वाल्मीकी ऋषी मंदिर

वरवंड, ता. मेहकर, जि. बुलडाणा

‘रामायण’ या महाकाव्याची रचना करणाऱ्या वाल्मीकी ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग मेहकर तालुक्यातील वरवंड येथे आहे. बुलडाणा जिल्ह्यात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी होणाऱ्या सप्तऋषी मंदिर परिक्रमेत या मंदिराला चौथे स्थान आहे. बाराव्या-तेराव्या शतकात हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेल्या या मंदिरात कर्नाटकातून येथे आलेल्या वीरभद्र नावाच्या संतपुरुषाने सुमारे चाळीस वर्षे सेवा केली. त्यांची समाधीही या मंदिरात आहे. पौष महिन्यात त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये ‘आदिकवी’ म्हणून वंदनीय असलेल्या महर्षी वाल्मीकींचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि विलक्षण आहे. संस्कृत साहित्यातील पहिले महाकाव्य ‘रामायण’ रचण्याचे श्रेय त्यांना जाते. पौराणिक कथांनुसार, वाल्मीकींचे पूर्वाश्रमीचे नाव रत्नाकर होते. लोककथांमध्ये त्यांचा उल्लेख ‘वाल्या कोळी’ असाही आढळतो. सुरुवातीच्या काळात ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अरण्यातील वाटसरूंना लुटत असत. एका प्रसंगी त्यांची भेट नारद मुनींशी झाली. नारदांनी त्यांना एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला, ‘ज्या कुटुंबाच्या सुखासाठी तू हे पापकर्म करत आहेस, ते तुझे कुटुंबीय तुझ्या पापाचे भागीदार होणार का?’ जेव्हा रत्नाकरांनी हा प्रश्न आपल्या घरी जाऊन विचारला, तेव्हा त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी पापाचे भागीदार होण्यास स्पष्ट नकार दिला. या एका प्रसंगाने रत्नाकरांचे डोळे उघडले आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नारद मुनींच्या उपदेशानुसार घोर तपश्चर्या सुरू केली.

सुरुवातीला ‘राम’ नामाचा उच्चार जमत नसल्याने त्यांनी ‘मरा-मरा’ असा जप केला, त्याचे रूपांतर कालांतराने ‘राम-राम’मध्ये झाले. अनेक वर्षे एकाच आसनात बसून तप केल्यामुळे त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचे वारूळ (वल्मीक) तयार झाले. तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ते या वारूळातून बाहेर पडले, म्हणून त्यांना ‘वाल्मीकी’ हे नाव प्राप्त झाले. ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने त्यांना ‘रामायण’ या महाकाव्याची रचना करण्याची स्फूर्ती मिळाली. क्रौंच पक्ष्याच्या वधाने व्याकुळ होऊन त्यांच्या मुखातून पहिला श्लोक बाहेर पडला, जो लौकिक साहित्यातील पहिला श्लोक मानला जातो. पुढे श्रीरामांनी सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मीकी ऋषींनीच तिला आपल्या आश्रमात पितृतुल्य आधार दिला आणि लव-कुश या तिच्या पुत्रांवर शस्त्र व शास्त्राचे संस्कार केले.

वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील वालझरी (ता. चाळीसगाव) हे गाव असल्याचे मानले जाते. या वाल्मीकी ऋषींनी प्राचीन काळी अजिंठा पर्वतरांगेत वसलेल्या मेघंकर (आताचे मेहकर) परिसरातील दंडकारण्यात तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी येथील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. बाराव्या-तेराव्या शतकात येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत मंदिर उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. कालौघात या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाला. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’मध्येही या मंदिराची माहिती आढळते.

हेमाडपंती शैलीतील हे मंदिर एका छोट्या दरीसदृश खोल भागामध्ये आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराच्या मागील बाजूस सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर एक धबधबा आहे. मंदिरापासून काही अंतरावर गोमुखकुंड आहे, तर मंदिराच्या मागील बाजूने नदी वाहते. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे या मंदिराचे मूळ स्वरूप आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारादरम्यान मूळ मंदिरासमोर मंडपाचे बांधकाम करण्यात आले. या मंडपात प्रवेश करण्याआधी उजव्या बाजूला असलेल्या तुळशी वृंदावनाजवळ गणेशाची मूर्ती आहे. मंडपात छोट्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.

सभामंडपाचे प्रवेशद्वार आकाराने लहान असल्याने नतमस्तक होऊनच आत प्रवेश करावा लागतो. सभामंडपात अनेक स्तंभ आहेत. स्तंभपादांवर आधारलेल्या या स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत. मात्र, हेमाडपंती स्थापत्यशैलीतील अन्य मंदिरांप्रमाणे या स्तंभांवर तसेच मंदिरावर कोरीव काम आढळत नाही. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये शिवलिंग आहे. शिवलिंग व शाळुंकेवर पितळेच्या पत्र्याचे आवरण बसवण्यात आले आहे.

या पुरातन मंदिराचे पावित्र्य जपण्यात आणि त्याचे संवर्धन करण्यात वीरभद्र महाराजांचे योगदान अमूल्य आहे. मूळचे कर्नाटक राज्यातील असलेले हे सत्पुरुष साधारणतः १९०५ ते १९१० च्या काळात भ्रमंती करत या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य याच ठिकाणी व्यतीत केले. वीरभद्र महाराजांची जीवनशैली अतिशय कठोर आणि वैराग्यपूर्ण होती. स्थानिक आख्यायिकेनुसार, त्यांनी अन्नाचा त्याग केला होता आणि ते केवळ चहा प्राशन करून उपवास करत असत. सलग चाळीस वर्षे त्यांनी या मंदिरात वाल्मीकी ऋषींच्या चरणी निस्सीम सेवा रुजू केली. मंदिर परिसराची स्वच्छता करणे, जप-तप करणे आणि येणाऱ्या भाविकांना भक्तीचा मार्ग दाखवणे, हाच त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या वास्तव्यामुळे आणि तपाच्या सामर्थ्यामुळे या मंदिराला एक जागृत देवस्थान म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे आणि निस्वार्थ सेवेमुळे परिसरातील भाविक त्यांना ईश्वरी रूप मानू लागले. या पवित्र भूमीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या मंदिराच्या बाहेरील मंडपात त्यांची समाधी आणि मूर्ती स्थापित आहे. या मंडपात सोपिनाथ महाराजांचे तसेच हनुमानाचेही मंदिर आहे. मंदिर परिसरात विरभद्र महाराजांच्या स्मरणार्थ एक धुनी कायम पेटत असते.

या मंदिरात पौष वद्य एकादशीला संत वीरभद्र यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव होतो. त्यानिमित्त येथे सप्ताह होतो. पौष वद्य एकादशीला मोठा भंडारा होतो. या वेळी शंकरपट, कबड्डी आदी खेळ खेळले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आमली बारशीलाही येथे मोठा भंडारा होतो. श्रावण महिन्यात अनेक भाविक येथील शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी येतात. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या सूर्योदयापूर्वी शेकडो भाविक मेहकर तालुक्यातील सप्तऋषी मंदिरांची परिक्रमा करतात. या परिक्रमेत या मंदिराला चौथे स्थान आहे. या दिवशी हजारो भाविकांकडून होणाऱ्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. आश्विन पौर्णिमेच्या दिवशी वाल्मीकी जयंतीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून २८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८४ किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : प्रल्हाद महाराज, मो. ९१४६८६८३१८

वाल्मिकी ऋषि मंदिर

वरवंड, त. मेहकर, जिला. बुलढाणा

Back To Home