बीड जिल्ह्यात अनेक पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ असलेली तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळे आहेत. जिल्ह्यातील अंबाजोगाई हे एक प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी येथील वैजनाथ मंदिर, कंकाळेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, शनी मंदिर (राक्षसभुवन), सौताडा येथील रामेश्वर मंदिर आणि राज्यातील प्रसिद्ध २१ गणेशांपैकी एक असलेले नामलगाव येथील गणेश मंदिर अशी विविध ठिकाणे बीड जिल्ह्यात आहेत. याच जिल्ह्यातील मांजरसुभा गावाजवळील कपिलधार तीर्थक्षेत्री असलेले श्री मन्मथ स्वामींचे समाधी मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समाधिस्थ झालेल्या मन्मथ स्वामींचे अस्तित्व आजही येथे जाणवते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
हे समाधी मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे आहे. मन्मथ स्वामी यांचा जन्म वीरशैव कुळात आई पार्वती आणि वडील शिवलिंग स्वामी यांच्या पोटी बीड जिल्ह्यातील केंकूर येथे झाला. दिनोदर बाबा हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. कपिलधार हे कपिल मुनींनी वसवलेले तीर्थस्थळ आहे. कपिल मुनी हे दिनोदर बाबांचे गुरू होते. दिनोदर बाबांनी या तीर्थाची जबाबदारी मन्मथ स्वामींवर सोपवली आणि ते येथील पंचकुंडांच्या ठिकाणी अंतर्धान पावले. मन्मथ स्वामी हे शिवाचार्य महाराज यांचे शिष्य व बालयोगी होते. त्यांनी तपाचरण करून योगसाधना व अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली.
अनुभवानंद, स्वयंप्रकाश, ज्ञानबोध, गुरुगीता हे त्यांनी रचलेले प्रसिद्ध काव्यग्रंथ आहेत. ‘श्रीपरमरहस्य’ या त्यांनी रचलेल्या ग्रंथाचे वीरशैव अनुयायी नियमित पारायण करतात. आपल्या पंथाचा प्रचार व प्रसार करताना इतर धर्मांचा आणि पंथांचा अनादर होणार नाही, याबाबत ते सतत सतर्क असत. म्हणूनच त्यांना पंढरपूरच्या संतांनी ‘संत शिरोमणी’ या उपाधीने गौरवले होते.
हे देवस्थान बीड शहरापासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर आहे. बीड-सोलापूर महामार्गापासून तीन किलोमीटर आणि मांजरसुभा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील डोंगरात हे मंदिर वसलेले आहे. महामार्गापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. या कमानीच्या मुख्य शिखराच्या चारही कोनांवर नंदीशिल्पे आहेत. तसेच समोरील बाजूस असलेल्या देवकोष्ठकात मन्मथ स्वामींची ध्यानस्थ मूर्ती आहे.
मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे व येथे येण्यासाठी पक्की सडक आहे. वाहनतळापासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुमजली इमारती आहेत.
या इमारतींच्या तळमजल्यावर पूजा साहित्य, खाद्यपदार्थ व इतर विविध वस्तूंची दुकाने आहेत. इमारतीच्या वरील मजल्यावर भक्तनिवास आहे, जिथे दूरवरून आलेल्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येते. पुढे दोन्ही इमारतींना जोडून मंदिराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातील जमिनीवर कासवशिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूने सज्जावर जाण्यासाठी जिना आहे आणि तो भक्तनिवासाला जोडलेला आहे.
प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना पहारेकरी कक्ष आहेत आणि त्यापुढे पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगण आहे. प्रांगणात उजव्या बाजूला भक्तनिवासाची दुसरी दुमजली इमारत आहे. प्रांगणाच्या डाव्या बाजूला व समोर डोंगरकड्याची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. मंदिराच्या समोरील डोंगरकड्यावरून पंचधार धबधबा कोसळतो, यालाच ‘कपिलधार तीर्थ’ असे संबोधले जाते. धबधब्याखाली पाण्याचे एक कुंड आहे. या प्रांगणात कुंडाच्या बाजूने स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावलेले आहेत. अनेक भाविक या कुंडात स्नान करून स्वामींच्या दर्शनासाठी जातात. प्रांगणात अनेक जुने वृक्ष आहेत. या वृक्षांखालील पारावर प्राचीन पाषाणशिल्पे व शिवपिंडी आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप अलीकडील काळात बांधलेला आहे. सभामंडपात चौकोनी नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. यातील बाह्य बाजूच्या दोन्ही रांगांत प्रत्येकी चार स्तंभ आहेत, तर मधल्या दोन्ही रांगांत प्रत्येकी तीन स्तंभ आहेत. सर्व स्तंभ नक्षीकामाने सुशोभित आहेत. सभामंडपात मन्मथ स्वामींचा पितळी मुखवटा आहे तसेच मुखवट्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. पुढे प्राचीन हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम असलेले अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळात समोरील बाजूस चार नक्षीदार स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. अंतराळाचे छत समोरील स्तंभ, डाव्या व उजव्या बाजूची भिंत आणि गर्भगृहाच्या भिंतीवर तोललेले आहे. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. अंतराळात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीपुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृह अंतराळापेक्षा उंचावर असल्याने प्रवेशद्वाराला दोन पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी मन्मथ स्वामींची समाधी आहे. समाधीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. एकावर एक रचलेल्या पाषाणांनी गर्भगृहाचे घुमटाकार छत तयार केलेले आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दरवाजे आहेत.
गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखरातील खालचा पहिला थर चौकोनी आहे, ज्यामध्ये चारही बाजूंना प्रत्येकी पाच देवकोष्टके आहेत. शिखरातील इतर चार थर द्वादशकोनी आहेत व सर्व थरांत प्रत्येकी बारा देवकोष्टके आहेत. सर्व देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत आणि आमलकावर कळस व ध्वजपताका आहेत.
कार्तिक पौर्णिमा हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यावेळी स्वामींची चांदीची प्रतिमा चांदीच्या पाळण्यात ठेवून स्तुतीगीते व पाळणे गायले जातात. फाल्गुन शुद्ध चतुर्थीला स्वामींची पुण्यतिथी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून हजारो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक स्वामींच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. मंदिरात भाविकांची रोजच वर्दळ असते.