छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून आई तुळजाभवानी प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन देवीने स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. तुळजाभवानी हे पार्वती देवीचे एक रूप आहे. कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिच्या सत्त्वाचे हरण करण्याचा प्रयत्न कुंकूर नावाच्या दैत्याने केला, तेव्हा पार्वती देवीने तुळजाभवानीच्या रूपात त्या दैत्याचा नाश केला, अशी कथा पुराण ग्रंथात आढळते. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे या देवीचे मुख्य पीठ आहे आणि महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशात देवीची अनेक उपपीठे आहेत. देवीचे एक उपपीठ आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील डोंगरात स्थित आहे आणि येथील देवी शृंगेरीदेवी या नावाने प्रसिद्ध आहे. येथील पंधरा दिवस चालणारा वार्षिक जत्रोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे.
या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की शृंगारराव निंबाळकर नावाचे देवीचे भक्त दर पौर्णिमेस तुळजापूर येथील मंदिरात भवानीच्या दर्शनासाठी जात असत. पुढे वृद्धापकाळाने त्यांना ही यात्रा करणे अशक्य होऊ लागल्याने त्यांनी देवीला आपल्या गावी येण्याची विनंती केली. “आपण तेजोरूपात तुमच्या मागोमाग येऊ, परंतु वाटेत ज्या ठिकाणी तुम्ही मागे वळून पाहाल, त्याच ठिकाणी मी स्थिरावेन,” असे सांगून देवी भक्ताच्या मागून गावाजवळील डोंगरावर आली. तेव्हा भक्ताने मागे वळून पाहिले आणि देवी त्याच ठिकाणी मूर्तीरूपात स्थापित झाली.
गावापासून काही अंतरावर असलेल्या हिरव्यागार टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराजवळ प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळाच्या बाजूला गोड्या पाण्याचे कुंड आहे. येथून शुचिर्भूत होऊन मंदिराकडे जाण्याची प्रथा आहे. वाहनतळाला लागून लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला मंडप आहे. त्यापुढे अर्धचंद्राकार तीन पायऱ्या आहेत आणि पुढे पेव्हर ब्लॉक आच्छादलेले अंगण आहे. अंगणात दोन चौथरे आहेत व त्यावर दीपमाळा आहेत. पुढे मंदिराची सुमारे पंधरा फूट उंच भक्कम तटबंदी आहे.
मंदिर उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोरीव पाषाणात बांधलेल्या आठ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. उत्सव काळात आराधी, वाघ्या, पोतराज, मुरळी आदी देवीचे सेवक या चौथऱ्यावर बसून देवीची भजने गातात. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांची आसने आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा नक्षीदार आहेत आणि त्यावरील ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. मंदिराच्या प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भक्तनिवास, धर्मशाळा व भाविकांसाठी विश्रांती कक्ष म्हणून केला जातो. प्रांगणात तुलसीवृंदावन आणि त्यापुढे महावृक्षाचा पार आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार सुमारे पंधरा फूट उंचीवर आहे. त्यास सुमारे वीस पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती आहेत आणि मधोमध स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपापेक्षा गर्भगृह उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास सात पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत आणि त्यावर चक्रनक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर स्तंभ नक्षी आहे, तसेच ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहात वज्रपीठावर संगमरवरी मखरात शृंगेरीदेवी व तुळजाभवानी देवीच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. दोन्ही मूर्ती अष्टभुजा आहेत आणि देवीच्या हातात विविध आयुधे आहेत. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तींच्या डोक्यावर मुकुट आहेत. दोन्ही मूर्तींच्या मागे एकच सामाईक प्रभावळ आहे व त्यामध्ये चंद्र, सूर्य व पर्णलता, पुष्पलतांची नक्षी आहे. मूर्तींच्या समोर चांदीच्या पादुका आहेत आणि तिथे पूजा साहित्याची ताटे ठेवलेली आहेत. गर्भगृहात अष्टकोनी वितानावर चक्राकार नक्षी आहे आणि छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी डाव्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या खालील तीन थरांत प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या चौथ्या थरात स्तंभ नक्षी आहे. शिखराचे सर्व थर कमळदल रिंगणाने विभागलेले आहेत. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आणि कळस आहे. गर्भगृहाच्या मागे डोंगरात आणखी एक दीपमाळ आहे. त्यापुढे मूळ मंदिराचे स्थान होते, असे सांगितले जाते.
मंदिरात पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या असा पंधरा दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे महाअभिषेकाने उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर देवीची पालखी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत ग्राम प्रदक्षिणेला निघते. पंधरा दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त मंदिराजवळील कुस्त्यांच्या आखाड्यात स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अनेक कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होतात. याशिवाय चैत्र पाडवा, शारदीय नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, मंगळवार, शुक्रवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.