश्वासातून (प्राणातून) ज्या पुत्रांना जन्म दिला, त्यापैकी वसिष्ठ एक होते. ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाचे ते द्रष्टे ऋषी आहेत. वसिष्ठ ऋषींची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते इक्ष्वाकू वंशाचे (सूर्यवंशाचे) कुलगुरू होते. राजा दशरथ आणि पुढे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे ते गुरु होते.

पुराणांमधील सर्वात गाजलेला संघर्ष म्हणजे वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील वैर होय. या कथेचे प्रतिबिंब मेहकर तालुक्यातील भौगोलिक रचनेत आढळते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. या कथेनुसार, विश्वामित्र हे एक पराक्रमी क्षत्रिय राजा होते. एकदा ते सैन्यासह वसिष्ठांच्या आश्रमात आले असता वसिष्ठांनी आपली दिव्य गाय ‘कामधेनू’ हिच्या मदतीने संपूर्ण सैन्याचा राजेशाही पाहुणचार केला. कामधेनूच्या या चमत्काराने प्रभावित होऊन विश्वामित्रांनी ती गाय मागितली. परंतु ती ‘हव्यकव्य’ (यज्ञाचे साहित्य) पुरवणारी असल्याने वसिष्ठांनी ती देण्यास नकार दिला. यातून झालेल्या युद्धात विश्वामित्रांचे क्षात्रतेज वसिष्ठांच्या ‘ब्रह्मतेजा’पुढे निष्प्रभ ठरले. या पराभवाने व्यथित होऊन विश्वामित्रांनी घोर तपश्चर्या केली आणि वसिष्ठांशी स्पर्धा सुरू केली. त्यांनी वसिष्ठांच्या शंभर पुत्रांचा नाश केला, तरीही वसिष्ठांनी आपला संयम ढळू दिला नाही. अखेरीस विश्वामित्रांनी आपल्या तपाने ब्रह्मर्षी पद प्राप्त केले आणि वसिष्ठांनी त्यांना ब्राह्मण म्हणून मान्यता दिली, तेव्हा हे वैर शमले.

मेहकर तालुक्यातील विश्वी हे गाव विश्वामित्र ऋषींचे स्थान आणि वडाळी हे वसिष्ठ ऋषींचे स्थान मानले जाते. ही दोन गावे एकमेकांपासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. पुराणातील वसिष्ठ-विश्वामित्र संघर्षाच्या आणि त्यानंतरच्या समेटाच्या कथेला येथील भौगोलिक परिस्थितीमुळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्थानिक लोककथांनुसार, या दोन ऋषींनी या जवळच्या गावांमध्ये राहून एकमेकांशी स्पर्धा आणि संवाद साधला असावा. याच काळात महर्षी वसिष्ठ यांनी वडाळी येथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली, अशी मान्यता आहे. या मंदिराची नोंद ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये आहे. मंदिर परिसरात वनवासी समाजाची काही प्रमाणात वस्ती आहे. हे लोक वसिष्ठ ऋषींनाच देव मानतात, असेही सरकारी गॅझेटियरमध्ये म्हटले आहे.

मन नदीच्या पात्रानजीक हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात एक उंच, वर निमुळता होत जाणारा दीपस्तंभ आहे. मोठा खुला मंडप, नंदीमंडप, दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. खुला मंडप व सभामंडपाच्या मधील जागेत नंदीमंडप आहे. या नंदीमंडपात चार दगडी स्तंभांच्या मध्ये जमिनीवर दोन नंदीमूर्ती आहेत. येथील अर्धखुल्या दर्शनमंडपाच्या चारही दगडी स्तंभांवर विविध शिल्पे व नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे असलेल्या देवळीत विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती व उजवीकडे शिवपिंडी आहे. सभामंडपात असलेल्या देवकोष्ठकांमध्ये विविध देवतांच्या प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी अखंड पाषाणातील शिवपिंडी आहे. त्यावर धातूचा मुखवटा व नागाने छत्र धरलेले आहे. या पिंडीच्या समोरील भिंतीवर शिवशंकरांचे चित्र रेखाटलेले आहे.

श्रावण महिन्यात शिवशंकरांची आराधना केल्यास सुखसमृद्धी प्राप्त होते, अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सूर्योदयापूर्वी जिल्ह्यातील हजारो भाविक या सातही मंदिरांची परिक्रमा करतात. वडाळी येथील या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन या परिक्रमेला सुरुवात केली जाते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी रात्री सर्व परिक्रमावासी या शिवमंदिरात एकत्र येतात. मध्यरात्री १२ च्या सुमारास येथील महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर ओल्या अंगाने या परिक्रमेला प्रारंभ होतो. विश्वी येथील विश्वामित्र मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर या परिक्रमेचा समारोप होतो. सोमवारी सूर्योदय होण्यापूर्वी ही परिक्रमा पूर्ण करावी लागते.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून ४४ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५० किमी अंतरावर
  • मेहकर आणि बुलडाणा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

वशिष्ठ ऋषि मंदिर

वडाली, त. मेहकर, जिला. बुलढाणा

Back To Home