उत्तरेश्वर मंदिर

दिवेआगर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

दिवेआगरला सुमारे पाच किलोमीटर लांबीचा स्वच्छ चंदेरी रंगाच्या वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथील सुवर्णगणेशामुळे या गावाची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. या गावात सातशे ते आठशे वर्षांपूर्वीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक असलेले उत्तरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे ते मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळांमुळे. या मंदिराच्या आवारात एकदोन नव्हे तर तब्बल ५७ मोठ्या प्राचीन दीपमाळा आहेत. कोकणातील जांभ्या दगडातील बांधकाम असलेल्या या उंचच उंच दीपमाळांमुळे या मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते

दिवेआगर गावाच्या उत्तर टोकाला असल्यामुळे शिवशंकराला समर्पित असलेल्या या मंदिराला उत्तरेश्वर मंदिर म्हटले जाते. प्राचीन काळी हे मंदिर दीपमंदिर म्हणून ओळखले जाई. असे सांगितले जाते की पूर्वी येथे दिवा लावावा लागत नसे. संध्याकाळ झाली की या मंदिरात आपोआप दिवा लागे. सकाळ झाली की हा दिवा आपोआप मालवे. त्यामुळेच या गावाला दिवेआगर म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील उत्तरेश्वर मंदिराचे बांधकाम हे जांभ्या दगडातील आहे. तटबंदीयुक्त असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात चारही बाजूंनी दीपमाळा आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेली मुख्य दीपमाळा अन्य ५६ अशा एकूण ५७ दीपमाळा या प्रांगणात आहेत. त्याही लाल जांभ्या दगडातील आहेत. तळात उंच चौकोनी चौथरा वरच्या बाजूस किंचित निमुळता होत गेलेला पाषाण खांब असे या दीपमाळांचे स्वरूप आहे. त्यांवर दिवे लावण्यासाठी दगडी हस्त आहेत.

मंदिर स्थापत्य तज्ज्ञांच्या मते दीपमाळा हा खास मराठी वा महाराष्ट्रीयन शिल्पप्रकार आहे. दीपमाळा अस्तित्वात येण्याआधी मंदिराच्या प्रांगणामध्ये उंच ठिकाणी दिवे लावत असत. शंकराच्या मंदिराबाहेर दीपदंड उभारण्याची प्रथा दक्षिणेतील प्राचीन मंदिरांत होती. समई हा दीपमाळांचा पूर्वप्रकार मानला जातो. या समया अगदी दहाबारा फूट उंचीच्याही असत. त्यांना दीपलक्ष्मी म्हणत. महाराष्ट्रात यादव काळानंतर मंदिरासमोर दीपमाळा उभारण्याची पद्धत सुरू झाली. काही अभ्यासकांच्या मते, दीपस्तंभ, दीपमाळ हा शिल्पप्रकार मिनार शिल्पाच्या प्रभावातून आला आहे. दीपमाळांमध्ये लावलेले दीपक पाहणे यातूनही पुण्य साधते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सरस्वती गंगाधरकृतगुरुचरित्राच्या ४४ व्या अध्यायात याबाबतआणिक घडले पुण्य एक। दीपमाळीच उजळले दीपक। ते म्यां डोळां देखिले अनेक।असे म्हटलेले आहे. शास्त्रानुसार मंदिर एकदा बांधून झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे भक्तांना मंदिरासाठी काही काम करायचे असेल तर दीपमाळ उभारली जाई. या दीपमाळांचा एक उद्देश मंदिराच्या प्रांगणात अनेक दिवे लावून प्रकाशाची व्यवस्था करणे हा असे

दिवेआगर येथील उत्तरेश्वराचे हे मंदिर पूर्वी कौलारू होते, असे सांगण्यात येते. ते पेशवे घराण्याचे परंपरागत श्रद्धास्थान होते. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या आजारपणात .. १७७२ मध्ये त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे या मंदिरात आल्याची नोंद आहे. पेशवे घराण्यात रोज ज्या ज्या देवतांच्या नावे नैवेद्य दाखविला जात असे, त्यात उत्तरेश्वर देवस्थानाचाही समावेश होता. दिवेआगरमध्ये सुवर्णगणेशाची स्थापना झाल्यानंतर सरकारकडून आलेल्या निधीतून सुवर्णगणेश मंदिरासह गावातील तीन मंदिरांचा जीर्णोद्धार नूतनीकरण करण्यात आले. त्यापैकी हे एक मंदिर होय

एका उंच जगतीवर हे मंदिर आहे. खुला सभामंडप, मुख्य सभामंडप त्यापुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. खुल्या सभामंडपातून मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. येथील गर्भगृह हेच मूळचे प्राचीन मंदिर आहे. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारात त्या भोवतीची बांधकामे होत गेली, असे सांगितले जाते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. हे गर्भगृह भूमिज स्थापत्यशैलीतील आहे. हेमाडपंती या नावाने ही शैली ओळखली जाते. जमिनीपासून काहीशा खोलवर असलेल्या या गर्भगृहाच्या मध्यभागी उत्तरेश्वराची स्वयंभू पिंडी आहे

या मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरच हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराच्या मध्यभागी एका वज्रपीठावर हनुमानाची उभी मूर्ती आहे. उत्तरेश्वर मारुती मंदिराच्या शेजारी कालभैरवाचे मंदिर आहे. उत्तरेश्वर मंदिराइतकेच ते प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या मध्यभागी कालभैरव जोगेश्वरी देवीच्या मुख्य मूर्ती आहेत. याशिवाय भवानी देवी क्षेत्रपाळ या देवताही आहेत. हे कालभैरव देवस्थान पंचक्रोशीतील महत्त्वाचे देवस्थान मानले जाते. कालभैरव मंदिराच्या मागच्या बाजूला काही पुरातन मूर्ती पाहायला मिळतात

महाशिवरात्र हा येथील प्रमुख उत्सव असतो. यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंती, नवरात्रोत्सव श्रीकृष्ण जन्मोत्सव हे उत्सवही येथे उत्साहात पार पाडले जातात. दररोज सकाळी .१५ ते रात्री .१५ या वेळेत भाविकांना उत्तरेश्वराचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती

  • श्रीवर्धनपासून १८ किमी, तर अलिबागपासून ७६ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, श्रीवर्धन, पुणे येथून थेट एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home