त्रिविक्रम मंदिर

तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव

तेर गाव हे इतिहास संशोधक व पुरातत्व विभागासाठी गेली अनेक वर्षे एक कोडे ठरले आहे. एखाद्या गावाचे व्यापार केंद्र अथवा सत्ता केंद्र म्हणून असलेले महत्व हजार अथवा त्याहून अधिक वर्षे टिकून राहणे आश्चर्यच म्हणावे लागेल. त्याशिवाय येथील प्राचीन मंदिरांमुळे या गावास धार्मिक केंद्र म्हणूनही महत्त्व प्राप्त होते. संत गोरा कुंभार यांनी या गावास धार्मिक क्रांतीचे केंद्र बनवले होते. या परीसरात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या भाजलेल्या विटा आजही सापडतात. ज्या हलक्या असल्याने पाण्यावर तरंगतात. याच गावात विटा व लाकूड ही सामुग्री वापरून बांधलेले त्रिविक्रम मंदिर हे प्राचीन व प्रसिद्ध आहे.
तेर हे इसवीसन चौथ्या शतकापासून मानवी वस्ती असलेले गाव अथवा शहर असल्याचे अनेक पुरावे सापडतात. पुरातत्वीय उत्खननात हे सिद्ध झाले आहे. दुसऱ्या शतकातील ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमी याच्या नोंदी, चालुक्य, शिलाहार आदी राजघराण्याच्या नोंदी या शहराचे व त्रिविक्रम मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करण्यास पुरेशा ठरतात. सुमारे बाराव्या शतकात याच मंदिराच्या प्रांगणात संतांचा महामेळावा भरला होता. ज्याचे नेतृत्व संत गोरा कुंभार यांनी केले होते. यावेळी संत नामदेव महाराज यांनी किर्तन केले. त्यानंतर इथे किर्तन करणाऱ्या महाराजांच्या पायाखाली सतरंजी न टाकण्याची प्रथा सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे.
प्रभाकर देव यांनी त्यांच्या ‘टेम्पल्स ऑफ मराठवाडा’ या ग्रंथात हे मंदिर चौथ्या शतकातील असल्याचे म्हटले आहे. इतिहासकार व पुरातत्त्व अभ्यासक पर्सी ब्राउन यांच्या मते हे मंदिर पाचव्या शतकातील असावे. भारतीय इतिहासाचे लेखन करणारे आयरलँडमधील विन्सेंट स्मिथ यांनी हे मंदिर आठव्या शतकातील असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. तरीही हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर आहे या गोष्टीवर सर्वच पुरातत्ववेत्त्यांचे एकमत आहे.
हे मंदिर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मोकळ्या मैदानात आहे. मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. ती मंदिराइतकीच जुनी असावी, असे भासते. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात अर्ध्याहून अधिक जागेत गाडल्या गेलेल्या अधिष्ठानावर पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरासमोर उंच चौथरा व त्यावर चढण्यासाठी सात पायऱ्या आहेत. चौथऱ्यावर डाव्या बाजूला चार नक्षीदार स्तंभ, मागे भिंत व वर घुमटाकार शिखर असलेल्या मेघडंबरीत गरूड मूर्ती आहे. शिखरावर आमलक व कळस आहे. मेघडंबरीच्या उजव्या बाजूला चौकोनी तुलसी वृंदावन आहे. तुलसी वृंदावनात असलेल्या देवकोष्टकात मारूतीची मूर्ती आहे. तुलसी वृंदावनाच्या उजव्या बाजूला लहान आकाराचे पिंडेश्वर मंदिर आहे. मंदिरात पूर्वाभिमुख शिवपिंडी व मागील भिंतीवर पंचफणी नाग, गणपती व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. मंदिरावर चौपाखी छत, छतावर चारही कोनांवर लघुशिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत. छतावर मध्यभागी मोठे आमलक व त्यावर कळस आहे.
त्रिविक्रम मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर चार पायऱ्या आहेत. मंडोवर विटांनी बांधलेले आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा व झडपा लाकडी आहेत व वरील बाजूस त्रिकोणी कमान आहे. सभामंडपात चार नक्षीदार लाकडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. विटांनी बांधलेले स्तंभपाद काहीसे रूंद आहेत. स्तंभदंड खाली चौकोनी व शीर्षभागी अष्टकोनी आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी चौकोनी कणी, त्यावर हस्त, तुळई व तुळईवर छत आहे. प्रत्येक चार स्तंभांमधील वितान अष्टकोनी व नक्षीदार आहे. मध्यभागी चक्राकार नक्षी आहेत. स्तंभ, कणी, हस्त, तुळई व छत लाकडी आहेत. हा लाकडी गूढमंडप नंतरच्या काळात बांधला गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजवीकडे आणखी एक प्रवेशद्वार आहे. सभामंडपातील बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. भिंती भाजलेल्या विटांपासून बनवलेल्या आहेत. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी यज्ञकुंड आहे.
सभामंडपापुढे अंतराळ आहे. येथे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस दोन स्तंभ आहेत. या स्तंभांवर हस्त व त्यावर तुळई आहे. तुळईला खालील बाजूने महिरपी कमान तयार होईल, अशा प्रकारचे नक्षीदार हस्त आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखा साध्याशा आहेत व त्यांवर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. गर्भगृहाची रचना चैत्यगृहासारखी आहे. ते सभामंडपापेक्षा खाली असल्यामुळे चार पायऱ्या उतरून यावे लागते. गर्भगृह २६ फूट बाय १२ फूट आकाराचे आहे. गर्भगृहाच्या चैत्यगृहासारख्या रचनेमुळे ते मुळात बौद्ध मंदिर होते व नंतर त्याचे हिंदू मंदिरात रूपांतर करण्यात आले, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. गर्भगृहाचे वितान गजपृष्ठ आकारात आहे. येथील छताची उंची सुमारे वीस फूट आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर त्रिविक्रम विष्णूची पाषाणी मूर्ती आहे. मूर्तींचा एक पाय खाली व दुसरा पाय ९० अंशात वर जमिनीला समांतर आहे. विष्णूच्या पायाशी बळीराजा, त्याची पत्नी व राक्षस गुरू शुक्राचार्य यांच्या मूर्ती आहेत. विष्णूच्या दुसऱ्या पायाशी लक्ष्मी बसलेली आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर स्तंभनक्षी आहेत. सभामंडपाचे छत सपाट व गर्भगृहाचे गजपृष्ठाकार आहे. मंदिराच्या बाहेर सभामंडपाच्या भिंतीलगत चौथरे आहेत. प्रांगणात मंदिराच्या बाजूला लिंबवृक्षाखाली पार आहे. या पारावर किर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, बळीप्रतिपदा इत्यादी सण उत्साहाने साजरे केले जातात. महाराष्ट्रातील या आद्य मंदिराचा अभ्यास करण्यासाठी व येथील लाकूड काम पाहण्यासाठी अनेक अभ्यासक येथे येतात.

उपयुक्त माहिती

  • धाराशिवपासून ३० किमी अंतरावर
  • धाराशिव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home