अधिक पावसाचा प्रदेश म्हणून कोकणचा भूभाग परिचित असला तरी तीव्र उताराच्या डोंगराळ भागामुळे पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जाते. त्यामुळे येथे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते; परंतु कोकणात काही नद्या अशा आहेत ज्या बारमाही वाहतात व त्यांच्यामुळे अनेक गावे व शहरांची तहान भागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्नपूर्णा नदी ही त्यांपैकीच एक. देवगड तालुक्यातील किंजवडे गावातील स्थानेश्वर मंदिर याच अन्नपूर्णा नदीच्या तीरावर आहे. सुमारे ३०० वर्षे प्राचीन असलेले हे देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी या देवाची ख्याती आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की एकदा एक शेतकरी अन्नपूर्णा नदी तीरावरील आपल्या शेतात काम करीत असताना त्याचे फावडे एका पाषाणास लागले व त्या पाषाणातून रक्त वाहू लागले. हे पाहून शेतकरी घाबरला व त्याने गावकऱ्यांना याची कल्पना दिली. ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पुन्हा खोदून पाहिले. तेव्हा तेथील पाषाण म्हणजे स्थानेश्वर देवाची पिंडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी याच ठिकाणी पिंडीची स्थापना करून त्याभोवती लहानसे गवताचे मंदिर उभे केले. या देवाच्या नित्य पूजेसाठी हरभट ब्राम्हणाची नियुक्ती केली. एके वर्षी उन्हाळ्यात या मंदिरास आग लागली. त्यावेळी हरभटांनी पिंडीस आलिंगन देऊन पिंडीचे अग्नीपासून संरक्षण केले. या प्रयत्नात हरभट यांचे निधन झाले. गावकऱ्यांनी येथे नव्याने मंदिर बांधून त्यात स्थानेश्वराची पुनर्स्थापना केली. तेव्हापासून या मंदिरास ‘हरभट स्थानेश्वर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
या मंदिरास इ.स. १७२७ मध्ये छत्रपती शंभू राजे यांनी सारा इनामी गाव दिल्याची सनद प्राप्त आहे. त्यावरून हे मंदिर सुमारे ३०० वर्षांहून प्राचीन असावे. असे सांगितले जाते की शंभू राजे कोल्हापूरमधून शिकारीनिमित्त किंजवडे गावी आले असता त्यांनी येथील स्थानेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते. माझी मनोकामना पूर्ण झाल्यास मी येथे आपले मोठे मंदिर बांधेन, असा नवस ते बोलले होते. स्थानेश्वराच्या कृपेने त्यांचे मनोरथ पूर्ण झाले व त्यांनी नवसपूर्तीसाठी स्थानेश्वराचे भव्य मंदिर बांधले. त्याचबरोबर किंजवडे व तोरसोळे गाव देवस्थानच्या कारभारासाठी इनाम म्हणून दिले.
२०१६-१७ मध्ये केलेल्या जीर्णोद्धार व नूतनीकरणानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप आले आहे. या मंदिरास भक्कम सीमाभिंत आहे. त्यात असलेल्या दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला दोन्ही बाजूने या नगारखान्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेश द्वाराचे बांधकाम इ.स. १७२५ मध्ये घडीव दगडात केलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस मोठी पितळी घंटा व आतील दोन्ही बाजूस पहारेकरी दालने आहेत. प्रांगणात मंदिराच्या उजव्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर तुळशी वृंदावन व डाव्या बाजूस तीन दीपस्तंभ आहेत. सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
मंदिराचा प्रथम सभामंडप हा दुमजली आहे व त्यात स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाहेरील दोन्ही बाजूस प्रत्येकी सात स्तंभ व मधल्या दोन रांगांमध्ये प्रत्येकी पाच स्तंभ आहेत. या स्तंभांवर वरच्या बाजूस गजमुखांची शिल्पे आहेत. कोकणी स्थापत्य शैलीनुसार मधल्या स्तंभांच्या रांगेतील जमीन काही इंच खोलगट आहे. सभामंडपाच्या वरच्या मजल्यावरील दोन्ही बाजूस सज्जे आहेत. मंदिराचा मुख्य सभामंडप हा काहीसा उंच आहे. हा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यात दोन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची व्यवस्था आहे. याच सभामंडपात स्थानेश्वराची पालखी ठेवलेली आहे.
अंतराळाच्या दर्शनी भिंतीमध्ये उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात विठ्ठल-रखुमाई व डाव्या बाजूस गणपती यांच्या मूर्ती आहेत. अंतराळाची द्वारशाखा वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सुशोभित आहे. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे व त्यात प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी गवाक्ष आहेत. अंतराळात मध्यभागी नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती व त्याशेजारी पाच तरंगदेवता आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीमध्ये असलेल्या देवकोष्ठकांत उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस श्रीदत्त यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील स्थानेश्वराची पिंडी आहे. गर्भगृहाच्या छतावर ६० फूट उंच अष्टकोनी शिखर आहे. त्यामध्ये असलेल्या देवकोष्ठकांत विविध देवतांची शिल्पे व शिवपिंडी आहेत. शिखरावर आमलक व त्यावर कळस आहे.
येथे कार्तिक शुद्ध दशमीपासून पुढे सहा दिवस कार्तिकोत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले जातात.