वरदायनी माता

वाळणकोंडी, ता. महाड, जि. रायगड

रायगड पुणे जिल्ह्याच्या सीमेवर महाडपासून काही अंतरावर असलेले वाळणकोंडी देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून उगम पावलेल्या काळ नदीच्या डोहाला वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हटले जाते. माशांच्या रूपात असलेले देवीचे हे स्थान पाहण्यासाठी देवीला नवस बोलण्यासाठी दररोज शेकडो भाविक येथे येतात. येथील डोहाची खोली किती आहे, तसेच या डोहात देवाचे हे हजारो मासे कुठून आले, याबाबत मात्र गूढ कायम आहे

लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी, काळ नदीच्या मुख्य पात्रात, महाड तालुक्यातील पणदेरी गावाजवळ वरदायनी देवीचे स्थान आहे. येथे तात्पुरत्या स्वरूपातील देवीचे मंदिर आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने हे मंदिर पाण्याखाली जाते. त्यामुळे या देवीचे केवळ उन्हाळ्यात हिवाळ्यात दर्शन होते. या मंदिराला लागून नदीपात्रात नैसर्गिक डोह तयार झालेला आहे. या डोहात असलेले मासे हे वरदायनी मातेची लेकरं असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे असणारे मासे आणि हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये आढळणारे दुर्मिळ गोल्डन महासीर प्रजातीचे मासे यांच्यात खूपच साम्य आहे. नर्मदा नदीतही असे मासे आढळतात. गोल्डन महासीर माशांनापाण्यातील वाघअसे म्हणतात. ते गोड्या आणि उच्च प्राणवायूयुक्त अशा पाण्यातच आढळतात. ही प्रजाती या नदीमध्ये आणि तेही वरदायनी मातेच्या मंदिरालगतच्या डोहात कशी आली, याबाबत मात्र कोणालाच काही सांगता येत नाही. या नदीचे पात्र हे साधारणतः १२४ किमी इतके लांब आहे. मात्र हा डोह सोडल्यास नदी पात्रात इतरत्र कुठेही हे मासे आढळत नाहीत, असे सांगण्यात येते. हे मासे केवळ हिवाळा आणि उन्हाळ्यातच दर्शन देतात. पावसाळ्यात ते दिसत नाहीत

याबाबत एक आख्यायिका अशी की या डोहात देवीचे मंदिर आहे. सुमारे ६०० वर्षांपूर्वी येथील देवीचा पुजारी दररोज या डोहात देवीसाठीची आरती घेऊन उतरत असे. देवीची पुजा झाल्यावर तो पाण्याबाहेर येत असे. या परिसरातील नागरिकांच्या शुभकार्यासाठी या देवीकडे भांडीकुंडी मागितली असता ती या डोहातील पाण्यावर येत असत. पुन्हा काम झाल्यावर ती कुंडात परत केली जात, परंतु काहींनी ही भांडी परत दिल्याने देवी नाराज झाली त्यापुढे भांडीकुंडी येणे बंद झाले. देवीने येथील ग्रामस्थांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की यापुढे माझे येथील माशांमध्ये अस्तित्व असेल. हे मासे म्हणजे माझी लेकरं आहेत. त्यांच्या रूपातच मी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या स्थानावर कायम असेन. तेव्हापासून या स्थानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

हजारो देवाचे मासे हे या डोहाचे मुख्य आकर्षण आहे. असे सांगितले जाते की या डोहात माशांचे आकारानुसार सात थर आहेत. गोल्डन महासीर मासे हे मिश्राहारी असतात. ते अन्य मासे, किडेही खातात. येथे या माशांना तांदूळ, कुरमुरे, खोबरे अशाप्रकारचे खाद्य भाविकांकडून दिले जाते. त्यानुसार पहिल्यांदा लहान माशांचा पहिला थर, मग दुसऱ्या थरातील मोठे मासे, त्यानंतर आणखी मोठे मासे असे थर पाहायला मिळतात. चौथ्या थरातील मासे हे चार फूट लांबीचे तर पाचव्या, सहाव्या सातव्या थरातील मासे हे त्याहीपेक्षा मोठे आहेत. सातवा थर हा खूपच क्वचित पाहायला मिळतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत येथील जोरदार प्रवाहाचा या माशांवर काही परिणाम होत नाही. पावसाळा संपला नदीपात्रातील पाणी कमी झाले की पुन्हा या डोहात हे मासे दिसू लागतात. किनाऱ्यापासून नदीच्या डोहापर्यंत येथे झुलता पूल बांधण्यात आलेला आहे. त्यावर उभे राहून या डोहातील मासे पाहता येतात. या माशांचे डोके शेंदरी रंगाचे असते. या कुंडातील मासे ग्रामस्थांकडून पकडले अथवा मारले जात नाहीत. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आहे

नदी पात्राजवळ जेथे झुलता पूल सुरू होतो. तेथून देवीच्या मंदिरात जाता येते. या परिसरात माशांसाठी लागणाऱ्या खाद्यांची पूजा साहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. हे देवस्थान अतिशय कड़क मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे. त्यामुळे पुलाच्या सुरुवातीलाच चपला काढून नदीपात्रात प्रवेश करावा लागतो. डोहाच्या शेजारी असणाऱ्या खडकांमध्ये वरदायनी देवीचे स्थान आहे. उन्हाळ्यात हिवाळ्यात या स्थानावर तात्पुरती पत्र्याची शेड टाकण्यात येते. भाविकांकडून या देवीला नारळ अर्पण केला जातो. त्यानंतर त्या नारळातील खोबऱ्याचे बारीक तुकडे करून ते देवीची लेकरे अशी मान्यता असलेल्या माशांना खाण्यासाठी डोहात टाकले जातात. यावेळी ते खोबरे खाण्यासाठी आलेले हजारो मासे पाण्यावर तरंगताना दिसतात

नवरात्रीच्या दिवसांत येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळी रायगड पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र गुजरातमधूनही हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पावसाळ्यातील दिवस सोडून दररोज सकाळी ते सायंकाळी या वेळेत देवीचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती

  • महाडपासून २४ किमी अंतरावर
  • महाडपासून जवळ असलेल्या बिरवाडीहून सहा आसनी रिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने थेट देवीच्या स्थानाजवळ जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home