हिंदू वैदिक धर्मात जलदेवता पूजनाची प्राचीन परंपरा आहे. ऋग्वेदांत वर्णन केलेली वरुण ही जल अधिपती देवता आहे, तर त्याची पत्नी वारुणी ही नदी, सरोवर व तलावातील जलसाठ्यांची देवता असल्याची मान्यता आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की वरुण देवतेमुळे पृथ्वीवर चांगला पाऊस पडतो, तर वारुणी देवी ही जल साठ्यांचे रक्षण करते. वारुणी देवी प्रमाणेच सप्तमातृका किंवा माऊली देवी या जलदेवतांच्या पूजनाचीही परंपरा आहे. त्यामुळे अनेक नद्या, सरोवरे व तलावांच्या काठावर जलदेवतांची मंदिरे आढळतात. गारगोटी तालुक्यातील अंबावणे येथे स्थित असलेले तळेमाऊलीचे मंदिर त्यापैकीच एक प्राचीन देवस्थान आहे.
तळेमाऊली या देवीबद्दल असे सांगण्यात येते की तिचे मूळ स्थान रांगणा किल्ल्यावर आहे. समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचावर असलेला रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध असा गिरीदुर्ग आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे. मात्र बांधकामावरून तो आदिलशाही काळातील असावा असे सांगण्यात येते. शिवकाळात तो आदिलशाही सरदार सावंत याच्या ताब्यात होता. इ.स. १६६६ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला. नंतर शेवटपर्यंत तो मोगलांना कधी जिंकून घेता आला नाही.
या किल्ल्यावरील तलावाच्या काठावर रांगणाई देवीचे मंदिर आहे. प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई यांच्या ‘देवीकोशा’च्या तिसऱ्या खंडातील उल्लेखानुसार, ‘शिवनेरी किल्ल्यातील देवीला जसे किल्ल्याच्या नावावरून शिवाई हे नाव पडले, तसेच रांगणा किल्ल्यातील या देवीला रांगणाई हे नाव पडले.’
अंबावणे गावातील मंदिराची अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी येथे रांगणाई देवीचा एक निस्सीम भक्त होता. तो अनेकदा रांगणा किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी जात असे. इतरवेळी मात्र तो अंबावणे गावातील तलावाजवळ देवीची भक्ती व ध्यानधारणा करीत असे. त्याच्या भक्तिभावाने रांगणाई देवी त्याला प्रसन्न झाली व त्याच्या समोर प्रकट होऊन तिने वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवीने कायम अंबावणे गावात वास्तव्य करावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करत देवीने तथास्तु म्हटले. तेव्हापासून येथे रांगणाई देवीचे स्थान आहे. तलावाजवळील देवी म्हणून तिला येथे तळेमाऊली हे नाव पडले. ही देवी या परिसरातील जलसाठ्यांचे रक्षण करते, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
अंबावणे गावापासून ४ किमी अंतरावर गर्द हिरवाईच्या परिसरात तळेमाऊली देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या मुखमंडपात जाण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) असला तरी प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी त्यात अनेक खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपास गर्भगृहाच्या बाजूला डाव्या व उजव्या बाजूस प्रवेशद्वारे आहेत. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात मध्यभागी तळेमाऊली देवीची तांदळा स्वरूपाची पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाचे सात थरांचे छत वरच्या बाजूस निमुळते होत गेलेले आहे. शिखराच्या वरच्या थरात कमळाची प्रतिकृती असलेले आमलक व त्यावर कळस आहे.
दर पौर्णिमेला येथे रांगणा माऊली पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी देवीचा महाअभिषेक केला जातो. सायंकाळी ६ ते ७.३० आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो. याशिवाय रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन होते. या उत्सवासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. चैत्र पाडवा, चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्रोत्सव, दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा आदी वार्षिक उत्सवात हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवकाळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ व भाविकांसाठी महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आठवड्यातून केवळ मंगळवार, शुक्रवार व रविवारी भाविकांना या मंदिरात जाऊन तळेमाऊलीचे दर्शन घेता येते.