स्वामी समर्थ मठ

समर्थगड, आडवली, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

पुराणे व उपनिषदांनी वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श व योगाचा उपदेशक असे म्हटलेल्या दत्ताची उपासना फार प्राचीन काळापासून होत आहे. पंधराव्या शतकात नृसिंह सरस्वती या विभूतीमुळे त्याला संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे पहिले अवतार मानले जातात. नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार, तर ऐतिहासिकदृष्ट्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ताचे तिसरे अवतार मानले जातात. महाराष्ट्रात गावोगावी त्यांचे छोटे-मोठे मठ आहेत. त्यातीलच एक भव्य, एखाद्या किल्ल्यासारखा दिसणारा मठ मालवणमधील आडवली या गावी आहे.

‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ अशी असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या स्वामी समर्थ यांचे पूर्वचरित्र अज्ञात आहे. ‘श्री स्वामी चरित्र सारामृता’त अशी आख्यायिका आहे की दत्ताचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती हे अवतार समाप्तीवेळी आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य कर्दळीवनात गेले. तेथे त्यांनी ३५० वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून या वारुळावर पडली. त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले. येथून ते काशी, कलकत्ता, जगन्नाथपुरी अशा मार्गाने गोदावरीतीरी आले व इ.स. १८३८ मध्ये मंगळवेढ्यास प्रकट झाले. ‘स्वामी लीलामृत’ या ग्रंथात असे म्हटले आहे, की ‘शके सतराशे साठात। स्वामी जगदुद्धारार्थ। प्रकटले मंगळवेढ्यात। साक्षात दत्त अवतारे॥’ यानंतर इ.स. १८५८ मध्ये ते अक्कलकोटात अवतीर्ण झाले. १८७८ मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला त्यांनी तेथे समाधी घेतली.

स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनकाळात अनेकांवर कृपा केली. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या आश्वासनातून त्यांनी अनेकांना धैर्य दिले. जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो, असे त्यांचे वचन होते. त्यांच्या चमत्काराच्या, प्रचितीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. आज संपूर्ण भारतातच नव्हे, तर परदेशातही त्यांचे भक्त आहेत. आजही चैतन्य स्वरूपात स्वामींचा वास आहे. ‘हम गया नही जिंदा है’ या त्यांच्या वचनाची अनुभूती आजही येते, अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. यातूनच अनेक ठिकाणी त्यांच्या भक्तांनी श्री स्वामी मठ स्थापन केले आहेत. याच भावभक्तीतून आडवली येथेही स्वामींचा मठ स्थापन करण्यात आला आहे. २६ मार्च २०२० रोजी या मठात स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

मालवण तालुक्यातील आडवली या गावातील सड्यावर समर्थगड या नावाने हा मठ उभा आहे. जगदीश सखाराम घाडीगावकर ऊर्फ भाईमहाराज या स्वामीसेवकाच्या संकल्पनेतून व प्रयत्नांतून येथे १८ एकर जागेवर हा समर्थगड साकारलेला आहे. खूप दुरूनच मोठ्या माळरानावर वसलेल्या या अष्टकोनी गडाची तटबंदी दिसते. दिवाळीतील किल्ल्यांना बांधतात तशा प्रकारची बुरूज असलेली व त्यावर मावळ्यांचे पुतळे बसवलेली ही तटबंदी आहे. तटावरील मावळ्यांच्या पुतळ्यांप्रमाणेच या गडाच्या प्रवेशद्वाराशेजारीही दोन मावळ्यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. शंख फुंकणारे व हाती अब्दागिरी घेतलेल्या या मावळ्यांच्या पुतळ्याशेजारी त्यांच्या कंबरभर उंचीचे दोन सुशोभित हत्ती आहेत. त्यांच्या पायाशी छोटीशी तोफ आहे. प्रवेशद्वारातून प्रवेश करताच गडाला असतात तशा अनेक पायऱ्यांची वाट समोर दिसते. द्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या स्वच्छतागृहात आचमन करून या गडात प्रवेश करावा लागतो. वर रुंद प्रवेशद्वार आहे, त्यास संपूर्ण काचेचा दरवाजा आहे. तेथेच स्वामी समर्थांचे मंदिर आहे. तटबंदीच्या आत मधोमध उंचावर असलेले हे मंदिरही अष्टकोनी आहे. त्याच्या भिंतीस काचा बसविलेल्या आहेत. मंदिरात औदुंबर वृक्षाच्या पारावर बसलेली स्वामी समर्थांची सुवर्णमूर्ती आहे. मूर्तीसमोर स्वामींची मुखमूर्ती आहे. मंदिर परिसरात उंच दीपमाळ आहे. दिवाळीच्या किल्ल्यावर असतात त्याप्रमाणे मावळ्यांच्या पुतळ्यांबरोबरच येथे ठिकठिकाणी अश्व, हरणशावके, गाय-वासरू, पिसारा उघडून नाचणारा मोर, ससे, यांचे मोठे पुतळे आहेत. मंदिर आवारात देवीचे छोटे मंदिर आहे त्यात संत नामदेव, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार यांच्या देखण्या मूर्तीही आहेत.

ऐन कोव्हिड महामारीच्या काळात उद्‌घाटन झालेल्या या मठात सुरुवातीच्या काळात भक्तांची फारशी वर्दळ नसे. येथे दर गुरुवारी आरती होते. त्यावेळीही प्रारंभी कमी स्वामीभक्त येत. आता मात्र तेथे गुरुवारच्या आरतीस शेकडो भक्त व सेवक उपस्थित असतात. येथे दर गुरुवारी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भजनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर ८ वाजता महाआरती होते व त्यानंतर भाईमहाराज यांचा भक्तसंवादाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. समर्थगडाच्या पटांगणात एक रंगमंच उभारण्यात आला आहे. येथे दर गुरुवारी रात्री ९.३० वाजता दशावतार, डबलबारी, दिंडी भजन, तसेच कॅराओके शो व गोपनृत्य असे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

येथे दत्त जयंती, स्वामी जयंती तसेच स्वामी समर्थांशी संबंधित असलेले सर्व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दररोज सकाळी ९ ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत येथे स्वामींचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून ३२ किमी, तर देवगडपासून ४२ किमी अंतरावर
  • मालवण व देगवडपासून आडवली येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : भाई महाराज,
  • मो. ९८६९७४९८४९, ७५८८९८३३५५
Back To Home