तपेश्वर महादेव मंदिर

लोहारा, ता. मानवत, जि. परभणी

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या लोहारा गावाजवळ तपेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. कृषी शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र असलेल्या परभणी जिल्ह्याला संत जनाबाईंचे जन्मस्थान गंगाखेड, संत साईबाबांचे जन्मस्थान पाथरी, जिंतूरचे नेमिनाथ जैन मंदिर आणि जगप्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांचे जन्मगाव बोरी यांसारखा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लोहारा येथील तपेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे प्राचीन शिवालय असून या मंदिरातील शिवलिंग जागृत आणि नवसाला पावणारे आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराच्या स्थापनेचे अचूक वर्ष उपलब्ध नसले तरी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर चालुक्यकालीन मानले जाते. चालुक्य राजवंशाचा कार्यकाळ सहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत राहिला आहे. मंदिरावरील कोरीव शिल्पे, स्थापत्यशैली आणि भौतिक रचना यांवरून या वास्तूची निर्मिती प्रामुख्याने आठव्या ते बाराव्या शतकाच्या कालखंडात झाली असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘परभणी जिल्हा गॅझेटिअर’मध्ये या मंदिरासंदर्भात व चालुक्य कालखंडाबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानुसार, चालुक्य राजांनी भारताच्या विस्तृत भूप्रदेशावर राज्य केले. या कालखंडात त्यांनी तीन स्वतंत्र शाखांच्या माध्यमातून सत्ता चालवली. बदामीच्या चालुक्य राजांनी सहाव्या शतकाच्या मध्यापासून वातापी येथून राज्य केले. बनवासी येथील कदंब राजवंशाच्या ऱ्हासानंतर बदामीच्या चालुक्यांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापित केले. सम्राट पुलकेशी दुसरा याच्या कारकिर्दीत चालुक्य साम्राज्याचा विस्तार वेगाने झाला. आठव्या शतकाच्या मध्यात राष्ट्रकूटांच्या उदयामुळे बदामीच्या चालुक्यांची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांच्याच वंशजांनी, म्हणजेच कल्याणीच्या पश्चिम चालुक्यांनी आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. या पश्चिम चालुक्यांनी बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत बसवकल्याण येथून राज्याचा कारभार चालवला. या आठव्या ते बाराव्या शतकाच्या दीर्घ ऐतिहासिक कालखंडात हे शिवालय उभारले गेले. मंदिराच्या विविध भागांवर शैव, वैष्णव आणि इतर पंथांशी संबंधित असलेली शिल्पे पाहता, या वास्तूचा विकास वेगवेगळ्या टप्प्यांवर झाला असल्याचे दिसून येते.

लोहारा गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. शेतीक्षेत्रात असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूर्वी मार्ग उपलब्ध नव्हता, परंतु अलीकडच्या काळात स्थानिक शेतकऱ्यांनी जमीन दान केल्यामुळे आता मंदिरापर्यंत थेट रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मंदिराच्या समोरील प्रांगणात कोरीव पाषाणामध्ये बांधलेला एक चौथरा व त्यावर एक प्राचीन दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या पायथ्याशी सभोवताली हत्तींच्या आकृत्या कोरलेला गजथर आहे. हे शिवालय स्थापत्यरचनेनुसार तीन दिशांना तीन मुखमंडप, एक सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा स्वरूपात आहे. तिन्ही मुखमंडपांच्या प्रवेशद्वारी हनुमान, भैरवनाथ, यक्ष आणि यक्षिणी यांची शिल्पे कोरलेली आहेत. समोरील मुखमंडपामध्ये, सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीशिल्पाच्या दोन जोड्या म्हणजेच एकूण चार नंदीमूर्ती स्थापित आहेत. या मूर्तींची घडण पाहता त्या वेगवेगळ्या कालखंडातील असल्याचे स्पष्ट होते. या संदर्भात स्थानिक पातळीवर एक लोककथा सांगितली जाते. ती अशी की पूर्वी गावातील एका सावकाराचा बैल हरवला होता, तेव्हा त्याने बैल सापडल्यास पाषाणमूर्ती अर्पण करण्याचा नवस महादेवाला केला. सावकाराचा बैल सापडल्यानंतर त्याने पाषाणाचा नंदी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवला. अशाच प्रकारे इतर भाविकांनीही नवस फेडल्यामुळे येथे एकूण चार नंदीशिल्पे एकत्र आली आहेत. मंदिराच्या या बंदिस्त स्वरूपाच्या मुखमंडपांच्या आतील भिंतींवर विष्णू आणि महादेवाची विविध रूपे दर्शवणारी कोरीव शिल्पे आहेत.

मंदिराच्या बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपामध्ये प्रत्येकी चार नक्षीदार पाषाणस्तंभांच्या एकूण चार रांगा आहेत. यातील मध्यवर्ती चार स्तंभांच्या मध्यभागी एक वर्तुळाकार रंगशिळा आहे. प्राचीन काळात देवाच्या रंगभोगासाठी या ठिकाणी नृत्य आणि संगीत सेवा सादर केली जात असे. सभामंडपातील हे सर्व स्तंभ चौकोनी आकाराच्या स्तंभपादावर उभे असून त्यांच्या चौकोनी स्तंभदंडावर विविध देवीदेवतांच्या आकृत्या आणि नक्षीकाम कोरलेले आहे. स्तंभांच्या शीर्षभागावर कणी आणि त्यावर भारवाहक हस्त जोडलेले आहेत. या हस्तांवर ठेवलेल्या जड पाषाणी तुळयांवर सभामंडपाचे संपूर्ण छत तोललेले आहे. छताच्या अंतर्गत वितानावर वर्तुळाकार चक्रनक्षी कोरलेली आढळते. सभामंडपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांमध्ये देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती आहेत.

सभामंडपाच्या पुढील भागात अंतराळ आहे. अंतराळातील डाव्या आणि उजव्या बाजूच्या देवकोष्टकांमध्ये अनुक्रमे गणपती व हनुमान यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. तसेच अंतराळाच्या भिंतींवर विविध देवीदेवतांची कोरीव शिल्पे आढळतात. अंतराळाच्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर विविध स्तरांचे नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर श्रीगणेशाचे शिल्प कोरलेले आहे. खालच्या उंबरठ्यापाशी अर्धवर्तुळाकार चंद्रशिळा जोडलेली आहे. मंदिराचे गर्भगृह सभामंडपाच्या पातळीपेक्षा सुमारे चार फूट खोल आहे व तिथे खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या केंद्रस्थानी जमिनीवर पाषाणाची शिवपिंड स्थापित आहे. गर्भगृहाखाली असलेल्या जिवंत झऱ्यांमुळे अनेकदा ही पिंड पाण्याखाली असते. हे शिवालय अंतर्गत भागातून मुरलीधर आणि गिरिधारी कृष्ण यांच्या विविध शिल्पांनी व मूर्तींनी सुशोभित आहे. वास्तूच्या बाह्यभिंतींवर भैरवनाथ, मारुती, गणपती, विष्णू, रुद्र आणि इतर देवीदेवतांची शिल्पे कोरलेली दिसतात.

फाल्गुन शुक्ल द्वादशी या तिथीला येथे आमली बारस हा वार्षिक जत्रोत्सव आयोजित केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात एकत्र येतात. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी मंदिरात महाभिषेक केला जातो आणि सायंकाळी नवसाचे बारा गाडे ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडतो. या दिवशी मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन आणि होमहवन यांचे आयोजन केले जाते, तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण होते. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या विशेष दिवसांमध्ये मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न होतात. याशिवाय नागपंचमी, हनुमान जयंती, श्रावण पौर्णिमा, दसरा आणि दिवाळी हे वर्षभरातील इतर सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. प्रत्येक आठवड्यातील सोमवार, प्रदोष, पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींनाही मंदिरात भाविकांची विशेष उपस्थिती असते. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात तपेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • मानवत येथून २६ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून ३० किमी अंतरावर
  • मानवत येथून लोहारापर्यंत एसटीची सुविधा
  • गावातून खासगी वाहनांतून मंदिरापर्यंत येता येते
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही

तपेश्वर महादेव मंदिर

लोहारा, तालुका मानवथ, जिला परभणी

Back To Home