लक्ष्मी नारायण मंदिर

ऋणमोचन (आमला), ता. दर्यापूर, जि. अमरावती

पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले लक्ष्मी नारायण मंदिर हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्र मानले जाते. अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देणारे थोर समाजसुधारक वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांनी उभारलेले हे पहिले मंदिर आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या या स्थानी कमळ, शंख, चक्र व गदा धारण केलेले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पाषाणमूर्ती प्रतिष्ठित आहे. संत गाडगे महाराजांच्या प्रत्यक्ष श्रमदानाने व समाजप्रबोधनाने पावन झालेल्या या भूमीत लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतल्याने सर्व प्रकारच्या चिंता आणि पाशांतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

ऋणमोचन हे नाव आणि या परिसराचा इतिहास जुन्या गॅझेटिअरमध्ये तपशिलाने नोंदवलेला आढळतो. सन १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सेंट्रल प्रोव्हिन्सेस डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर्स: अमरावती’ या अधिकृत गॅझेटिअरमधील नोंदीनुसार, ऋणमोचन हे पूर्णा नदीकाठचे एक विख्यात तीर्थक्षेत्र असून तेथे दरवर्षी पौष महिन्यातील चारही रविवारी मोठी यात्रा भरत असे. गॅझेटिअरमध्ये नोंदवल्याप्रमाणे ‘ऋणमोचन’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘कर्ज अथवा ऋणातून मुक्ती मिळणे’ असा होतो. हिंदू धर्मपरंपरेनुसार मानवी जीवनात देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण ही तीन मूलभूत ऋणे मानली जातात. येथील पवित्र नदीपात्रात स्नान करून ईश्वराची उपासना केल्याने या त्रिविध ऋणातून जिवाची सुटका होते, या भावनेतून या परिसरास ऋणमोचन हे नाव पडले. हे क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि दर्यापूर या तालुक्यांच्या सीमेवर, नदीपात्राच्या दोन्ही तीरांवर विस्तारलेले आहे. ब्रिटिशकालीन महसूल नोंदींनुसार, सन १८४० मध्ये हे गाव तत्कालीन अमरावती परगण्यातील एक जहागीर गाव म्हणून नोंदले गेले होते.

पौराणिक वाङ्‌मयात ज्या नदीचा उल्लेख ‘पयोष्णी’ असा आढळतो, तीच आजची पूर्णा नदी मानली जाते. ‘महाभारत’ ग्रंथातील वनपर्वात तसेच ‘पद्मपुराण’ आणि ‘स्कंदपुराण’ या प्राचीन ग्रंथांमध्ये पयोष्णी नदीचे पापनाशक तीर्थ म्हणून माहात्म्य विशद केलेले आहे. स्थानिक परंपरेनुसार, प्राचीन काळात मुद्‌गल ऋषींनी या नदीच्या तीरावर आश्रम स्थापून दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येमुळे नदीच्या पूर्व तीरावर मुद्‌गलेश्वर या नावाने स्वयंभू शिवलिंग प्रतिष्ठित झाले. वैदिक मान्यतेनुसार, विश्वाचे पालनकर्ते भगवान श्रीविष्णू हे संकटात सापडलेल्या जिवांना अभय देणारे व मोक्ष प्रदान करणारे अधिष्ठान मानले जातात, तर आदिशक्ती महालक्ष्मी ही समृद्धी आणि शांतीची देवता आहे. शैव आणि वैष्णव परंपरेचा सुरेख संगम या ऋणमोचन क्षेत्रात पाहायला मिळतो. येथे एका तीरावर मुद्‌गलेश्वर महादेवाचे शिवालय उभे आहे, तर दुसऱ्या तीरावर गाडगे महाराजांनी स्थापन केलेले लक्ष्मी नारायणाचे वैष्णव देवालय भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र ठरले आहे.

२३ फेब्रुवारी १८७६ रोजी दर्यापूर तालुक्यातील शेडगाव येथे जन्मलेल्या डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे महाराजांच्या लोककल्याणकारी कार्याची प्रत्यक्ष सुरुवात याच ऋणमोचन भूमीतून झाली. वयाच्या तिसाव्या वर्षी संसाराचा त्याग करून समाजोद्धाराची वाट धरताना, अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला सन्मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी श्रद्धेला विधायक वळण दिले. ऋणमोचन येथे दरवर्षी भरणाऱ्या मुद्‌गलेश्वराच्या यात्रेत प्रत्यक्ष झाडू चालवून, रोग्यांची शुश्रूषा करून आणि गोरगरिबांसाठी अन्नछत्र चालवून महाराजांनी समाजसेवेचा आरंभ केला. लोकमानसातील अंधश्रद्धा दूर करताना शुद्ध भक्तीचा प्रवाह सुरू राहावा यासाठी गाडगे बाबांनी लोकसहभागातून सन १९०५ मध्ये नदीच्या पश्चिम तीरावर पक्का दगडी घाट बांधला आणि त्याच वर्षी लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना केली. पुढे सन १९०८ मध्ये त्यांनी नदीच्या पूर्व तीरावर मुद्‌गलेश्वर मंदिरालगत दुसरा विस्तीर्ण घाट उभारला. सन १९३२ मध्ये महाराजांनी येथे अन्नछत्रासाठी अखंड सदावर्त सुरू केले. भाविकांच्या सहकार्याने पुढे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि परिसराचा विस्तार करण्यात आला.

मुख्य रस्त्यावरून मंदिराच्या आवारात प्रवेश करताच पेव्हर ब्लॉक बसवलेले वाहनतळ दृष्टीस पडते. वाहनतळावर दुमजली चौथरा उभारलेला असून पुढे स्वागत कमानी लागतात. प्रांगणातून नदीच्या घाटाकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची रचना केलेली आहे. प्रांगणात भक्तनिवास, सेवेकऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानचे कार्यालय आणि जुन्या ओवऱ्या आहेत. एका उंच जगतीवर लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे आहे. मंदिराच्या दर्शनी भागात अर्धखुल्या रचनेचा सभामंडप आहे. या सभामंडपाच्या भिंतीलगत एका वज्रपीठावर हनुमानाची शेंदूरलेपित पाषाणमूर्ती आहे. सभामंडपातून दोन पायऱ्या चढून आल्यावर सन १९०५ मध्ये बांधलेल्या बंदिस्त गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते. दर्शनी भिंतीच्या दोन्ही बाजूंना दीपकोष्टके असून भिंतीवर संगमरवरी शिलालेख बसवलेला आहे. गर्भगृहाच्या लाकडी झडपा असलेल्या प्रवेशद्वारावर स्तंभशाखा कोरलेल्या आहेत आणि त्यावर महिरापी तोरण आणि ललाटबिंबावर श्रीविष्णूचे उठावदार शिल्प आहे. फरसबंदी गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावर कोरलेल्या पाषाणी मखरात श्री लक्ष्मी आणि नारायण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठित आहेत. चतुर्भुज नारायणाच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म कोरलेली आहेत व शेजारी द्विभुज लक्ष्मी मातेचा एक हात अभयमुद्रेत आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. दोन्ही मूर्तींच्या मस्तकावर मुकुट आणि अंगावर आभूषणे कोरलेली आहेत. मखरावर महिरप व त्यावर दोन्ही बाजूंना चक्राकृती नक्षीकाम आढळते.

गर्भगृहाच्या डाव्या भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे व उजव्या बाजूस एक अतिरिक्त दरवाजा आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या मंडोवरावर स्तंभनक्षी आणि छतावर निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. त्यावर आमलक आणि कळस आहे. मुख्य मंदिरासमोर सभामंडपाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या बद्रीनाथ स्वामींच्या मंदिरात संगमरवरी मूर्ती आणि पद्मपादुका आहेत. या मंदिराला चार थरांचे शिखर आहे. याचे खालील तीन थर षटकोनी आणि चौथा थर गोलाकार आहे. प्रांगणातील तटबंदीला जोडून असलेल्या सलग देवकोष्टकांमध्ये संत गाडगे महाराज, संत गजानन महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री दत्तात्रेय आणि संत मुक्ताबाई यांच्या मूर्ती आहेत.

दररोज सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत व दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. प्रत्येक एकादशी आणि गुरुवारी येथे विशेष विष्णू सहस्रनाम अर्चन आणि तुळशीपत्र पूजेचे आयोजन केले जाते.

पौष महिन्यातील यात्रा हा या परिसरातील सर्वांत मोठा वार्षिक उत्सव मानला जातो. पौष महिन्यातील चारही रविवारी पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर भाविकांची गर्दी उसळते. नदीच्या पैलतीरावरील मुद्गलेश्वर महादेवाचे दर्शन घेणारे हजारो भाविक या तीरावर येऊन लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतात आणि घाटावर स्नान करतात. या संपूर्ण महिन्यात मंदिरात अखंड भजन, कीर्तन, संत साहित्यावरील प्रवचने आणि संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय वैकुंठ एकादशी, गोकुळाष्टमी, कोजागरी पौर्णिमा आणि २० डिसेंबर रोजी होणारा संत गाडगे महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव येथे भक्तिभावाने साजरा केला जातो. पुण्यतिथीच्या निमित्ताने अन्नदान, महाप्रसाद आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन होते.

उपयुक्त माहिती

  • बडनेरा जंक्शन रेल्वे स्थानकापासून ३५ किमी अंतरावर
  • अमरावती शहरापासून ३८ किमी अंतरावर
  • मूर्तिजापूर जंक्शन रेल्वे स्थानकापासून २२ किमी अंतरावर
  • अमरावती, दर्यापूर, अकोला व भातकुली येथून एसटी बस व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात देवस्थानचे भक्तनिवास, धर्मशाळा आणि भोजनप्रसादाची सुविधा
  • संपर्क : उत्तमराव देशमुख, अध्यक्ष, मो. ९४२२१९१४१८, वसंतराव देशमुख, मो. ९८५०३७४०७८
Back To Home