उभा महादेव मंदिर

मानवत, ता. मानवत, जि. परभणी

पांडवकाळात ‘मणिपूर’ म्हणून ओळखले जाणारे मानवत शहर उभ्या स्थितीतील शिवशंकर व पार्वतीमातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. १९३७ मध्ये एका शिवभक्ताला शिवशंकरांनी दृष्टांत दिला. त्यानंतर विहिरीचे खोदकाम करत असताना एकाच काळ्या पाषाणात घडवलेली शिव-पार्वतीची मूर्ती सापडली. येथील शिवाच्या मूर्तीवरील हावभाव दिवसातून तीन वेळा बदलतात असा भाविकांचा समज आहे. अन्य शिवालयांतील नंदी हा बसलेल्या स्थितीत असतो, मात्र या मंदिरातील शिव-पार्वती उभे असल्याने येथील नंदीही उभ्या स्थितीत आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला गोरज मुहूर्तावर येथे होणारा शिव-पार्वती विवाह सोहळा हे येथील मुख्य आकर्षण असते. विवाह इच्छुकांनी विवाह जमण्यासाठी या मंदिरात नवस करण्याची प्रथा आहे. लग्न जमल्यानंतर रामनवमीच्या आदल्या दिवशी मंदिर परिसरात त्यांचा विवाह सोहळा पार पडतो.

या मंदिराबाबतच्या आख्यायिकेनुसार या गावातील रहिवासी असलेले गंगाधर बापू स्वामी हे शिवभक्त होते. एके दिवशी ते त्यांच्या घरवजा मठातील तळघरात साधना करत होते. त्यावेळी शिवशंकरांनी त्यांना, “तुझे वास्तव्य असलेल्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम सुरू कर,” असा दृष्टांत दिला. त्यानुसार गंगाधर बापू स्वामी यांनी विहिरीचे खोदकाम सुरू केले. दहा ते पंधरा फुटांपर्यंत खोदकाम केल्यावर एका दगडी शिळेखाली शिव-पार्वतीची एकाच अखंड दगडात कोरलेली मूर्ती सापडली. महादेवाची उंची साडेचार फूट आणि पार्वतीची उंची साडेतीन फूट आहे. या मूर्तीच्या खालील भागात चार फूट उंचीची नंदीची मूर्तीही सापडली. गंगाधर स्वामी यांनी या मूर्तीची स्थापना आपल्या मठात केली. या मंदिराचे बांधकाम वावरा पद्धतीचे (साधी बांधकाम शैली) आहे. २०२३ मध्ये मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याचे नूतनीकरण करण्यात आले.

मानवत हे परभणीतील तालुक्याचे ठिकाण आहे. या गावाचे प्राचीन नाव ‘मणिपूर’ होते. मणिपूर ही पांडवकालीन बभ्रुवाहनाची राजधानी होती. अज्ञातवासादरम्यान धर्म आणि द्रोपदी यांचा एकांत भंग केल्यामुळे पापक्षालनार्थ अर्जुन तीर्थयात्रेला निघाला. तेव्हा मणिपूरचा राजा चित्रवाहन याची कन्या चित्रांगदा हिने अर्जुनाशी विवाह करण्याचा हट्ट धरला. त्यावेळी या दोघांपासून होणारा पुत्र मणिपूरचाच निवासी होईल आणि तो येथील कुलमर्यादांचे पालन करेल, अशी अट राजा चित्रवाहन याने घातली. पुढे अर्जुन अश्वमेध यज्ञासाठी या परिसरात आला. तेव्हा त्याचा मुलगा बभ्रुवाहन हा युद्धाची तयारी न करता अत्यंत नम्रपणे आणि विविध भेटवस्तू घेऊन आपल्या वडिलांचे स्वागत करण्यासाठी सामोरा गेला. क्षत्रिय धर्मानुसार, अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवून युद्ध करणे आणि आपले शौर्य सिद्ध करणे हे वीर पुरुषाचे कर्तव्य मानले जाते. बभ्रुवाहनाने तसे न करता शरणागती पत्करल्यासारखा शांततापूर्ण मार्ग पत्करल्यामुळे अर्जुनाला त्याचा अत्यंत राग आला. त्यामुळे अर्जुनाने बभ्रुवाहनाची कडक शब्दांत निर्भत्सना केली. अर्जुनाने त्याला म्हटले की तू एका पराक्रमी क्षत्रियाचा पुत्र असूनही रणभूमीवर युद्धाऐवजी व्यापाऱ्यासारखा केवळ भेटवस्तू घेऊन स्वागत करत आहेस, हे क्षत्रिय धर्माला शोभत नाही. अशा प्रकारे अर्जुनाने त्याच्या वीरतेवर शंका घेऊन त्याचा अपमान केला आणि त्याला कमी लेखले. वडिलांकडून मिळालेल्या या उपरोधिक वागणुकीमुळे आणि तिरस्कारामुळे दुखावलेल्या बभ्रुवाहनाने नंतर अर्जुनाचे आव्हान स्वीकारून त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा पराभव केला.

या शहराला पूर्वी एकूण सात वेशी असाव्यात. असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यापैकी एकाही वेशीचे अवशेष सध्या शिल्लक नाहीत. गावातील जामा मशिदीत या मशिदीच्या आधीचा एक दगड जतन करून ठेवण्यात आला आहे. त्यावर पर्शियन भाषेत ‘सन हिजरी ११११ कराम हुसेन ऊर्फ अब्दुल मलिक साहब’ असा शिलालेख आहे. असाच शिलालेख असलेला दगड शहरातील दर्गा मोहल्ल्यातील वेशीचा आहे. त्यावरून ही वेस आणि गावातील अन्य वेशी एकाच वेळी बांधण्यात आल्या असाव्यात असे मानण्यात येते.

शहरातील क्षत्रियवाडी परिसरातील रंगार गल्लीत उभा महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या उजवीकडे गणेशाचे स्थान आहे. ११० वर्षांपूर्वी येथे एका महिलेने केलेल्या नवसाच्या पूर्तीनंतर येथे गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. या गणेशाला ‘मानाचा गणपती’ असे म्हणतात. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. मुख्य मंदिरासमोर एक ओसरी आहे. सहा कमानी असलेला सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर गणेशाचे शिल्प आहे. वरच्या बाजूसही एक गणेश मूर्ती आहे. प्रवेशद्वाराची उंची काहीशी लहान आहे. गर्भगृहासमोर उभा नंदी आहे. गर्भगृहात शिव-पार्वतीची उभी मूर्ती आहे. शिवशंकरांना चार हात आहेत. उजव्या हातांमध्ये शंख आणि डमरू, तर डाव्या हातांमध्ये चक्र आणि त्रिशूळ आहे. त्यांच्या जटेमध्ये गंगा आहे.

शिवशंकरांच्या बाजूलाच पार्वती आहे. दिवसातून तीन वेळा शिवशंकरांच्या मूर्तीवर वेगवेगळे भाव दिसतात. सकाळी या मूर्तीचे रूप हसऱ्या चेहऱ्याच्या बालकासारखे असते. दुपारी क्रोधित रूप धारण केलेले प्रौढ रूप दिसते, तर सायंकाळी थकलेले वृद्ध रूप दिसते. ही रूपे बदलत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शिव-पार्वती दरदिवशी सायंकाळी नंदीवर बसून ग्रामप्रदक्षिणा घालतात, अशी लोकसमजूत असल्याने सायंकाळी या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ कोणी थांबू नये, असा संकेत पाळला जातो.

या मंदिरातच एके ठिकाणी गंगाधर बापू स्वामी यांची संजीवन समाधी आहे. या समाधीवर मुखवटा आहे. या समाधीस्थानापासून काही पावलांवर तळघरात जाण्याचा मार्ग दिसतो. गंगाधर बापू स्वामी या तळघरात ध्यान करत असत. या तळघरातून एक रस्ता मूर्ती सापडलेल्या विहिरीकडे जात असे. या विहिरीतून पाणी आणून गंगाधर बापू स्वामी शिव-पार्वतीची पूजा करत असत, असे सांगण्यात येते. या मंदिराच्या डाव्या बाजूस काही पावलांवर मूर्ती सापडलेली विहीर होती. सध्या ही विहीर बुजवण्यात आली आहे.

येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी येथे शिव-पार्वतीचा विधिवत विवाह सोहळा होतो. मनोकामना पूर्ण झालेले भक्त या सोहळ्याचे यजमानपद स्वीकारतात.

या विवाहसोहळ्यासाठी पत्रिकाही छापण्यात येते. आदल्या दिवशी मूर्तींना हळद लावण्यात येते. दुसऱ्या दिवशी दिवसभर येथे लगीनघाई असते. शिव-पार्वतीला नवीन वस्त्रे नेसवली जातात. दुपारी वऱ्हाडी मंडळींसाठी मिष्ठान्नांचा समावेश असलेल्या भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यानंतर शेवंतीचा कार्यक्रम होऊन गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. मुहूर्ताच्या वेळी मूर्तींना मुंडावळ्या बांधण्यात येतात. त्यांना चांदीचे मुकुटही चढवण्यात येतात.

सायंकाळी गोरज मुहूर्तावर मंत्रोच्चार व मंगलाष्टकांच्या स्वरात तसेच वाजंत्रींच्या निनादात शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो. या सोहळ्यादरम्यान सभामंडप तसेच मंदिराचा परिसर वऱ्हाडी मंडळींनी गजबजतो. अनेक महिला या सोहळ्यादरम्यान परिसरात फुगड्याही घालतात.

उपयुक्त माहिती

  • मानवत बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • परभणी येथून ३६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून परभणीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

उभ्भा महादेव मंदिर

मानवत, तालुका मानवत, जिला परभणी

Back To Home