प्राचीनता आणि भक्ती यांचा अतूट संगम असलेले श्रीवर्धनमधील ग्रामदेवता सोमजाई देवीचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवीचे मूळ नाव सोमजा असे आहे; परंतु सोमजाई हेच संबोधन आता रूढ झालेले आहे. असे सांगितले जाते की या भागात अगस्ती ऋषींचेही वास्तव्य होते. या मंदिराच्या गर्भगृहातील चांदीच्या सिंहासनावर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पेटीत शाळिग्राम आहे. त्याचीच येथे सोमजाई देवी म्हणून भक्तिभावाने पूजा होते. ही देवी येथील अनेक कुटुंबीयांची कुलदेवता आहे.
या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी जंगल होते. येथे एका मोकळ्या जागेवर मुले खेळत असत. खेळून झाले की ती घराकडे परतत; परंतु त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी मात्र जंगलाच्या दिशेने जात. त्या जंगलात कुणाचेही घर नव्हते. एके दिवशी त्या मुलांना जंगलात जाताना कुणीतरी पाहिले व तसे इतरांनाही सांगितले. जिज्ञासेपोटी काही जण त्यांच्या मागे गेले. जंगलात आत आत जाऊन ही मुले एका पिंपळ वृक्षाजवळ अदृश्य झाली. त्या दिवसापासून ती मुले परत दिसली नाहीत. त्यामुळे गावकरी अस्वस्थ झाले. त्याच दरम्यान महाऋषी अगस्ती तीर्थाटन करत श्रीवर्धनला आले होते. गावकऱ्यांनी त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांना त्या भागात शिव आणि शक्तीचे अस्तित्व असल्याचे जाणवले. त्यांनी होमहवन करून त्यांना प्रकट होण्याची विनंती केली. पिंपळ वृक्षाजवळ भव्य अग्निलोळ चमकला आणि त्याचवेळी भूगर्भातून शाळिग्राम वर आला. आज सोमजाईच्या मंदिरात पूजला जात असलेला शाळिग्राम तो हाच असल्याचे सांगितले जाते.
श्रीवर्धन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर बसस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर आहे. येथील तांबडी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या प्राचीन मंदिराची स्थापना अगस्ती मुनींनी केल्याचे सांगितले जाते. २५० वर्षांपूर्वी पेशवेकाळात या मंदिराचे नूतनीकरण व जीर्णोद्धार करण्यात आल्याची नोंद आहे. सोमजाई देवीचे मंदिर हे अर्धा एकर जागेवर आहे. जमिनीपासून उंच असलेल्या या मंदिराच्या प्रांगणाभोवती तटबंदी आहे. तटबंदीला असलेल्या आठ ते दहा पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. कोकणी स्थापत्यशैलीप्रमाणे असणारे हे मंदिर दुमजली व कौलारू आहे. या मंदिरासमोर मोठी ओसरी आहे. त्यानंतर सभामंडप, दुमजली अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या ओसरीत एका संगमरवरी चौथऱ्यावर कासवाची मूर्ती आहे.
सभामंडपाची समोरची बाजू मोकळी असून उजव्या व डाव्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. येथील अंतराळ हे बंदिस्त स्वरूपाचे व दुमजली आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारपट्टीवर नक्षीकाम केलेले आहे. अंतराळाच्या वरच्या मजल्यावर भाविकांना बसण्यासाठी सज्जा आहे. मंदिरातील कार्यक्रम भाविकांना येथे बसून पाहता यावेत, अशी रचना आहे. या संपूर्ण मंदिरात बांधकामासाठी सागवानी लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे.
अंतराळाच्या पुढील बाजूस असलेल्या गर्भगृहात एका चांदीच्या वज्रपीठावर चांदीची पेटी आहे. त्या पेटीत सोमजाई देवी शाळिग्राम रूपात असून शिवभवानी, नंदी व वासुकी या शक्ती त्यात एकवटल्या आहेत, असे सांगितले जाते. या शाळिग्रामाची येथे देवीचे स्वरूप म्हणून पूजा केली जाते. या पेटीच्या वरच्या बाजूला पूजाविधीसाठी देवीचा चांदीचा मुखवटा ठेवण्यात आलेला आहे. या गर्भगृहात प्राचीन काळातील समया आहेत. या मंदिरात आलेल्या भाविकांना मोरपिसांच्या गुच्छाने देवीचा अंगारा लावला जातो. त्यामुळे वाईट शक्ती निघून जातात, अशी श्रद्धा आहे.
या मंदिरात अर्धनारी नटेश्वराचे अस्तित्व आहे आणि त्यांच्याकडून मनोकामना पूर्ण केल्या जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई देवी व हरिहरेश्वर येथील शिवतीर्थाचे कालभैरवासह एकाच दिवशी दर्शन घेतल्यास दक्षिणकाशी तीर्थयात्रा पूर्ण केल्याचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. या मंदिरात महामुनी सप्तशृंगी ऋषींनी वासुकी यज्ञ केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या स्थानावर सर्पदंश झालेल्या कोणत्याही प्राणिमात्रास आणले असता त्याचे विष उतरते, अशी श्रद्धा आहे. गाय, बैलासारखे प्राणीही आजारी असतील तर येथे आणून बांधले जातात. आठ दिवसांत ते बरे होतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे सांगण्यात येते. या परिसरात राहणारे मुस्लिमधर्मीय शेतकरीही आपली आजारी जनावरे येथे बरी होण्यासाठी आणतात.
येथील मुख्य स्थान हे सोमजाईचे असले तरी मंदिराच्या चारही बाजूला चार शिवशक्ती आहेत. त्यामध्ये कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी व चामुंडायनी यांचा समावेश आहे. या मंदिरातील मुख्य उत्सव असलेल्या रथोत्सवास मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस सुरुवात होते. रात्री बारा वाजता मंदिरातून रथयात्रा सुरू होते ती कसबा पेठ, सोनार आळी, वाणी आळी, मेटकर्णी, नवी पेठ, कुंभार आळी, टिळक मार्ग या ठिकाणी फिरून दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता पुन्हा मंदिरामध्ये येते व या रथयात्रेचा समारोप होतो. देवीच्या रथयात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक येथे उपस्थित असतात. यानिमित्ताने पुढील सात दिवस येथे अखंड भजन पहारा सुरू असतो. आठव्या दिवशी दहीकाला होऊन दुपारी संपूर्ण गावाला महाप्रसाद दिला जातो. या मंदिरात भाविकांकडून देवीला कौल लावला जातो. दररोज सकाळी सात व सायंकाळी सात वाजता मंदिरात आरती होते.