देवी महालक्ष्मी-अंबाबाईने कोल्हासुराचा जेथे वध केला ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर. पश्चिम भारतातील या पुरातन शहरास किमान २००० वर्षांचा इतिहास आहे. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांच्या राजवटी पाहिलेल्या या शहरात महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यातीलच एक पुरातन मंदिर म्हणजे उत्तरेश्वर महादेव मंदिर. उत्तरेश्वर पेठेतील एका टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील महाकाय शिवपिंडी. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वाघाची तालीम, एकतारी व दिमडीवरील भजनाची प्राचीन परंपरा यामुळेही हे मंदिर ओळखले जाते.
चक्रधर स्वामींच्या ‘लीळाचरित्रा’त ‘मातापूर कोल्हापूर’ म्हणून उल्लेख असलेले कोल्हापूर हे शक्तीचे केंद्र आहे. शिव आणि शक्ती यांचे एकात्म असल्याने येथे शिवाचीही अनेक मंदिरे आहेत. पंचगंगा नदीतीरावरील ब्रह्मपुरी ही टेकडी हा कोल्हापूरचा सर्वाधिक प्राचीन भाग. ब्रम्हपुरीमध्ये ज्यावेळी उत्खनन करण्यात आले, तेव्हा अनेक प्राचीन अवशेष तिथे सापडले. येथून कोल्हापूर शहर हळूहळू विस्तारत गेले असे मानले जाते. प्राचीन काळापासून या शहराचे सहा भाग होते. ते असे – ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा आणि रावणेश्वर. यातील उत्तरेश्वर हा उत्तरेकडील भाग. तेथे अर्थातच ब्रह्मपुरीतील वसाहतीनंतरच्या काळात वसाहत झाली. तेथील महादेवाच्या मंदिरावरून या भागास हे नाव पडले असावे. कोल्हापूर नगरपालिकेच्या कागदपत्रांमध्ये या भागाचा उल्लेख लगमापूर असा आलेला आहे. लगमा या शब्दाचा अर्थ लक्ष्मीचे एक स्वरूप असा आहे.
उत्तरेश्वराचे हे मंदिर नेमके किती प्राचीन आहे याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र पराक्रमी चालुक्य राजा पुलकेशी दुसरा (इ.स. ६१० ते ६४२) याच्या काळात हे मंदिर उभारण्यात आले असल्याचे येथील काही अभ्यासक इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या हवाल्याने सांगतात. पुलकेशी दुसरा याच्या काळात इ.स. ६२४ मध्ये त्याच्या कर्णदेव नावाच्या सुभेदाराने महालक्ष्मी मंदिराचे गर्भागार बांधले होते. मंदिर स्थापत्याचे अभ्यासक योगेश प्रभुदेसाई यांच्यानुसार, कांचीच्या चोल राजाने कल्याणीच्या चालुक्यांवर आक्रमण केले, त्यावेळी चोल राजाने कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे मंदिर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ११व्या शतकात घडली. महालक्ष्मीचे मंदिर पेटवून देण्याचा प्रयत्न तेव्हा झाला, याचा अर्थ तोवर मंदिराचे बांधकाम लाकडातील असावे, असा कयास मांडण्यात आला आहे. यानंतर चालुक्यांनी सध्याचे महालक्ष्मीचे दगडी देवालय बांधले असावे. महालक्ष्मी मंदिराचा हा इतिहास पाहता, त्याच्या स्थापत्यशैलीशी साम्य असणारे उत्तरेश्वराचे मंदिरही ११व्या शतकानंतर चालुक्य राजवटीत बांधले गेले असावे असा तर्क मांडण्यात येत आहे. चालुक्य राजे हे शिवभक्त होते. त्यांचे कुलदैवत शंकर होते.
हे मंदिर टेकडीवर असले, तरी आता सर्वत्र बांधकाम आणि रस्ते झाल्यामुळे त्या टेकडीचे स्वरूप लोपले आहे. असे असले तरी हे मंदिर रस्त्यापासून उंचावर आहे. १५ दगडी पायऱ्या चढून येथे यावे लागते. पूर्वी या मंदिराचे स्वरूप लहान होते. येथेच एका साध्या इमारतीत वाघाची तालीम ही संस्था कार्यरत होती. त्या तालमीतील लोकांकडून मंदिराची पूजा, महाप्रसादादी व्यवस्था पाहण्यात येत असे. पूर्वी येथील मूळ मंदिराला जलाभिषेक करण्यात येत असे. त्यावेळी शिड्यांचा वापर करून मंदिरावर जात असत. १८९४ पासून या मंदिरास अधिक वैभव प्राप्त झाले.
फेब्रुवारी २००४ मध्ये मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्या काळात येथे आधुनिक पद्धतीने प्रशस्त असा सभामंडप बांधण्यात आला. मोठ्या लाकडी दरवाजातून सभामंडपात प्रवेश करताच, सभामंडपातच डाव्या बाजूस मारुतीचे छोटे दगडात बांधलेले मंदिर आहे. येथील मारुतीचे स्थान प्राचीन आहे. मंदिर मात्र नव्याने बांधलेले आहे. मंदिरात एका दगडी शिळेवर हनुमानाची गदाधारी मूर्ती आहे. मूर्ती उठावशिल्प प्रकारची आहे व तिच्या पाठशिळेवर दहा वानरमूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिराच्या समोरच उत्तरेश्वराचे मूळ मंदिर आहे. प्राचीन काळी या मंदिरास सभामंडप वा अंतराळ होते की कसे हे समजण्यास मार्ग नाही. सध्या येथे केवळ मूळ मंदिराचे गर्भगृह आहे.
चालुक्य काळातील वेसर स्थापत्यशैलीनुसार बांधलेल्या या मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. येथील द्वारस्तंभ कोरीव काम केलेले आहेत. अन्य शाखा मात्र नक्षीकामविरहीत आहेत. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. त्यावरच्या भागात मंदिर शिखरांच्या लहान प्रतिकृतींनी अलंकृत असे तोरण आहे. मंडारकावर अर्धचंद्रशीळा आणि तिच्या दोन्ही बाजूंस कीर्तिमुखे आहेत. गर्भगृहाच्या बाह्य तसेच आतील भिंती सपाट दगडी शिळांनी बांधलेल्या आहेत. आतील भिंतींमध्ये स्तंभाकार कोरलेले दिसतात.
या गर्भगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे नंदीचे स्थान गाभाऱ्यातच आहे. समोर भव्य असे शिवलिंग आहे. त्याची उंची ५ फूट तर रुंदी ५ फूट आहे. हे शिवलिंग मानुषलिंग प्रकारासारखे आहे. मानुषलिंगाचे तीन भाग असतात. त्यातील खालचा चौकोनी ब्रह्मभाग, अष्टकोनी विष्णूभाग आणि वरचा गोलाकार शिवभाग असे त्याचे स्वरूप असते. मात्र येथील मानुषलिंगाचे तिन्ही स्तर गोलाकार आहेत. शीर्षस्थानी उर्ध्वपाषाण आहे. या पिंडीच्या शाळुंकेचा जलनिर्गम मार्गही आखूड आहे. असे सांगण्यात येते की पूजेला सोयीचे व्हावे म्हणून या शिवलिंगाची उंची कमी करण्यात आली आहे. या शिवलिंगाच्या खालच्या बाजूला मुखडेश्वराचे स्थान आहे. या शिवलिंगाला १९७१ साली वज्रलेप करण्यात आला. गर्भागाराच्या मागच्या भिंतीवर डाव्या बाजूला एका चौकोनी अधिष्ठानावर गणरायाची तर उजव्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे.
या गर्भगृहाचे छत आणि शिखरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. छतामध्ये आतून गोलाकारात दगडी शिळा रचलेल्या आहेत. शिखर हे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले आहे. त्याच्या प्रत्येक स्तरात लंबगोलाकार खांबांसारखी रचना दिसते. चारही बाजूंनी देवकोष्टके आहेत. मात्र त्यांत मूर्ती वा शिल्पे नाहीत.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिराला १८५० सालापासूनची एक परंपरा आहे. ती म्हणजे एकतारी व दिमडीवरील भजनाची. मंदिर परिसरात असलेल्या झोपडीवजा इमारतीतील तालमीत दर सोमवारी रात्री एकतारी आणि दिमडी या वाद्यांचा वापर करून भजन केले जात असे. ती परंपरा आजही कायम आहे. या मंदिराशी थोर उदारमतवादी विचारवंत न्या. महादेव गोविंद रानडे यांचे नाव जोडले गेलेले आहे. न्या. रानडे यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले होते. त्या काळात ते या मंदिरात नित्यनेमाने दर्शनासाठी येत असत. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात या मंदिराच्या देखभालीसाठी काही रक्कम देण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टकडून पुढे मंदिराच्या देखभालीसाठी नगरपालिकेला दरवर्षी पंधरा रुपयांची देणगी दिली जात असे. या मंदिराच्या बाजूलाच न्यायमूर्ती रानडे यांच्या नावाने शाळा आहे.
मंदिराच्या आवारात भाविकांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरामागे एका मोठा पिंपळ वृक्ष आहे. हा वृक्ष १२५ वर्षें जुना आहे, असे सांगितले जाते. या मंदिरात महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवारी असंख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते.