तुळजाभवानी मंदिर

शेगाव-राहटगाव रस्ता, सिद्धिविनायक नगर, ता. जि. अमरावती

अमरावती शहराच्या पश्चिमोत्तर भागात शेगाव-राहटगाव रस्त्यावरील, सिद्धिविनायक नगरातील, विद्या वैभव कॉलनीमध्ये आदिशक्ती श्री तुळजाभवानीचे मंदिर वसले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या गेलेल्या तुळजाभवानीवर पंचक्रोशीसह विदर्भातील असंख्य कुटुंबांची कुलदेवता म्हणून दृढ श्रद्धा आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी स्थापन झालेले हे देवालय स्थानिक भाविकांचे एक श्रद्धास्थान बनले आहे. नवसाला पावणारी कुलदेवता अशी जनमानसात ख्याती असल्याने येथे नियमितपणे पूजाविधींसाठी भाविकांची वर्दळ असते. आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रौत्सव हा या मंदिरातील मुख्य वार्षिक लोकोत्सव मानला जातो.

तुळजाभवानी देवीच्या अवताराची मूळ कथा मार्कण्डेय पुराणातील ‘देवी माहात्म्य’ या भागात सविस्तर येते. देवगणांच्या वरदानामुळे उन्मत्त झालेल्या महिषासुर दैत्याने देव व मानवांना पीडा दिली, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासह सर्व देवतांच्या एकत्रित तेजातून अष्टभुजा महाशक्ती प्रकट झाली. या महाशक्तीने महिषासुराचा संहार करून विश्वाला अभय दिले आणि भक्तांच्या रक्षणासाठी सदैव अवतार घेण्याचे वचन दिले. स्कंद पुराणातील सह्याद्री खंड व तुळजापूर माहात्म्यानुसार, कृतयुगात अल्पायुषी ठरलेल्या कर्दम ऋषींच्या निर्वाणानंतर त्यांची तपस्वी पत्नी अनुभूती ही मंदाकिनी नदीतीरावर कठोर तपश्चर्या करत होती. त्यावेळी कुकुर नावाच्या असुराने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने आर्ततेने देवीची प्रार्थना करताच देवी तत्काळ प्रकट झाली आणि तिने कुकुर असुराचा वध केला. भक्ताच्या हाकेला अत्यंत ‘त्वरेने’ धावून आल्यामुळे ज्या देवतेला पुराणात ‘त्वरिता’ म्हटले गेले, त्याचे प्राकृत रूपांतर पुढे ‘तुळजा’ आणि ‘तुळजाभवानी’ असे झाले.

महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा विस्तीर्ण भूप्रदेशात तुळजाभवानीचे लाखो उपासक आहेत. कुलधर्म आणि कुलाचार संपन्न करण्यासाठी प्रत्येकाला उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील मूळ तुळजापूर तीर्थक्षेत्री जाणे नेहमी शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर उभारलेली मंदिरे भाविकांच्या कुलपरंपरेचा आधार ठरतात. याच गरजेतून अमरावती येथील सिद्धिविनायक नगर परिसरातील भाविकांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी या मंदिराची पायाभरणी केली. आधुनिक काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून उभी राहिलेली ही दुमजली वास्तू केवळ पूजेचे ठिकाण न राहता परिसरातील सामाजिक व कौटुंबिक संस्कारांचे केंद्र बनली आहे.

मुख्य रस्त्यावरून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पक्का रस्ता व समोर वाहनतळ आहे. मंदिर परिसराला दोन टप्प्यांतील तटबंदी आहे. बाहेरील पहिली तटबंदी साध्या पद्धतीची असून तिच्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर दुसरी भक्कम तटबंदी दृष्टीस पडते. ही आतील तटबंदी मराठाकालीन गढीच्या तटभिंतीसारखी दगडी स्वरूपात बांधल्यामुळे मंदिराला ऐतिहासिक कोटसदृश स्वरूप मिळते. मंदिराचे प्रांगण जमिनीच्या मूळ पातळीपेक्षा आठ ते दहा फूट खोल सखल भागात असल्याने पायऱ्या उतरून तेथे जावे लागते. या प्रांगणात मंदिराच्या दर्शनी भागासमोर होमकुंड बांधलेले आहे, जेथे नवरात्रात शतचंडी आणि चंडीयज्ञ पार पडतात. मंदिराची मूळ इमारत दुमजली रचनेची आहे. तळमजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम, कुलाचार व विवाह सोहळ्यांसाठी सभागृह आहे. पायरीमार्गाच्या सुरुवातीस स्वागतकमान उभारलेली दिसते. दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे आणि भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. वरच्या मजल्यावरील मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून तयार केलेल्या स्तंभरहित मुखमंडपाचे छत मुख्य सभामंडपाच्या छताशी अशा कौशल्याने जोडले आहे की ते कोणत्याही आधाराशिवाय अधांतरी तरंगल्यासारखे भासते. अर्धमंडपाचे प्रवेशद्वार दोन फूट उंच जगतीवर आहे. तेथे चढण्यासाठी पायऱ्या आणि विश्रांतीसाठी दोन्ही बाजूस कक्षासने दिली आहेत. अर्धमंडपास लाकडी दार आहे. सभामंडप, अर्धमंडप आणि अंतराळात पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी भिंतींमध्ये वातायने (खिडक्या) ठेवलेली आहेत.

गर्भगृहातील उंच वज्रपीठावर काळ्या पाषाणात घडवलेली तुळजाभवानीची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी मूर्ती आहे. देवीच्या उजवीकडील चार हातांमध्ये चक्र, बाण, पाश आणि महिषासुराच्या छातीवर रोखलेला त्रिशूळ दिसतो, तर डावीकडील चार हातांमध्ये शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शेंडी घट्ट पकडलेली दिसते. देवीच्या चरणांखाली रेड्याच्या स्वरूपातील महिषासुर आहे. देवीच्या पायालगत वाहन असलेला सिंह कोरलेला दिसतो, तर उजव्या बाजूला तपस्विनी अनुभूतीची आणि डाव्या बाजूला मार्कण्डेय ऋषींची लहान उठावशिल्पे साकारलेली आहेत. देवीच्या मस्तकावरील मुकुटावर लहानसे शिवलिंग कोरलेले आहे. मागील पाठशिळेवर सूर्य आणि चंद्राची चिन्हे कोरलेली दिसतात. देवीची ही मूर्ती विविध वस्त्रालंकारांनी आणि सुवर्णमुकुटाने सजवली जाते. मुख्य गर्भगृहाभोवती प्रदक्षिणेसाठी बाह्य प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या छतावर अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशा तिन्ही अंगांवर स्वतंत्र शिखरांची योजना केलेली आहे. चौरस पायावर आधारलेली ही शिखरे वर अष्टकोनी बनत शंकूच्या आकारात निमुळती होत जातात. या तिन्ही शिखरांवर वर्तुळाकार भागात तीन स्तरांमध्ये पद्मदलमंडलांचे कोरीव काम आढळते. शीर्षभागी आमलक आणि कळस बसवलेले आहेत. यात अर्धमंडपावरील शिखर लहान, सभामंडपावरील मध्यम, तर गर्भगृहावरील मुख्य शिखर सर्वाधिक उंच आहे.

दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत भाविकांना येथे दर्शन घेता येते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी मंदिरात महिला भाविक देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी येतात. स्थानिक महिला मंडळांकडून सभामंडपात नियमित भजनसेवा आयोजित केली जाते. शारदीय नवरात्रौत्सव हा येथील सर्वांत मोठा वार्षिक उत्सव मानला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेस विधीपूर्वक घटस्थापना करून या महोत्सवाची सुरुवात होते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मंदिरात अखंड नंदादीप प्रज्वलित ठेवला जातो. या काळात रोज सकाळी महाभिषेक, विशेष महापूजा, देवीचा विविध रूपांतील शृंगार आणि प्रांगणातील होमकुंडात शतचंडी महायज्ञ संपन्न होतो. नवमीच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते आणि विजयादशमीला पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन सोहळा पार पडतो. याशिवाय मंदिरात चैत्र नवरात्र, कोजागरी पौर्णिमा आणि दीपावली हे सण उत्साहात साजरे होतात.

उपयुक्त माहिती

  • अमरावती रेल्वे व एस. टी. बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • शहरातील विविध भागांतून एस. टी. व ऑटोरिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात तसेच अमरावती शहरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : अविनाशभाऊ होले, मो. ८८८८२६६७७७
Back To Home