उभा देव

वागदे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग


कणकवली शहराच्या बाहेर वागदे येथे गड नदीच्या किनारी असलेल्या घनदाट देवराईच्या अधिवासात उभा देव या देवतेचे स्थान आहे. ही देवता म्हणजे केवळ एक महाकाय अशी पाषाणशिळा आहे. या ठिकाणी दिवसभर भाविकांची जाये सुरू असते. दाट वनराई वर्दळीपासून दूरवर हे स्थान असल्याने येथे वनभोजनासाठीही लोक येत असतात. सूर्य मावळल्यानंतर मात्र या ठिकाणी कोणीही येत नाही. या स्थानाभोवती गूढतेचे मोठे वलय आहे. या देवास वागदेच्या ग्रामदेवतेचा चाळा असेही संबोधले जाते

कोकणातील गावऱ्हाटीनुसार (गावरहाटी) गावातील सर्व देव ग्रामदेवतेच्या अधीन असतात. त्यात सात्विक तसेच तामसी देवसुद्धा येतात. या तामसी देवांमध्ये वेताळ, देवचार, भूतनाथ, तसेच चेडा, चाळा यांचा समावेश होतो. मात्र कोकणात चाळ्यास देवत्वरूप देण्यात आले असून ही रक्षक देवता मानली जात आहे. चाळा हा गावावर येणारी संकटे, आपत्ती यांचे निवारण करण्याचे काम करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वाईट शक्तींपासून रक्षण करणे, मर्यादा शाबूत ठेवणे, तसेच गावातील व्यक्ती, प्राणी, वृक्षवल्ली यांचे रक्षण करणे हे या अज्ञात शक्तीचे काम आहे. वागदे ग्रामदेवतेचा हा चाळा मनोकामनांची पूर्ती करणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही वेशीवरची देवता असल्याने पूर्वी लोक प्रवास निर्धोक व्हावा म्हणून त्यास नवस करीत असत. त्याच प्रमाणे त्यास आजही इच्छापूर्तीसाठी नवस बोलला जातो

उभा देवास कोंबडा वा बकऱ्याचा नवस केला असेल तर तो बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी फेडला जातो. या दिवशी मांसाहार केला जातो. या ठिकाणचे वैशिष्ट्य असे की भाविक ज्या वस्तूच्या वा गोष्टीच्या इच्छेच्या पूर्तीसाठी नवस करतात, ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर, येथे ज्यासाठी नवस केला त्या वस्तूची वा गोष्टीची प्रतिकृती अर्पण करतात. एखाद्याने घराची वा वाहनाची वा पुत्राची इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस केला असेल आणि त्याची पूर्तता झाली की ती व्यक्ती येथे घराची, वाहनाची वा पाळण्याची लाकडी प्रतिकृती अर्पण करते. काही लोक घंटादान तसेच भोजनदानही करतात. उभ्या देवाच्या शिळेवर अशा अनेक वस्तू अडकवून ठेवलेल्या दिसतात. त्यात घंटा आणि पाळण्यांची संख्या लक्षणीय आहे

कणकवलीहून गोव्याच्या दिशेने जाताना महामार्गापासून आत काही अंतरावर गड नदीनजीक जुन्या सावंतवाडी संस्थानाची आणि पूर्वीच्या काळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या साळशी महालाची सीमा लागते. तेथेच महामार्गापासून आत घनदाट अशी देवराई आहे. देवराई हे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे. देवराई हा जंगलाचाच भाग किंवा वेगळे असे जंगल. ते देवाच्या नावाने राखलेली वनराई म्हणून त्यास देवराई असे म्हटले जाते. देवाप्रमाणेच ज्यांना देवत्व बहाल करण्यात आलेले आहे अशा देवता, प्राणी, भुतेखेते यांच्या नावानेही येथे जंगल राखले जाते. देवराईत मानवी हस्तक्षेप केला जात नाही. तेथे झाडे कापण्याचे कोणतेही हत्यार घेऊन जाण्यास मनाई असते. अनेक देवरायांमध्ये शुचिर्भूत होऊनच प्रवेश करण्याची प्रथा आहे. वनराईतील वाळलेली काटकी घेतली तरी देवाचा कोप होईल, असे भय लोकमानसात असते. तेथील झाडाची एखादी फांदी काही कारणाने तोडायचीच असेल तर देवाचा कौल घेतला जातो. अशा प्रथा आणि श्रद्धा यामुळे कोकणात अनेक ठिकाणची वनसंपदा जैवविविधता शाबूत राहिलेली आहे. वागदे येथील अशाच देवराईत नैसर्गिक अधिवासात उभा देव शतकानुशतके उभा आहे

हमरस्त्याच्या कडेला दाट झाडीमध्ये जाणाऱ्या एका छोट्या गाडी वाटेवरश्री उभा देव प्रसन्नहा फलक लावलेला आहे. या वाटेने दोनतीन मिनिटे अंतरावर आत गर्द झाडीमध्ये खाली मोठे खडक आहेत. येथे दोन लोखंडी पाईपांवरील आडव्या सळईला घंटा टांगलेल्या आहेत. त्या वेशीतून पाच पायऱ्या उतरून पुढे येताच एका मोठ्या वृक्षालगत उभ्या देवाची उंच रुंद शिळा दिसते. ही शिळा वरच्या बाजूने अर्धगोलाकार आहे. शिळेसमोर एक छोटा ओटा असून त्यावर चाळ्यांचे पाच पाषाण मांडलेले आहेत. येथेही दोन लोखंडी गोल खांब रोवलेले आहेत. त्यावरील आडव्या सळईला घंटा टांगलेल्या आहेत. अशाच घंटा, पाळणे, घर, वाहने आदींच्या अनेक छोट्या लाकडी प्रतिकृती या शिळेवर टांगलेल्या आहेत.

अष्ट दिशांच्या भिंती आणि आकाशाचे छत हेच या उभ्या देवाचे मंदिर मानले जाते. त्यास नैसर्गिक अधिवास पसंत असल्यामुळे येथे गाभारा बांधलेला चालत नाही. अलीकडे देवापुढील जागेची सफाई करून ती सपाट करण्यात आलेली आहे. बाजूला बसण्यासाठी म्हणून सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत. या मंदिरासमोर भाविकांच्या सुविधेसाठी छत बांधण्याची इच्छा काही व्यक्तींनी व्यक्त केली होती. मात्र ग्रामदेवतेच्या हुकूमानुसार असे करणे शक्य नाही, असे सांगत ग्रामस्थांनी त्यास मनाई केली. याबाबतची एक लोककथा अशी की काही लोकांनी येथे बैठकीसाठी काही बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर काही ना काही आपत्ती कोसळली. त्यामुळे आता तसा प्रयत्न करण्याचा विचारही कोणी करीत नाही. उभा देवाच्या दराऱ्यामुळे येथील देवराईलाही कोणी हात लावत नाही. आणखी एक लोककथा अशी की येथील वनराईत काही लोक मद्यपानाची पार्टी करीत होते. त्यांना येथे तसे करू नका असे सांगण्यात आले; परंतु त्यांनी ती विनंती धुडकावून लावली. मात्र त्यांची पार्टी रंगात आली असतानाच काही जणांना तेथे विंचू चावला, तर काहींना निरनिराळे आभास होऊ लागले. चार जणांना ताप भरला. कोणत्याही औषधोपचाराने तो उतरेना. अखेर त्यांनी उभा देवापुढे क्षमायाचना केली, तेव्हाच त्यांचा ताप उतरला. असेही सांगितले जाते की सूर्यास्तानंतर येथे कोणीही थांबत नाही. रात्रीच्या वेळी कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विविध आभास होतात, तसेच विचित्र गंध येतात. या अशा गोष्टींमुळे उभा देवाच्या परिसराचे पावित्र्य आणि तेथील वनराई टिकून आहे

उपयुक्त माहिती

  • कणकवली बस थांब्यापासून किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, रत्नागिरी कणकवलीसाठी एसटीची सेवा 
  • खासगी वाहने उभा देवाच्या स्थानापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home