वाघेश्वरी देवी मंदिर

आचार्य दोंदे मार्ग, परमानंद वाडी, परळ, मुंबई

वाघेश्वरी (वागेश्वरी) ऊर्फ व्याघ्रेश्वरी ही मूळची लोकदेवता आहे. तिला परळ-शिवडी परिसराच्या आद्य ग्रामदेवतेचा मान आहे. या देवीचे वाहन वाघ आहे आणि ती कात्यायनी देवीचे स्वरूप असल्याचे मानले जाते. परळ येथील पूर्वीच्या गोलंजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर देवीचे प्राचीन स्थान आहे. इतिहासकारांच्या मते देवीचे येथील स्थान सुमारे ७०० ते ७५० वर्षांपूर्वीचे आहे. मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब याच्या कारकिर्दीत येथे देवीचे मूळ मंदिर बांधले गेले असावे. नवरात्रात येथे देवीचा मोठा उत्सव भरतो. पूर्वी चैत्र अमावस्येला येथे देवीची मोठी जत्रा भरत असे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संपादित केलेल्या ‘महिकावतीच्या बखरीनुसार’, प्रताप बिंब याने माहीम हस्तगत केल्यानंतर येथे देशवसाहत स्थापन केली. प्रताप बिंब याचा पुत्र मही बिंब हा चांपानेरवरून ६६ कुळे घेऊन येथे आला. या कुळांमध्ये २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी, ९ शेषवंशी आणि अन्य कुळांचा समावेश होता. यातील सोमवंशी क्षत्रिय कुळातील काही लोकांनी सध्याच्या परळ भागात आपली वसाहत स्थापन केली. या लोकांना पाचकळशी असे म्हटले जाते. १९०२ साली प्रसिद्ध झालेल्या “द राइज ऑफ बॉम्बे – ए रिट्रोस्पेक्ट” या पुस्तकात गॅझेटियरकार आणि इतिहास संशोधक एस. एम. एडवर्ड्स यांनी असे लिहिले आहे की “(भीम)राजाच्या आश्रयाखाली पाचकळशी समुदायाने येथे तीन मंदिरे बांधली. त्यातील दोन त्यांच्या कुलदैवतांसाठी म्हणजेच वाघेश्वरी आणि चंडिका यांच्याकरिता आणि तिसरे महादेवासाठी होते.” देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा चौथा पुत्र बिंबदेव म्हणजेच भीमराजा होय. मुस्लिम तवारिखांमध्ये त्याचा उल्लेख भीमदेव असा केला आहे. या बिंबदेवाने माहीम येथे इ.स. १२९५ मध्ये आपली राजधानी स्थापन केली होती. त्याच्याच काळात परळमध्ये पाचकळशी समाजाने ही तिन्ही मंदिरे उभारली, असे एडवर्ड्स यांचे प्रतिपादन आहे.
मुंबईतील वडाळा, चिंचपोकळी आदी भागांची नामोत्पत्ती तेथील झाडे किंवा वनस्पतींवरून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे परळ या नावाचीही उत्पत्ती सांगितली जाते. इतिहासकार जे. गार्सेन दा कुन्हा यांनी ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (१९००) या पुस्तकात, ‘परळ’ या नावाचा उगम ‘बग्नोनिया सुवेओलेन्स’ किंवा ‘ट्री-ट्रम्पेट फ्लॉवर’ या वनस्पतीपासून झाला असल्याचे म्हटले आहे. या झाडास मराठीत पडळ असे म्हणतात. त्यावरून परळ हे नाव आले. एस. एम. एडवर्ड्स यांनी मात्र या नामोत्पत्तीबाबत वेगळा सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते, पाचकळशी समाजाने वाघेश्वरी, चंडिका आणि महादेवाचे मंदिर उभारले. या मंदिरातील महादेवाचे लिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते. या लिंगाला परळी-वैजनाथ येथील प्रसिद्ध वैजनाथ लिंगाइतकेच महत्त्व आणि पावित्र्य प्राप्त झाले होते. परळी-वैजनाथ येथील मूळ मंदिर सन ११८६ मध्ये यादव राजा भिल्लम याने बांधले होते. बिंबदेव हा याच यादवकुळातील होता. त्यामुळे परळी-वैजनाथ मंदिराची स्मृती जपण्यासाठी येथील मंदिरास देखील ‘परळी वैजनाथ महादेव’ असे संबोधले जाऊ लागले. एडवर्ड्स यांच्या मांडणीनुसार, या दैवताच्या नावावरूनच पुढे या भागाचे नाव परळ असे पडले. परळमधील परळी वैजनाथ महादेवाचे हे मंदिर १५९६ ते १६९३ या दरम्यान कधीतरी पोर्तुगीज धर्मांधांनी पाडले. त्या ठिकाणी जेसुइट पंथीयांनी त्यांचे प्रार्थनास्थळ व मठ स्थापन केला. पुढे ब्रिटिशांनी या जेसुइट पंथीयांना हुसकावून लावून तेथे मुंबईच्या ‘रजिस्ट्रार्स’ची कार्यालये सुरू केली. कालांतराने मुंबईच्या गव्हर्नरचे निवासस्थान म्हणून या इमारतीचा वापर करण्यात येऊ लागला. मुंबईत प्लेग म्हणजेच ग्रांथिक सायन्निपाताची महामारी आल्यानंतर, त्या विषाणूवर लस निर्माण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने डॉ. वाल्डेमर हाफकिन यांना पाचारण केले. १० ऑगस्ट १८९९ रोजी ही इमारत त्यांना संशोधनासाठी देण्यात आली. आज तेथे हाफकिन इन्स्टिट्यूट उभी आहे.

या संस्थेच्या पूर्वेकडे देवीचे हे मंदिर वसलेले आहे. प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या ‘मुंबईतील आद्य जागृत शक्तिपीठे’ या पुस्तकानुसार, येथील गोलंजी टेकडीवर देवीचे अधिष्ठान आहे. परळ येथील गव्हर्नर हाऊसच्या काळात ब्रिटिश सरकारचा ध्वज या टेकडीच्या माथ्यावर फडकत असे. त्यामुळे या टेकडीला त्या काळी ‘फ्लॅगस्टाफ हिल’ असे म्हणत असत. तत्कालीन गोलंजी टेकडीने भोईवाडा ते चिंचपोकळीपर्यंतचा विस्तीर्ण भाग व्यापला होता आणि परळ गावाचा भाग टेकडीच्या उतरंडीवर होता. कालांतराने या टेकडीचे बरेचसे सपाटीकरण करण्यात आले.

प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या पुस्तकानुसार ही देवी शिवडी परिसराची आद्य ग्रामदेवता आहे. पुस्तकात देवीच्या नावाविषयीची एक आख्यायिका दिली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी या भागात घनदाट अरण्य होते. त्या काळी एक वाघ रोज रात्री देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत असे. त्यामुळे देवीला व्याघ्रेश्वरी असे नाव पडले. परळ-शिवडीच्या या परिसरात एके काळी रानमांजरींचे अस्तित्व होते, असे ‘ग्रेटर बॉम्बे डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’मध्ये नमूद केले आहे. या भागात तेव्हा वाघाचेही अस्तित्व असल्याची शक्यता आहे.

या मंदिराचा ठोस व नेमका इतिहास अज्ञात आहे. देवीचे येथील स्थान तेराव्या शतकातील असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. पुढे या मंदिराचे अनेकदा जीर्णोद्धार झाले असावेत. आकलेकर यांच्या मते, सोमवंशी क्षत्रिय समाजातील विश्वनाथ धाकुजी पाटील या गृहस्थाने या मंदिराची स्थापना केली. या संदर्भातील एक श्लोक पुस्तकात खालीलप्रमाणे उद्धृत केला आहे:
“श्रीवागेश्वरी प्रसन्न ममपितू नाम विश्वनाथ
धाकजी पाटील श्री दत्त दास उपासक केवळ
श्री निळकंठेश्वर क्षेत्र निर्मित वरळी गरम असे पै ?
आम्ही सूर्यवंशी क्षत्रिय आम्हासी योजीले असे
एक कांजकी, आम्हा पासून श्रीची सेवा
घडावी सतत म्हणून श्रीवागेश्वरीशी येथे स्थापिले.”
या मंदिराच्या इतिहासाविषयी एक पाठभेद आढळतो. त्यानुसार, हे मंदिर चौकळशी ज्ञातीतील घरत आणि म्हात्रे कुटुंबीयांचे आहे. या मंदिराची स्थापना त्यांच्या पूर्वजांनी सन १८०० मध्ये केली होती. मंदिराजवळ त्यांच्या वंशजांचे निवासस्थान आजही आहे. मंदिरातील शिलालेखानुसार, १९७१ मध्ये काही गुजराती बांधवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

गोलंजी टेकडीवरील वसाहतींमधील रस्त्यावरून २१ पायऱ्या चढून या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. निवासी इमारतींनी वेढलेल्या या प्रांगणात एका बाजूला जुनी दीपमाळ आणि एक दीपस्तंभ आहे. या दीपमाळेच्या आणि दीपस्तंभाच्या तळाशी, परिसराच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या कोरीव देवमूर्ती आढळतात. येथे जवळच एका उंच ओट्यावर भगवान शंकराचे स्थान आहे. जमिनीवर प्राचीन दगडी शाळुंका आहे आणि त्यावर उंच दंडगोलाकार शिवलिंग स्थापित आहे. शिवलिंगासमोर छोटासा संगमरवरी नंदी आणि कूर्मभगवानाची मूर्ती आहे.

या देवळीमध्ये एक प्राचीन कोरीव देवमूर्ती विराजमान आहे. पुरातत्त्व अभ्यासक आणि संशोधकांच्या दृष्टीने शंकराचे हे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण या ओट्यावर एक प्राचीन व दुर्मीळ धेनुगळ आहे. कालौघात झिजल्यामुळे अस्पष्ट झालेल्या या धेनुगळातील गायीची मूर्ती अजूनही स्पष्टपणे दिसते.

वाघेश्वरी देवीचे मंदिर छोटेखानी व साधेसे आहे. त्याचे मूळ स्वरूप सभामंडप आणि गर्भगृह अशा प्रकारचे आहे. जीर्णोद्धाराच्या वेळी या मंदिरासमोर सिमेंट-काँक्रीटचा मोठा मंडप बांधण्यात आला आहे. संगमरवरी फरशा असलेल्या या मंडपात मोठे होमकुंड आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपात डावीकडे अक्कलकोट स्वामी समर्थांचे स्थान आहे. तेथील उंच चौथऱ्यावर स्वामी समर्थांची उभी मूर्ती आहे. उजवीकडे एका लोकदेवतेची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहात संगमरवरी वेदीवर वाघेश्वरी देवीची व्याघ्रारूढ मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे देवी चतुर्भुज आणि शस्त्रधारिणी आहे.

वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेल्या या देवीच्या मस्तकावर सोनेरी मुकुट आहे. मंदिराच्या गर्भगृहावर मोठे घुमटाकार शिखर असून त्यावर चारही स्तरांवर कळस रचना आहे.

वाघेश्वरी देवी मंदिरात सकाळी ८:३० ते ११:३० आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ या काळात देवीचे दर्शन घेता येते. चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रात येथे देवीचा मोठा उत्सव असतो. नवरात्रात अष्टमीला येथे मोठा होम केला जातो. त्या काळी अगदी परळ रेल्वे स्थानकापर्यंत दुकाने आणि पाळणे लागत असत, अशी माहिती मिळते.

परंतु, इ.स. १९४७ मध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीनंतर ही यात्रा बंद झाली. तरीही, आजही नवरात्रोत्सवात मुंबईभरातून पाचकळशी, चौकळशी, कोळी समाजातील, तसेच गुजराती आणि मारवाडी समाजातील देवीभक्त मोठ्या संख्येने येतात.

उपयुक्त माहिती:

  • दादर रेल्वे स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत

वाघेश्वरी देवी मंदिर

आचार्य डोंडे मार्ग, परमानंद वाडी, परल, मुंबई

Back To Home