वऱ्हाळा देवी ही यंत्रमागाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या भिवंडी या ठाणे जिल्ह्यातील प्राचीन शहराची ग्रामदेवता आहे. शहरातील कामतघर भागात वऱ्हाळा तलावाकाठी देवीचे मंदिर आहे. भिवंडीतील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरात वसलेल्या वऱ्हाळा देवीचा लौकिक नवसाला पावणारी देवी असा आहे. त्यामुळे तिच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात. नवरात्रोत्सवात देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून जातो.
पूर्वीच्या काळी जल आणि भूमार्ग यांच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेले भिवंडी हे शहर भिमडी, तसेच बिंब्री या नावाने ओळखले जाई. क्लॅडियस टॉलेमी या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञ व भगोलशास्त्रवेत्त्या लेखकाच्या एका ग्रंथामध्ये ‘बिंदा’ या नावाने भिवंडीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ‘गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या चौदाव्या खंडातील माहितीनुसार या शहरात वडाला (वऱ्हाळा), भिवळे, मिराळे, मराळे, खाक्राळे आणि निझामपूर मशिदीनजीकचा एक छोटा तलाव असे सहा तलाव होते. त्यातील वऱ्हाळा तलावाची व्याप्ती ५७ एकर एवढी होती. भिवंडीनजीकच्या कामतगड (कामतघर) येथील एका श्रीमंत महिलेने हा तलाव बांधल्याचे सांगण्यात येते, असे गॅझेटियरमध्ये म्हटले आहे. याच तलावाच्या काठी वऱ्हाळा देवीचे मंदिर आहे.
याबाबतची एक आख्यायिकाही या गॅझेटियरमध्ये नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार हा तलाव बांधला; परंतु त्यात पाणी साठले जात नव्हते. जोवर येथील भूदेवतेस प्रसन्न केले जात नाही तोवर त्यात पाणी साठणार नाही, असे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी नरबळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कामतघरच्या प्रमुखाची सून ही दुर्गामातेची भक्त होती. ती त्या वेळी गर्भवती होती. तरीही तलावात पाणी साठून भिवंडीवरील जलसंकट कायमचे दूर व्हावे या उदात्त हेतूने ती स्वतःचे बलिदान देण्यास पुढे आली. तिने या ठिकाणी जलसमाधी घेतली. त्यानंतर तलावात पाणी साठू लागले. त्यानंतर ग्रामस्थांनी या तलावाजवळच तिचे मंदिर बांधून तिचे ग्रामदेवता म्हणून पूजन करण्यास सुरुवात केली. तिने जलसमाधी घेतलेल्या तलावाला वऱ्हाळा तलाव असे नाव पडले.
शहरातील धामणकर नाका परिसरात हे मंदिर आहे. मुख्य रस्त्यापासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या पायऱ्यांनजीक फुले व प्रसाद साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंदिराच्या समोर एक प्राचीन वृक्ष आहे. या वृक्षाजवळ काही देव-देवतांचे स्थान आहे. या वृक्षाच्या बाजूला यज्ञकुंड आहे. मंदिराच्या डावीकडे वऱ्हाळा तलाव आहे. मंदिराच्या मुखमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंहांच्या मूर्ती आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात कासव मूर्तींसमोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. समोर असलेल्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे व त्यावर आकर्षक कलाकुसर आहे. गर्भगृहात चांदीच्या मखरात डावीकडे वऱ्हाळा देवीची, तर उजवीकडे वाघावर स्वार असलेल्या दुर्गामातेची मूर्ती आहे. उभ्या असलेल्या वऱ्हाळा देवीच्या हातात बालक आहे. उत्सवांदरम्यान दोन्ही देवींना मुखवटे लावून साजशृंगार करण्यात येतो. मूर्तींभोवती आकर्षक आरास करण्यात येते. नवरात्रोत्सवादरम्यान नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.
मंदिराच्या डावीकडे असलेला विस्तीर्ण तलाव शहरातील नागरिकांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे. येथे मुलांसाठी बाग असून जॉगिंग पार्कही आहे. या तलावातून भिवंडी शहराला दररोज पाच एमएलडी पाणीपुरवठा होतो. हा तलाव म्हणजे भिवंडीचा ‘जीवन’दाता आहे. या तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कार्यकाळात (इ.स. १७४४ ते १७७२) एक विशेष पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. त्यावेळी रामाजी महादेव बिवलकर हे कल्याणचे सुभेदार होते. मात्र ती योजना पूर्णत्वास गेली नाही. पुढे १८४८ ते १८५० या कालावधीत भिवंडीत मोठा दुष्काळ पडला. या पार्श्वभूमीवर १८५१ मध्ये या तलावातील पाणी खापरी नळाने शहरात आणण्यात आले. त्या कामास त्या काळी १६ हजार रुपये खर्च आला होता व त्यापैकी पाच हजार रुपये स्थानिक नागरिकांनी जमा केले होते. उर्वरित खर्च ईस्ट इंडिया कंपनी सरकारने केला होता. या कामात पुढे १८७३-७४ मध्ये आणखी खर्च करून सुधारणा करण्यात आली.
वऱ्हाळा तलावातील पाणी खापरी नळाद्वारे भीमेश्वर मंदिरासमोर बनवण्यात आलेल्या हौदात सोडण्यात येत असे. गोमुखातून ते या हौदात पडत असे. या हौदाला जोडूनच गावात अनेक हौद बांधण्यात आले. सरकारी गॅझेटमध्येही याबाबत नोंद आहे. या हौदाच्या रूपाने गंगा अवरतली या भावनेतून ग्रामस्थांनी भीमेश्वर मंदिरात १८५० पासून गंगा दशहरा उत्सव सुरू केला. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी या कालावधीत होणारा उत्सव आजही अव्याहतपणे सुरू आहे. या वर्षी (२०२४) या उत्सवाचे शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले.