गडगडेश्वर महादेव मंदिर
पटवीपुरा, ता. अमरावती, जि. अमरावती
महादेवाच्या सहस्रनामावलीमध्ये ‘गडगडेश्वर’ हे संबोधन अत्यंत विरळ मानले जाते. पौराणिक परंपरेतील कथेनुसार, प्रजापती दक्षाच्या यज्ञात सती पार्वतीने योगाग्नीत स्वतःचे शरीर समर्पित केल्यानंतर भगवान शंकराला अनावर दुःख आणि तीव्र संताप झाला. त्या संतापाच्या भरात महादेवाने आकाशात ढगांचा गडगडाट व्हावा तसा तीव्र सिंहनाद केला, ज्या नादाने दाही दिशा थरथरल्या. त्या प्रलयंकारी नादावरून महादेवाला ‘गडगडेश्वर’ हे नाव पडले. भारतभरात या नावाची मोजकीच देवालये आढळतात. त्यापैकी एक प्राचीन देवालय ओडिशा राज्यातील कटक येथे महानदीच्या तीरावर गडगडिया महादेव या नावाने प्रसिद्ध आहे, तर दुसरे देवालय अमरावती शहरात पटवीपुरा भागात असून भाविकांचे ते मोठे श्रद्धास्थान मानले जाते.
अमरावती शहराला प्राचीन काळापासून ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स. १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एस. व्ही. फिट्झगेराल्ड आणि ए. ई. नेल्सन संपादित ‘अमरावती डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर’मधील नोंदींनुसार, या शहराचे नाव येथील पुरातन अंबादेवी मंदिरावरून ‘अंबानगरी’ आणि पुढे ‘अमरावती’ असे रूढ झाले. शहराभोवती मध्ययुगीन काळात दगडी परकोट आणि भक्कम वेशी उभारलेल्या होत्या.
परकोटाच्या खोलापूर वेशीकडून बाहेर पडणाऱ्या मार्गावर, तसेच हिंदू स्मशानभूमी व कालंका माता मंदिरासमोरील रस्त्याने पटवीपुरा भागात जाता येते. पेशवेकाळ व निजामाच्या अमदानीत जुन्या शहराच्या तटबंदीबाहेर विविध व्यावसायिक कारागिरांच्या पेठा वसल्या. त्या काळात रेशीम आणि पटवेकामाचे (रेशमी धागे, जरी किंवा सुती दोऱ्यांच्या सहाय्याने विविध दागिने आणि वस्तूंची गुंफण, विणकाम किंवा सजावट करण्याची पारंपरिक कला) कारागीर या भागात वास्तव्यास आल्याने या परिसराचे नाव ‘पटवीपुरा’ पडले. मुख्य शहराच्या वस्तीपासून किंचित अलिप्त व शांत परिसरात हे देवालय उभे आहे.
शिवपुराण आणि स्थानिक स्थलमाहात्म्यानुसार दक्षयज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्राच्या उत्पत्तीपूर्वी महादेवाने केलेल्या तांडवप्राय नादाची स्मृती या देवस्थानाशी जोडली गेलेली आहे. मंदिराविषयी अशी मौखिक आख्यायिका सांगितली जाते की प्राचीन काळी या निर्जन आणि झाडीने वेढलेल्या परिसरात नागा साधूंचे मोठे जत्थे हत्ती, घोडे आणि उंटांवर स्वार होऊन येत असत. हे साधू येथे चातुर्मासात चार महिने मुक्काम ठोकून कठोर तपश्चर्या, यज्ञ आणि होमहवन करत. त्या काळात या परिसरातील एक इच्छाधारी नाग मानवी रूप घेऊन नित्यनेमाने महादेवाच्या आरतीला उभा राहात असे.
तो नाग आजही गुप्त रूपात स्त्री अथवा पुरुषाचे रूप घेऊन आरतीच्या वेळी मंदिरात हजेरी लावतो, अशी दृढ श्रद्धा स्थानिक भाविकांमध्ये आहे.
हे देवालय अमरावती शहरातील जुन्या वास्तूंपैकी एक मानले जाते. स्थानिक अभ्यासकांच्या मते या मंदिराचा मूळ गाभारा तेराव्या शतकातील यादवकालीन असावा, तर काही इतिहास संशोधकांच्या मते या वास्तूचा इतिहास सुमारे पाचशे ते सहाशे वर्षे जुना आहे. मंदिराचा निश्चित स्थापनाकाळ दर्शवणारा कोणताही शिलालेख अथवा ताम्रपट आज उपलब्ध नसला, तरी तळघरातील वास्तुरचना आणि जुनी शिवपिंड मंदिराची प्राचीनता सिद्ध करते. काळाच्या ओघात मूळ गाभाऱ्याभोवती नवीन सभामंडप आणि इतर पूरक दालने बांधून मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहिली स्वागतकमान बांधलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चौथऱ्यांवर प्रत्येकी चार गोलाकार स्तंभ उभारून त्यावर सज्जा तयार केला आहे. या सज्जावर मध्यभागी बाशिंग आणि दुतर्फा दोन मेघडंबऱ्या आहेत. त्या मेघडंबऱ्यांमध्ये देवप्रतिमा व छतावर छोटी शिखरे आणि कळस बसवलेले आहेत.
स्वागतकमानीतून पुढे आल्यावर मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवलेले मोकळे प्रांगण लागते. प्रांगणात उजव्या हाताला पार बांधलेला पुरातन वटवृक्ष उभा आहे. मंदिरासमोर चार स्तंभांवर आधारलेले, अर्धखुल्या रचनेचे लहान मंदिर उभे आहे. त्यात जमिनीवर स्वयंभू शिवपिंड आहे आणि छतावरील शिखरावर कळस आहे.
मुखमंडप, गूढमंडप आणि गर्भगृह अशी या देवालयाची रचना आहे. मुख्य वास्तूला जोडून नव्याने बांधलेल्या मुखमंडपाच्या छताला मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. यानंतर बंदिस्त स्वरूपाचा गूढमंडप लागतो. या गूढमंडपात प्रवेश करताच उजव्या बाजूच्या स्वतंत्र देवकक्षात हनुमानाची आणि डाव्या बाजूच्या देवकक्षात श्रीराम व सीतेच्या पाषाणमूर्ती दृष्टीस पडतात. या मंडपाला डाव्या व उजव्या बाजूस आणखी दोन दरवाजे आहेत. सभामंडपातील गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर बारा ज्योतिर्लिंगांची चित्रे रेखाटलेली आहेत. येथून भुयारी गर्भगृहाच्या दिशेने उघडणाऱ्या गवाक्षात पितळी धातूची रेखीव नंदीमूर्ती बसवलेली आहे आणि तिच्या शेजारी धातूचा मोठा त्रिशूळ उभा आहे.
सभामंडपाच्या पुढे गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथून सुमारे आठ फूट खोल असलेल्या तळघरातील गर्भगृहात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. या भुयारी गर्भगृहाच्या मध्यभागी स्वयंभू शिवपिंड आहे. ही पिंड नक्षीदार पितळी पत्र्याने मढवलेली आहे. त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आणि छताला तांब्याचे अभिषेकपात्र टांगलेले आहे. त्यातून अखंड जलधारा पिंडीवर पडत असते. पिंडीच्या एका बाजूला गणपतीची पितळी मूर्ती आणि त्रिशूळ ठेवलेला आहे. गर्भगृहावर निमुळते होत गेलेले षटकोनी शिखर आहे. मंदिरालगत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठे सभागृह, मागे विविध झाडांचे पुष्प उद्यान आणि आवारात सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत.
भाविकांना येथे सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन घेता येते. मंगळवारपासून रविवारपर्यंत ही वेळ सकाळी सहा ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री दहा अशी असते. दर सोमवारी, संकष्टी चतुर्थीला, प्रदोषाला तसेच पौर्णिमा आणि अमावस्येला मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. महाशिवरात्र हा गडगडेश्वर मंदिरातील सर्वांत मोठा वार्षिक उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त मंदिरात सलग सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताहामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, शास्त्रीय भक्तिसंगीत आणि महाप्रसादाचे आयोजन होते. महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात. श्रावण महिन्यात महिनाभर मंदिरात धार्मिक विधींचा अखंड ओघ सुरू असतो. श्रावणी सोमवारी कावडधारी भाविक नद्यांचे पवित्र जल घेऊन कावड यात्रा आणि शोभायात्रा काढतात व गडगडेश्वरावर जलाभिषेक करतात. याशिवाय चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, विजयादशमी आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे सणही पारंपरिक पद्धतीने साजरे होतात.
उपयुक्त माहिती
- अमरावती रेल्वे व एसटी बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
- बडनेरा रेल्वे जंक्शनपासून ८ किमी अंतरावर
- शहरातील राजकमल चौक व इतर भागांतून एसटी व ऑटो रिक्षांची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : रमेशकुमार सारडा, अध्यक्ष, मो. ९४२३४२६३०३, रामरतन हेडा, मो. ९३२५३००९८४
