हिंदू धर्मात शैव व शाक्त पंथ एकमेकांना पूरक व सहाय्यक असले तरी अनेक बाबतीत शाक्त पंथियांच्या प्रथा, परंपरा व देवता वेगळ्या आहेत. टेंभीआई शाक्त पंथातील एक देवता आहे. टेंभा म्हणजेच मोठा दिवा. या शब्दाचे स्त्रीरूप म्हणजे टेंभी हे प्रकाशाचे प्रतीक आहे. अज्ञान, अन्याय, अलक्ष्मी, अस्थिरता दूर करणाऱ्या या देवीच्या आशीर्वादाने मानवी जीवनाचे कल्याण होते, अशी मान्यता आहे. टेंभीआई नवदुर्गा, १०८ शक्ती तसेच ६४ योगिनींपैकी एक मानली जाते. या देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर भूम तालुक्यातील भवान वाडी गावाजवळील डोंगरात आहे.
बाराव्या शतकातील या मंदिराचे काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर त्याला सध्याचे स्वरूप आलेले आहे. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका अख्यायिकेनुसार या देवीने तुळजाभवानीसोबत अनेक राक्षसांचा वध केला. पुढे दोन्ही देवींचा बेबनाव झाल्याने ही देवी येथे येवून स्थपित झाली. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार टेंभीआई ही रेणूकादेवीचे एक रूप आहे. राक्षसांचा वध केल्यानंतर ती तांदळा स्वरूपात येथेच स्थापित झाली.
गावापासून काही अंतरावर असलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर, गावाजवळ मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. मंदिरासमोर असलेल्या प्रशस्त वाहनतळापर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. मंदिराच्या सभोवती आवारभिंत आहे. या तटबंदीतील प्रवेशद्वारावर स्वागतकमान आहे. कमानीत दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ व त्यावरील तुळईवर महिरपी बाशिंग आहे. बाशिंगांवर मध्यभागी टेंभीआई देवीचे चित्र आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तटबंदीला लागून विविध वृक्ष असलेले उद्यान आहे. मंदिराच्या प्रांगणात डाव्या बाजूला चौथऱ्यावर सुमारे चार ते पाच फूट उंच गोलाकार व वर निमुळत्या होत गेलेल्या चार दीपमाळा आहेत. दीपमाळांच्यावर पाषाणी दिवे (माल्टा) आहेत.
प्रांगणात मंदिरासमोर तुलसी वृंदावन आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे.
प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपात येण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपाची समोरील बाजू खुली आहे. सभामंडपात हवा खेळती राहण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतींत खिडक्या आहेत. मध्यभागी जमिनीवर कासव शिल्प व बाजूला देवीची उत्सव काळात वापरली जाणारी पालखी आहे. सभामंडपात गर्भगृहाकडे डाव्या व उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावर दोन प्रवेशद्वारे आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात चार नक्षीदार स्तंभ व त्यावर महिरपी शिखर असलेला मखर आहे. मखरावर पानाफुलांची नक्षी व मखरात देवीचा स्वयंभू तांदळा आहे. देवीचा मुकूट व डोळे चांदीचे आहेत. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे.
सभामंडपाच्या छतावर चहुबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या खालील चार थरात प्रत्येकी सहा देवकोष्टके व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. पहिल्या थरात प्रत्येक दोन देवकोष्टकांमधे गजराज शिल्पे, दुसऱ्यात सिंह शिल्पे, तिसऱ्यात कुंभथर व चौथ्या थरात स्तंभ शिल्पे आहेत. शिखराच्या पाचव्या थरात एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे.
चैत्र वद्य अष्टमी हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात भजन, किर्तन, जागरण, गोंधळ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त देवीचा पालखी सोहळा साजरा केला जातो. जत्रोत्सव काळात विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. यात गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, पूजा साहित्य, मनोरंजनाची साधने आदी वस्तूंच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. यात्रेनिमित्त हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.
शारदीय नवरात्रौत्सव हा येथील दुसरा वार्षिक उत्सव असतो. यावेळी सलग दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात दसरा, दिवाळी, संक्रांत, श्रावण मास आदी सण व उत्सव साजरे केले जातात. दर पौर्णिमेला, मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची येथे गर्दी असते. सर्व सण व उत्सवांच्या वेळी देवीची साडी-चोळी व खणा-नारळाने ओटी भरून मंदिरात पीठ व मीठाच्या परड्या भरण्याची प्रथा आहे.