उनकेश्वर शिवमंदिर

उनकेश्वर, ता. किनवट, जि. नांदेड

महाराष्ट्राला निसर्गसौंदर्य आणि अध्यात्माचा मोठा वारसा लाभला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या गरम पाणी येते, ज्याला ‘उष्णोदके’ किंवा गरम पाण्याचे कुंड म्हटले जाते. ही ठिकाणे पर्यटनासोबतच धार्मिक दृष्ट्याही अत्यंत पवित्र मानली जातात. ज्या ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहेत, तेथे ईश्वरी शक्तीचा वास आहे, अशी भक्तांची श्रद्धा असते. अशा कुंडांच्या सान्निध्यात पूर्वीपासूनच मंदिरे उभी आहेत. यामुळेच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी व नांदेड जिल्ह्यातील उनकेश्वर येथील गरम पाण्याचे कुंड व तेथील देवस्थाने विशेष महत्त्वाची मानली जातात.

किनवट तालुक्यातील उनकेश्वर कुंडानजीकचे शिवमंदिर हे तेराव्या शतकातील असल्याचे येथील सन १२८१ सालच्या शिलालेखावरून स्पष्ट होते. या देवस्थानचा उल्लेख रामायणात आढळत असल्याचे या शिलालेखात म्हटले आहे. यात यादव राजा रामचंद्र देव, त्यांचा मांडलिक राजा भावक देव व प्रधान हेमाद्री पंडीत यांचेही उल्लेख सापडतात. तसेच मंदिरास इनाम दिलेल्या २० गावांचा उल्लेखही या शिलालेखात आहे. हे शिलालेख नागरी लिपीत व मराठी भाषेत कोरलेले आहेत.

रामायणाच्या १३ व्या अध्यायात अशी कथा आहे की शरभंग ऋषी त्वचारोगाने ग्रस्त होऊन उनकेश्वर येथे रामनामाचा जप करत तपस्या करीत होते. तेव्हा श्रीराम तेथे प्रकट झाले व त्यांनी जमिनीच्या दिशेने अग्निबाण सोडला. त्या बाणाच्या आघाताने जमिनीतून गरम पाण्याचे कारंजे उडाले आणि ते शरभंग ऋषींच्या अंगावर पडले. या औषधी पाण्याच्या स्पर्शाने शरभंग ऋषी तत्काळ रोगमुक्त झाले. तेव्हापासून आजतागायत या कुंडातून गरम पाणी सतत निघत आहे.

रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोर अर्धवट उंचीचे कुंपण असून पुढे मोकळे मैदान आहे. त्यानंतर मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत मंदिराचे महाद्वार दिसते. महाद्वारात दोन्ही बाजूस स्तंभ व त्यात दीपकोष्टके आहेत. स्तंभांवर अर्धचंद्र कमान व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर व तटबंदीवर संरक्षक कठडा आहे. मंदिराच्या प्रांगणात महाद्वाराच्या दोन्ही बाजूला तटबंदीला लागून भक्तनिवास व इतर वापराच्या इमारती आहेत. या इमारतींच्यामधून जाणाऱ्या अरुंद पायवाटेवरून चालत मंदिराच्या मोकळ्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील फरसबंदी प्रांगणात मंदिरासमोर डावीकडे कोरीव पाषाणात बांधलेले कुंड आहे. प्रभू श्रीरामांनी अग्निबाण मारून या कुंडाची निर्मिती केली, अशी मान्यता आहे. या कुंडात गरम पाण्याचे झरे असून कुंडाच्या चारही बाजूंनी संरक्षक कठडे आहेत.

मंदिराच्या उजव्या बाजूला दोन चौथऱ्यांवर प्राचीन दीपस्तंभ आहेत. त्यापैकी एक गोलाकार आहे व त्यावर दत्तात्रेयांची मूर्ती आहे. दुसरा दीपस्तंभ चौकोनी आहे. त्याच्या शीर्षभागी मंदिराच्या आकाराचे शिखर आहे. मध्यभागी सभामंडप, तर उजव्या व डाव्या बाजूस अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या सभामंडपास दोन्ही बाजूस समोरासमोर प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारास तीन द्वारशाखा व त्यांवर उभ्या पट्टीत नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या वर व डाव्या बाजूला प्राचीन शिलालेख आहेत. प्रांगणापेक्षा खोल असलेल्या सभामंडपात येण्यासाठी तीन पायऱ्या उतरून यावे लागते. सभामंडपात मध्यभागी पाण्याची विहीर आहे. विहिरीभोवती चार लघू स्तंभ, त्यावर छत व छतावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या विहिरीतील पाण्याने देवांचे नित्य अभिषेक केले जातात. सभामंडपातील जमीन फरशीने आच्छादित आहे. येथे असलेल्या कक्षात शरभंग ऋषींची समाधी आहे.

सभामंडपात डावीकडील वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील दुसरी मूर्ती आहे. अंतराळात दोन्ही बाजूला देवकोष्टके व त्यात देवमूर्ती आहेत. पुढे महादेवाच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची अस्पष्ट नक्षी व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प व उत्तरांगावर तोरणाची नक्षी आहे. उंबरठ्याला चंद्रशीला आहे. गर्भगृहात फरशीने आच्छादित जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या पिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे व जलधार धरणारे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर महादेव, पार्वती व गणपती यांची एकत्रित मूर्ती आहे. बंदिस्त गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्ष असून छताच्या आतील बाजूस (वितानावर) चक्राकार नक्षी आहे.
सभामंडपात उजवीकडे दुसऱ्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार डाव्या बाजूच्या गर्भगृहाप्रमाणेच आहे. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. मंदिराच्या छतावर चारही बाजूने कठडा आहे. शिवगर्भगृहाच्या छतावर असलेल्या चौकोनी निमुळत्या शिखरावर स्तुपी व कळस आहे. शिखराच्या चारही भिंतींवर प्रत्येकी दोन अंगशिखरे आहेत.

मंदिराच्या प्रांगणात वज्रपीठावर हंसारूढ सरस्वती देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर छत्र आहे. प्रांगणात तटबंदीला लागून असलेल्या चौथऱ्यावर सुदाम्याचे पाय चेपणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती आहे. प्रांगणात दुर्गामाता, यज्ञ करणाऱ्या शरभंग ऋषींचे शिल्प, साईबाबा, व्याघ्र शिल्प, महादेव शिल्प, शिवपिंडी तसेच अनेक देवी-देवतांची लहान-मोठी मंदिरे व त्यात देवमूर्ती आहेत.

मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव तसेच चैत्र पाडवा, रामनवमी व श्रावण मास हे उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, किर्तन, जागरण, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वार्षिक उत्सवांच्या वेळी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. आलेले भाविक आवर्जून येथील कुंडातील गरम पाण्यात स्नान करतात.

उपयुक्त माहिती:

  • किनवट येथून ४२ किमी अंतरावर
  • नांदेड येथून १६४ किमी अंतरावर
  • किनवट येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्तनिवास उपलब्ध

अनकेश्वर शिव मंदिर

अनकेश्वर, ताल. किनवट, जिला. नांदेड़

Back To Home