श्रीराम मंदिर

कॉटनग्रीन, मुंबई शहर, मुंबई

सात बेटांपासून बनलेल्या मुंबईत ऐतिहासिक काळापासून प्रभू श्रीरामचंद्रांची अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे आणि जुने मंदिर कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस स्थित आहे. परळ, कॉटन ग्रीन भागात राहणाऱ्या कामगारांचे आराध्य दैवत असलेल्या या श्रीराम मंदिराची स्थापना सन १९४० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत या मंदिरात रामनवमीचा उत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात व जल्लोषात साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात हजारो रामभक्त सहभागी होत असतात.

सात बेटांपासून बनलेली मुंबई ही एकेकाळी जगाची कापूस राजधानी मानली जात असे. सन १७०० मध्ये ब्रिटिश गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांच्या कारकिर्दीत मुंबई-चीन दरम्यान मोठ्या प्रमाणावर कापसाचा व्यापार सुरू झाला. १८६० च्या दशकात अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झाल्याने येथील कापूस आणि कापड व्यवसायाची भरभराट झाली. कॉटन ग्रीन हे या व्यापाराचे एक केंद्र होते. ‘बॉम्बे प्लेस नेम्स अँड स्ट्रीट नेम्स’ या सॅम्युअल टी. शेपार्ड (द टाइम्स प्रेस, १९१७) या पुस्तकानुसार मूळचे कॉटन ग्रीन हे कुलाबा भागात स्थित होते. आताच्या बधवार पार्क भागात ते होते असे सांगितले जाते. चर्चगेटच्या पश्चिमेकडील भागात हिरवीगार झाडी होती, त्यामुळे त्यास बॉम्बे ग्रीन असे म्हटले जात असे. या भागाच्या पूर्वेस असलेल्या बंदरांतून कापसाचा व्यापार चाले, त्यामुळे त्यास कॉटन ग्रीन असे म्हटले जाऊ लागले. १९२४ साली शिवडी-माझगाव भागानजीक कापसाचा व्यापार स्थलांतरित करण्यात आला. या ठिकाणी ‘कॉटन एक्स्चेंज’ची इमारत उभी करण्यात आली आणि त्यावरून या भागास कॉटन ग्रीन असे संबोधण्यात येऊ लागले.

येथील हार्बर मार्गावरील मध्य रेल्वेचे स्थानक ‘कॉटन ग्रीन’ या नावानेच ओळखले जाते. या स्थानकापासून काही अंतरावर श्रीरामाचे हे मंदिर वसले आहे. या मंदिराची स्थापना शेठ सूरजमल नेमाणी यांनी केली. ते मूळचे राजस्थानातील होते. त्यांचे वडील शेठ शिवनारायण नेमाणी हे एक मोठे कापूस व्यापारी होते. त्यांच्याकडे ब्रिटिशांच्या काळातील ‘जस्टिस ऑफ द पीस’ हे बहुमानाचे पदही होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारतामध्ये या पदाची सुरुवात झाली. ‘जे.पी.’ म्हणून हे हुद्देदार ओळखले जात व त्यांची नियुक्ती गव्हर्नर जनरल यांच्याकडून केली जात असे. त्यांच्याकडे न्यायिक आणि प्रशासकीय अधिकार असत. शेठ शिवनारायण नेमाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा वैशाख शुद्ध ६, सोमवार, संवत १९९७ (१३ मे १९४०) या मुहूर्तावर करण्यात आली.

रेल्वे स्थानकापासून जवळ असूनही अतिशय शांत असलेल्या भागात हे मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर मोठी मोकळी जागा आहे. याच्या जवळच ‘एअरफोर्स स्टेशन’ आहे. मंदिराच्या आवारास वर लोखंडी सळया लावलेली भिंत आहे. छोट्या लोखंडी प्रवेशद्वारातून या आवारात प्रवेश करताच डावीकडे हनुमानाची देवळी आणि दीपस्तंभ आहे. देवळीत सोनेरी मखरामध्ये हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. या देवळीशेजारी महादेवाची पिंड व नंदी आहे. पिंडीवर पितळी नागराजाचे छत्र असून त्यावर पितळी गलंतिका आहे. समोरच एक छोटे पितळी त्रिशूळ आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. चौकोनी स्तंभ असलेला येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. चार पायऱ्या चढून त्यात प्रवेश होतो. सभामंडपात संगमरवरी फरशा लावलेल्या आहेत. सभामंडपाचे छत समतल असून त्यास बाशिंगी कठडा आहे. सभामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहास लाकडी चौकट असलेले प्रवेशद्वार आहे व चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणरायाची प्रतिमा आहे. गर्भगृहात उंच चौथऱ्यावर प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या सुहास्यवदन मूर्ती प्रतिष्ठित आहेत. संगमरवरी पाषाणात कोरलेल्या या मूर्ती वस्त्रालंकार व पुष्पमालांनी शृंगारलेल्या आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण हे कोदंडधारी असून त्यांनी उजव्या हातामध्ये बाण धरलेला आहे, तर सीतेची मूर्ती वरदमुद्रेतील आहे. या मूर्तींच्या मस्तकी सोनेरी मुकुट आहे. या मूर्तींच्या शेजारी डावीकडे नमस्कार मुद्रेतील हनुमानाची, तर उजवीकडे गणेशाची मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीही संगमरवरी पाषाणातील आहेत. चौथऱ्याच्या खालच्या बाजूस शंख, सिंहमूर्ती, तसेच गणेशाची पितळी मूर्ती आहे. येथेच राधा आणि श्रीकृष्ण यांच्या तसबिरी ठेवलेल्या आहेत. गर्भगृहावर वर निमुळते होत गेलेले, उरूशृंग पद्धतीचा आभास निर्माण करणारे शिखर आहे. त्यावर मोदकाच्या आकाराचा आमलक आणि त्यावर कलश आहे.

कॉटन ग्रीन परिसरातील हजारो माथाडी कामगारांची येथील श्रीरामावर अपरंपार श्रद्धा आहे. यामुळे मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी भाविकांची मोठी वर्दळ असते. सकाळी ६.३० ते दुपारी १२.१५ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या काळात येथे देवदर्शन घेता येते. मंदिरात रोज सकाळी ६.४५ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता आरती केली जाते.

येथे विविध हिंदू सण व उत्सव नेमाने साजरे केले जातात. दर रविवारी सायंकाळी भजन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात. रविवारी सकाळी ९ ते ११ या काळात येथे ज्ञानेश्वरी पठण केले जाते आणि सायंकाळी ५ ते ६ कीर्तन होते.

त्यानंतर ६ ते ७ दरम्यान भजन व रात्री ७.३० वाजता आरती होते. रात्री ८ वाजता येथे रामचरितमानस पठणाचा कार्यक्रम होतो. भारताचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, तसेच गोकुळाष्टमी निमित्तानेही येथे कीर्तनाचे आयोजन केले जाते. रामनवमी सोहळा सप्ताह हा येथील सर्वांत मोठा उत्सव होय. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या काळात येथे रोज सायंकाळी भजन, तसेच भागवत पारायणाचा कार्यक्रम होतो.

रामनवमीच्या दिवशी येथे सुमारे ३० ते ४० हजार भाविकांना अन्नदान केले जाते. दरवर्षी ७ जानेवारीला येथून वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या विठ्ठल मंदिरात वारकरी दिंडी नेली जाते. या दिंडीत हजारो वारकरी व भाविक सहभागी होतात. व्यापारी व माथाडी कामगारांनी स्थापन केलेल्या ‘श्री रामचंद्रजी टेम्पल ट्रस्ट’ या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेद्वारे या मंदिराचा कारभार पाहिला जातो.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी ०२२ २०८३०६८५, मो. ९८१९४४८४५२

वैकुंठमाता गादेवी मंदिर

भंडारवाड़ा हिल, मझगांव, मुंबई

Back To Home