वन्यजीव व मानवी जीवन यांच्यातील दुवा म्हणता येतील अशा वनदेवता वनांचे तसेच मानवाचेही संरक्षण करतात. सृजनाच्या या दैवतांच्या नावापुढे आई हा मातृत्वदर्शक शब्द असतो. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर, ओळवण गावाच्या डोंगरात अशाच एका वनदेवता उगवाईचे प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. डोंगराच्या माथ्यावर असल्याने उगवत्या सूर्याची किरणे या देवीस अभिषेक घालून दिवसाची सुरूवात करतात म्हणून या देवीस उगवाई या नावाने ओळखले जाते. घनदाट जंगलात असलेली ही देवता जागृत आणि नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
राजर्षि शाहू छत्रपतींचे चिरंजीव आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजाराम (तृतीय) महाराज यांच्या कारकिर्दीत १९३९ साली उगवाई देवीचे हे मंदिर बांधण्यात आले. तसा शिलालेख मंदिराच्या प्रांगणात आहे. मात्र अन्य वनदेवतांच्या स्थानांप्रमाणेच उगवाई देवीचे येथील स्थान प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. संस्कृती अभ्यासकांच्या मते, घनदाट अरण्यात जीवन जगणाऱ्या मानवी समुहाच्या संस्कृतीचा वनदेवता हा अविभाज्य भाग होता व आहे. त्यामुळेच या देवतांचा व देवालयांचा इतिहास हा अगदी मानवी संस्कृतीच्या उगमापर्यंत पोहोचतो. असेच हे उगवाई देवीचे मंदिर अति प्राचीन असल्याचे सांगितले जाते. रानात पडणाऱ्या बी बियाण्यांतून नवसृजन घडते. ते घडवून आणणारी देवी म्हणून या देवतेस उगवाई असे संबोधले जाते, असेही भाविकांचे म्हणणे आहे.
गावाकडून डोंगराच्या पायथ्याशी आल्यानंतर पायरी मार्गाने डोंगरमाथ्यावर असलेल्या मंदिराकडे येता येते. दाट वनराजीत वसलेल्या या मंदिरापर्यंत येण्यासाठी काही वर्षांपूर्वी मोटाररस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे येथे येऊ इच्छिणाऱ्या वृद्ध, अपंग भाविकांची मोठी सोय झाली आहे. या कच्च्या रस्त्यापासून मंदिराच्या अंगणात जाण्यासाठी काही दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. अंगणात २०१४ साली पेव्हर ब्लॉकची फरसबंदी करण्यात आली. या अंगणावर भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याचे छत असलेला मंडप आहे. मुख्य मंदिराच्या दर्शनी भिंतीनजीक काही प्राचीन पाषाण मूर्तींचे तसेच येथील जुन्या देवालयाचे भग्न अवशेष मांडलेले आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडप आधुनिक बांधणीचा आहे व त्यातून गर्भगृहासाठी प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावर भिंतीलगत अनेक सतीशिळा आणि पाषाण मांडून ठेवलेले आहेत. येथील सर्व सतीशिळा या दोन शिल्पचौकटी असलेल्या आहेत. काही शिळांमध्ये एकाहून अधिक स्त्रिया दिसतात. तसेच एका चौकटीत पती-पत्नीबरोबर त्यांच्या मुलाचेही शिल्प कोरलेले आहे. शिळेतील दोनच शिल्पचौकटी, त्यातील शिल्पे आणि सतीशिळेचा अविभाज्य भाग असलेला कोपरापासून दुमडलेला हात आदींचे कोरीव कामात फारशी सुबकता नाही. यावरून या शिळा सामान्य कुटुंबांतून सती गेलेल्या स्त्रियांच्या स्मरणार्थ उभारण्यात आल्याचे दिसते. येथे येणाऱ्या महिला या सतीशिळांचीही हळद-कुंकू लावून पूजा करतात.
मंदिराच्या सभामंडपातून पुढे गर्भगृहाचे लाकडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर काळ्या चौकोनी पाषाणातील उगवाई देवीची उठावशिल्प प्रकारची मूर्ती आहे. येथे देवी अष्टभुजा, महिषासुरमर्दिनी रुपातील आहे. सिंहारूढ देवीच्या हातात त्रिशूल, तलवार, गदा, दंड, ढाल, अग्निकुंड, अमृतपात्र व पाश आहेत. देवीच्या पायाखाली महिषासुर पडला आहे व सिंहाने रेड्यास जखमी केले आहे. या मूर्तीतून देवीचा युद्धावेश स्पष्टपणे प्रतीत होतो. देवीच्या मस्तकी मुकुट आणि अंगावर वस्रालंकार आहेत. वज्रपिठाच्या उजवीकडे चतुर्भूज व शस्त्रसज्ज देवीची पाषाण मूर्ती आहे. डावीकडे महिषासुरमर्दिनीच्या रूपातील देवीचे प्राचीन शिल्प आहे.
या चौसोपी मंदिरावर पत्र्याचे छत व मध्यभागी ऊंच व निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या पायथ्याशी चौबाजूंनी बाशिंगी कठडा आणि शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. शिखरास उभ्या धारेची नक्षी आहे. मंदिरापासून काही पावलांवर लोखंडी शिडी असलेला उंच निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून फोंडाघाट व कोकण भूमीचा विस्तीर्ण प्रदेश दिसतो.
उगवाई देवी मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात फुलपाखरांच्या १२१ प्रजाती आढळतात. विविध जातीच्या पक्षांचे निरीक्षण व अभ्यास करण्यासाठी येथे पक्षी निरीक्षक येतात. येथून जवळच राधानगरी निसर्ग माहिती केंद्र, हत्ती महाल व माऊली कोड धबधबा आहे. मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व परिसरात निसर्ग निरिक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.
देव दिवाळीस येथे मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या जल्लोषात आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. परिसरातील हजारो भाविक या दिवशी देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. माहेरवाशिणी देवीची खणा नारळाने ओटी भरून देवीस साडी चोळी अर्पण करतात. या दिवशी पहाटे देवीस महाअभिषेक घालून पूजन केले जाते व देवीची पालखी मिरवणूक काढून ग्राम प्रदक्षिणा घडवली जाते. याशिवाय दर तीन वर्षांनी पौष शुक्ल दशमीला देवीचा गोंधळ मांडला जातो. चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांचे वेळी मंदीरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.