देवीच्या औट पीठांच्या म्हणजेच साडेतीन शक्तिपीठांच्या गणनेत पहिला क्रमांक असलेले करवीर हे आदिशक्ती महालक्ष्मी-अंबाबाईचे स्थान. ‘काशी’हून ‘यवाधिक’ म्हणजे किंचित सरस असलेल्या या ‘दक्षिण काशी’मध्ये कात्यायनी देवी, सिद्ध बटुकेश्वर, ज्योतिबा आणि त्र्यंबुली देवी या चार संरक्षक देवता आहेत. त्यातील त्र्यंबुली देवी म्हणजेच टेंबलाई. तिच्या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या टेंबलाई टेकडीवर या देवीचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. त्र्यंबुली देवी ही महालक्ष्मीची सखी आहे व तिला भेटण्यासाठी दरवर्षी ललिता पंचमीस साक्षात महालक्ष्मी आपल्या लवाजम्यासह या टेकडीवर जात असते.
दाजीबा जोशीराव यांनी लिहिलेल्या ‘करवीर माहात्म्य’ या मराठी ग्रंथामध्ये त्र्यंबुली देवीचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी ‘क्षेत्राच्या पूर्व दिशेस। एक कोशावरी सुरस। त्र्यंबुली वसे रक्षणास। ऐसा क्षेत्रमहिमा असे।।’, असे म्हटले आहे. याच ग्रंथाच्या ३८ व्या अध्यायात त्यांनी त्र्यंबुली देवीचे आख्यान मांडले आहे. या देवीच्या जन्माची अशी आख्यायिका सांगण्यात येते की प्राचीन काळी कौंडिण्य नावाचे एक ऋषी होते. सत्यवती ही त्यांची पत्नी. मात्र ती आपल्या सेवेत कुचराई करीत आहे व आपल्यापेक्षा अतिथीच्या सेवेतच अधिक लक्ष घालत आहे, असे एकदा कौंडिण्य ऋषींना वाटले. संतापून त्यांनी तिला शाप दिला की तू पुढील जन्मी दासी होशील. त्यावेळी सत्यवतीने त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. मात्र त्याच वेळी पतीने दिलेला शाप नम्रपणे स्वीकारला. तेव्हा कौंडिण्य ऋषींनी तिला उःशाप दिला की तू दासी होशील, परंतु जगदंबेची.
मांगले गावात भार्गव आणि विशालाक्षी नावाचे एक दाम्पत्य होते. त्यांची मुले जन्मल्यावर पाच दिवसांच्यावर जगत नसत. त्यांनी जगदंबेला नवस केला की माझे मूल जगू दे. ते मी तुला अर्पण करीन. हा नवस ऐकल्यावर सत्यवतीने विशालाक्षीच्या गर्भात प्रवेश केला व एका सुंदर कन्येच्या रूपात जन्म घेतला. तीच ही त्र्यंबुली देवी. तिला पुढे नवस केल्याप्रमाणे या दाम्पत्याने जगदंबेच्या सेवेस दिले.
याच दरम्यान कोल्हासुराचा नातू कामाक्ष हा त्याच्या वधाचा बदला घेण्यासाठी पेटला होता. त्याने शुक्राचार्यांकडून योगदंड पळवला व त्या योगे त्याने महालक्ष्मीसह सर्व देवांचे रूपांतर बकऱ्यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबुलीने कामाक्षाचा पाडाव करून देवदेवतांची सुटका करण्याचे ठरवले. तिने वृद्ध स्त्रीचे रूप घेतले. कामाक्षाला जड टोपली उचलून देण्याच्या बहाण्याने गुंतवून त्याच्याकडील योगदंड तिने हस्तगत केला आणि त्याच योगदंडाने कामाक्षाला बकरा बनविले. तिने त्यानंतर देवदेवतांना पूर्वरूपात आणले. तेव्हा सारे आनंद साजरा करत असताना त्र्यंबुलीची कोणी दखल घेतली नाही. त्या अपमानामुळे त्र्यंबुली या टेकडीवर जाऊन पूर्वेला तोंड करून करवीर नगरीकडे पाठ करून बसली. जगदंबेच्या ध्यानात हा सारा प्रकार आल्यानंतर ती त्र्यंबुलीचा रुसवा घालवण्यासाठी स्वतः तेथे गेली. त्यावेळी महालक्ष्मीने तिला सांगितले की कोल्हासुराच्या नावाने दरवर्षी माझ्या मंदिरातील मुक्ती मंडपात जो कोहळा-भंजनाचा कार्यक्रम होतो, तो आता माझ्या नव्हे, तर तुझ्या दारात होईल. प्रत्येकाला माझ्या दर्शनाबरोबरीने तुझ्या दर्शनाला यावे लागेल. तुझ्याकडे भक्तांच्या पाप-पुण्याचा निवाडा करण्याचा अधिकार राहील. तेव्हापासून त्र्यंबुली देवी येथेच वास्तव्यास आहे.
एका उंच टेकडीवरील प्रशस्त पटांगणाच्या एका बाजूला त्र्यंबुली देवीचे मंदिर उभे आहे. या टेकडीवर येण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे, तसेच गाडीरस्ताही आहे. मध्ययुगीन शैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिराचा निश्चित काळ अज्ञात असला तरी ते १७ व्या शतकातील असावे, असे सांगण्यात येते. सभामंडप आणि गर्भगृह अशी या प्राचीन मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर अलीकडच्या काळात सिमेंट काक्रिटमध्ये एक मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे. या मंडपात एका स्तंभाजवळ शिवरायांच्या मावळ्याचा पूर्णाकृती पुतळा द्वारपालाच्या रूपात ठेवलेला आहे.
मंदिराच्या सभामंडपात कोल्हापुरातील अनेक जुन्या मंदिरांत आढळतात तशा प्रकारचे कोरीवकाम केलेले १६ दगडी स्तंभ आहेत. खालच्या बाजूस चौकोनाकार, मध्यभागी अष्टकोनी आणि वर चौकोनाकार अशा प्रकारचे हे भक्कम स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगेतून समोरच्या गर्भागाराकडे वाट जाते. या मंडपात मध्यभागी संगमरवरी कूर्मप्रतिमा आहे. मंडपाचे छत मोठ्या दगडी तुळयांनी तोललेले आहे व जमिनीवर मात्र अलीकडच्या काळात बसवलेली संगमरवरी फरशी आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार दगडी आहे. सोनेरी रंगकाम केलेल्या द्वारचौकटी, नक्षीदार आहेत. ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. आत उंच चौथऱ्यावर त्र्यंबुलीमाता म्हणजेच टेंबलाईची पाषाणमूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज आहे व तिच्या हातात योगदंड, धनुष्य, चक्र आणि तलवार आहे. मूर्ती वस्त्रालंकारांनी सजवलेली आहे. त्यामुळे केवळ मूर्तीच्या मुखाचेच दर्शन होते. तिच्या मस्तकी पाषाणात कोरलेला मुकुट आहे. येथे उत्सवकाळात चांदीचा मुकुट ठेवला जातो. मूर्तीच्या मागील चांदीच्या मखरावर कीर्तिमुख कोरलेले आहे. देवीचे दर्शन करून बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूंनी छोटे मार्ग आहेत. गर्भगृहावर पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. येथे काही मर्कटशिल्पेही दिसतात.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला डावीकडे चाफ्याच्या झाडालगत मोठ्या दगडी चौथऱ्यावर दोन प्राचीन दीपमाळा आहेत. त्यांच्या मधोमध सिंहाची मूर्ती आहे. या चौथऱ्यालगत दोन चौकटींचा वीरगळ आहे व त्याला शेंदूर लावलेला आहे. त्याची येथे पूजा केली जाते. या नजीक पंचनंदीकेश्वराचा मंडप आहे. त्यासमोर महादेवाचे मंदिर आहे. आत भूतलावर प्राचीन शिवपिंडी आहे. पिंडीसमोर दगडात अर्धवट कोरलेला नंदी आहे. पिंडीच्या मागच्या बाजूस चौथऱ्यावर विठ्ठल-रुक्मिणी, गणपती आणि दत्ताच्या छोट्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या पायऱ्यांजवळ शेंदूर फासलेले वीरगळ दिसतात. येथील पंचनंदीकेश्वराचा मंडप आणि महादेवाचे मंदिर हे दोन्हीही १९५४ मध्ये बांधलेले आहेत.
त्र्यंबुली मंदिराच्या मागच्या बाजूस म्हसोबाचे स्थान आहे. देवीच्या मंदिरापासून काही अंतर दूर मरगाई देवीचे मंदिर आहे. त्र्यंबुलीमातेचे दर्शन घेण्यापूर्वी मरगाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. मरगाईदेवीचे स्थानही प्राचीन आहे. ती अंबाबाईची सखी असल्याचे सांगण्यात येते. मंदिर दगडी चिऱ्यांत बांधलेले आहे. मंदिरावर पायऱ्या पायऱ्यांच्या आकाराचे शिखर व त्यावर गोलाकार आमलक आहे. मंदिरासमोर नवीन पद्धतीचा सभामंडप आहे. मरगाईच्या मुख्य मंदिराला छोटा सभामंडप आहे व तेथील चार प्राचीन दगडी स्तंभ उठून दिसतात. गाभाऱ्यात धातूच्या सोनेरी मखरात, वज्रपीठावर मरगाई मातेची मूर्ती विराजमान आहे.
टेंबलाईच्या या टेकडीवर मरगाई मंदिरापासून जवळच केलेल्या बागेत गणेशाची मोठी मूर्ती आहे. कोरीवकाम केलेल्या सिंहासनावर विराजमान झालेली श्रींची मूर्ती सुबक आहे. बाजूला मुषक हे त्याचे वाहन आहे. त्यावर पत्र्याची गोलाकार शेड करण्यात आली आहे. गणेशोत्सवात भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. काही अंतरावर एका गोलाकार रिंगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. महाराजांच्या दोन्ही बाजूला दोन मावळ्यांचे पुतळे आहेत. अशा प्रकारचे मावळ्यांचे, शेतकरी दाम्पत्याचे पुतळे, तसेच शेंदूर फासलेले पाषाण व वीरगळ या टेकडीवर अन्यत्रही दिसतात.
मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार. या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. येथे वर्षातून तीन वेळा त्र्यंबुली देवीचे महत्त्वाचे उत्सव साजरे होतात. आषाढात या देवीसाठी मांसाहारी नैवेद्य केला जातो. श्रावणात भाजी-भाकरीचा नैवेद्य असतो. अश्विन महिन्यातील ललिता पंचमीचा उत्सव येथे अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. त्या मुहूर्तावर साक्षात महालक्ष्मी अंबाबाई त्र्यंबुली देवीच्या भेटीला येते. महालक्ष्मी मंदिरातून येथे देवीची पालखी आणली जाते. गाभाऱ्यात दोन्ही देवींची गळाभेट होते. मग एका कुमारिकेला आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होतो. कुमारिका पूजन झाल्यानंतर बावड्याचे गावकामगार पाटील कोहळ्याला त्रिशूल लावतात आणि कोहळा फोडला जातो. हा कोहळा म्हणजे कोल्हासुराचे प्रतीक असते. कोहळ्यावर कोल्हासुराचे नाक, कान, डोळे, तोंड रंगवलेले असते. त्याला टोपी घातलेली असते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने येथे भाविक येतात.