‘माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मारीत मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन’, अशी प्रतिज्ञा वयाच्या १४व्या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांनी भगूर येथील अष्टभुजा मातेसमोर केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या देवीला पुढे स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता म्हणून ओळखले जाऊ लागले.
दारणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावाला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथे महर्षी भृगू ऋषींचे वास्तव्य होते. ते स्थापत्यशास्त्राचे तज्ज्ञ समजले जात. नाशिकमधील काळाराम मंदिर भृगूवास्तुशास्त्रानुसार बांधल्याचे मानले जाते. त्यांनी ऋग्वेद, अथर्ववेद, भृगूसंहिता, भृगू आयुर्वेदसंहिता, भृगूस्मृती (मनस्मृती), भृगू गीता (वेदान्तविषयक), भृगूसिद्धांत आणि भृगूसूत्र आदी ग्रंथ लिहिले. असे सांगितले जाते की भृगू ऋषींनी दंडकारण्यातील या परिसरात साधना केली व गुरुकुल उभारले, म्हणून या परिसराला ‘भार्गव’ असे नाव पडले होते. त्याचे पुढे ‘भगूर’ झाले. भृगू ऋषींचे वास्तव्य, शिवकाळ, पेशवाईतील कर्तृत्वाच्या कहाण्या, असा वारसा भगूरला लाभला आहे. सावरकरांनी भगूरवर लिहिलेली ‘भार्गव’ ही कविता गावाचे महात्म्य वर्णन करते. सशस्त्र चळवळींमुळे इंग्लंडमध्ये ‘डँबिस गाव’ अशी भगूरची नोंद होती.
लोकमान्य टिळकांनी स्वराज्य चळवळीचे रणशिंग फुंकण्यापूर्वी भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची जाहीर मागणी करणारे प्रथम भारतीय म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ओळख आहे. ‘क्रांतिसूर्य’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. २८ मे १८८३ रोजी भगूर या गावात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तिथे त्यांच्या पूर्वजांचा वाडा होता. वडील जहागीरदार असल्यामुळे लहानग्या विनायकास लोक ‘छोटे जहागीरदार’ असे म्हणायचे.
सावरकर यांना आईचे छत्र फार काळ लाभले नाही. आईनंतर मोठ्या भावाची पत्नी येसू वहिनीने त्यांना आईची माया दिली. तिच्या मार्गदर्शनाखाली सावरकर शिकू लागले, कविता करू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी रामायण, महाभारत या ग्रंथांसह घरात असणारी ऐतिहासिक पुस्तके वाचून काढली होती. नाशिकमधील एका स्पर्धेसाठी शिवजयंतीनिमित्त सावरकरांनी शिवरायांवर गीत लिहिले होते. त्या गीतासाठी लोकमान्य टिळकांच्या हातून त्यांना पारितोषिक मिळाले होते. तेव्हापासून त्यांनी देशकार्याला वाहून घेतले. चाफेकर बंधूंकडे पाहून त्यांनी आपणही क्रांतिकारक बनायचे, असे मनोमन ठरवले व पुढे मित्र मंडळ मेळावा स्थापन केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भगूर येथील जुने घर म्हणजे सध्याचा ‘सावरकर वाडा’ आजही चांगल्या स्थितीत आहे. असे सांगितले जाते की विनायक सावरकर यांचे वडील दामोदर सावकरकरांच्या पणजोबांना लुटारूंना पिटाळून लावताना अष्टभुजा भवानीची मूर्ती मिळाली होती. ही देवी पुढे सावरकर कुटुंबीयांची कुलदैवत झाली. देवीला पूर्वी बोकडाचा बळी दिला जात असे. त्यामुळे देवीची मूर्ती खंडोबाच्या मंदिरात ठेवण्यात आली. मात्र, दामोदरपंतांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार ‘मला घरी घेऊन जा’ असे या देवीने सांगितले. त्यामुळे ही मूर्ती सावरकरवाड्यात आणण्यात आली. १८९८ मध्ये झालेल्या प्लेगच्या उद्रेकानंतर विनायक दामोदर सावरकर यांनी घरातील या देवीसमोर आपल्या साथीदारांसह देश स्वतंत्र करण्याची शपथ घेऊन स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. तेव्हापासून या अष्टभुजा देवीला स्वातंत्र्यलक्ष्मी असे म्हटले जाऊ लागले.
सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतल्यानंतर देवीसाठी बळी द्यायला ही मूर्ती पुन्हा खंडोबा मंदिरात आणण्यात आली. सावरकर वाड्यात देवी जेथे स्थानापन्न होती ते स्थान आजही तेथे पाहता येते. या देवीला स्मरून केलेले ‘जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे…’ आणि ‘ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ ही सावरकर यांची गीते प्रसिद्ध आहेत.
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची ही मूर्ती सुंदर आहे. सध्या गावातील खंडोबा मंदिरात ती विराजमान आहे. या मंदिराच्या गर्भगृहात खंडोबा, बाणाई व म्हाळसादेवी यांचे स्थान आहे, तर खालच्या बाजूला शिवपिंडी आहे. त्यांच्या मधोमध स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. पहिल्या दिवशी विधिवत पूजा–अर्चा करून येथे घटस्थापना केली जाते. नवमीला सकाळी देवीस पंचामृताने आंघोळ घातली जाते. दसऱ्याच्या दिवशी अष्टभुजा देवी व खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक येथून जवळच असलेल्या देवळाली कॅम्पमधील रेणुका मातेच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी जाऊन पुन्हा पालखी गावात येते. नवरात्रोत्सवात येथे शेकडो भाविक दर्शनाला येत असतात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील जुने घर आता राष्ट्रीय स्मारक झाले आहे. इंग्रजांनी हे घर ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केला होता. इंग्रजांकडून मारुतीराव चव्हाण यांनी ते खरेदी केले. पुढे ते पांडुबा चव्हाण यांनी घेतले. नंतर त्यांच्याकडून केंद्र सरकारने खरेदी करून २८ मे १९९८ रोजी ते सावरकर स्मारकात रूपांतरित केले. या वाड्यामध्ये सावरकर यांचा जीवनपट दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यात सावरकरांचे जन्मस्थान, जेथे अष्टभुजा मूर्तीची स्थापना केली होती, ते देवघर आहे. याशिवाय त्यांची वंशावळ येथे दाखविली आहे.