जळगाव शहरापासून जवळच असलेल्या तरसोद, नशिराबाद आणि मुरारखेडा या गावांच्या सीमेवर सतराव्या शतकातील जागृत गणपती मंदिर आहे. तरसोद गणपती म्हणून ते प्रसिद्ध आहे. पद्मालयाचे सिद्धपुरुष श्री गोविंद महाराज, आळंदी देवाची येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज व नशिराबाद येथील झिपरू अण्णा महाराज या मंदिरात एकत्र भेटत असत. असे सांगितले जाते की शेगाव येथील गजानन महाराजही झिपरू अण्णांना भेटण्यासाठी या मंदिरात आले होते. या महान साधूसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण जिल्ह्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
येथील नोंदींनुसार, इ.स. १६६२ साली मुरारखेडा या गावातील मोरेश्वर हणमंत देशमुख यांनी या मंदिराची स्थापना केली होती. त्यावेळी नाईक निंबाळकर यांच्या अखत्यारीत हा प्रांत होता. नवसाला पावणारा म्हणून पूर्वीपासून या गणपतीची ख्याती आहे. आधी मराठे व त्यानंतर पेशव्यांच्या फौजा उत्तरेकडे जेव्हा लढायांसाठी जात असत तेव्हा मुरारखेडा व तरसोद या परिसरात त्यांचा तळ असे. मुलुखगिरीची कामगिरी निर्विघ्न पार पडावी, यासाठी या तरसोद गणपतीला मराठा व पेशवे सरदारांकडून साकडे घातले जात असे. या मंदिराची नोंद शेगाव संस्थानातील एका प्राचीन दप्तरातही असल्याचे सांगितले जाते.
असे सांगितले जाते की या मंदिरपासून काही अंतरावर असलेल्या नशिराबाद येथील भाविक संकष्टी चतुर्थीला एरंडोल येथील गणेशाचे अर्धपीठ असलेल्या पद्मालय देवस्थानात ‘आमोद’ आणि ‘प्रमोद’ गणेशाच्या दर्शनासाठी जात असत. गोविंदशास्त्री बर्वे हे थोर गणेशभक्त तेथे राहत होते. गणेशाच्या साक्षात्कारानंतर त्यांनी प्राचीन पद्मालय मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. एके दिवशी या सिद्धपुरुषांनी नाशिराबादच्या भक्तांना सांगितले की पद्मालयातील गणतीचे एक रूप नाशिराबादजवळील तरसोद गावात आहे. त्यानंतर परिसरातील भाविक तरसोद येथील गणपती मंदिरात पुजेसाठी येऊ लागले. काही दिवसांनी स्वतः गोविंदशास्त्रींनी येथे येऊन या गणपतीची महापूजा केली होती.
तेव्हापासून प्रत्येक मंगळवारी, संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी व अंगारिका चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी येऊ लागले. जिल्ह्यातील अनेक नवविवाहीत दाम्पत्ये या गणपतीच्या दर्शनानंतर आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात करतात.
तरसोद गावाच्या सीमेवर असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. या भिंतीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. चार पायऱ्या चढून जमिनीपासून काहीशा उंच असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात एका संगमरवरी चौथऱ्यावर नंदी व मुषकाच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. येथील गर्भगृह हे प्राचीन मूळ मंदिर आहे. नंतरच्या काळात त्याभोवती सभामंडप बांधल्याचे जाणवते. या गर्भगृहाला एक लहानसा दरवाजा आहे. त्यातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर असलेल्या चांदीच्या मखरात गणपतीची शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिराच्या प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर महादेवाचे मंदिर आहे. खुल्या स्वरुपाच्या या मंदिरात मध्यभागी शिवपिंडी आहे. याशिवाय मंदिर परिसरात मारुती व एकविरा देवी यांची मंदिरे आहेत. या परिसरात अनेक वृक्ष व एक प्राचीन विहीर आहे. या मंदिराला लागून एक ‘हातेड नाला’ आहे. असे सांगितले जाते की येथे आलेल्या पुराच्या पाण्यात एकदा हत्ती वाहून गेला होता. त्यामुळे या नाल्यास हातेड हे नाव पडले. मंदिराशेजारी प्रशस्त वक्रतुंड मंडप व भक्तनिवास आहे.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेला (त्रिपुरारी पौर्णिमा) या मंदिरात यात्रा असते. माघ शुद्ध चतुर्थीस येथे गणपतीचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात दररोज सकाळी ७.३० वाजता महाआरती, दुपारी माध्यान्ह आरती व सायंकाळी सूर्यास्त आरती होते. संकष्टी व अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ५.३० वाजता काकड आरती व सकाळी ७.३० वाजता महाआरती होते. या आरतींसाठी शेकडो भाविक येथे उपस्थित असतात. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या गणेशाचे दर्शन घेता येते. अंगारकी व संकष्टी चतुर्थीला मंदिर सकाळी पाच वाजल्यापासून रात्री १० पर्यंत खुले असते.