वर्धा व जाम नद्यांच्या संगमावर नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे चहूबाजूने पाण्याने वेढलेल्या भुईकोट किल्ल्यात अतिप्राचीन सोमेश्वर व महाकालीचे मंदिर आहे. येथील सोमेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. येथील शिवलिंगाकडे निरखून पाहिले असता आपण पुढच्या जन्मी कोण होणार आहोत याची प्रतिमा त्यात दिसते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सोमेश्वर मंदिरामुळे भुईकोट किल्ल्याची मूळ ओळख पुसली गेली असून तो आज सोमेश्वर किल्ला म्हणून ओळखला जातो. हा परिसर सुमारे २५ एकरांचा आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या किल्ल्याला ८ बुरूज होते; परंतु आता ते ढासळले असून केवळ किल्ल्याच्या भिंती व प्रवेशद्वार आपले अस्तित्व टिकवून आहेत. या मंदिरात सापांचा वास असल्यामुळे धार्मिक कार्य व महाशिवरात्रीशिवाय अन्य दिवशी रात्री येथे कोणी थांबत नाही. मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळात या मंदिरातील शिवपिंडी सोन्याची होती. संपूर्ण राज्यात पूर्वीपासून अशी एकमेव शिवपिंडी होती की जिच्यात आपले रूप पाहिले असता, पुढचा जन्म कोणता असेल याची प्रतिमा त्यात दिसायची. त्यासाठी प्राचीन काळापासून येथे कायम भक्तांची गर्दी होत असे. काही चोरट्यांनी ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला असता तेथे पिंडीचे रक्षण करणाऱ्या सापांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला.
सोमेश्वराचे हे मंदिर वाकाटककालीन असण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, प्रथम रघुजीराजे व नंतर त्यांचे पुत्र जानोजीराव यांच्या ताब्यात हा किल्ला होता. २० जानेवारी १७६९ रोजी माधवराव पेशव्यांनी जानोजीराव यांच्यावर आक्रमण करून हा किल्ला ताब्यात घेतला. तेव्हापासून या प्रदेशावर पेशव्यांचे सरदार नागपूरकर भोसले यांचे अधिपत्य होते. त्याकाळात मंदिराची देखभाल व दुरुस्ती नागपूरकर भोसले घराण्याकडून होत होती. त्यानंतर १८२० ते १९४७ पर्यंत हा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात होता. या देवस्थानाच्या पुनर्निर्मितीचे काम २२ फेब्रुवारी १९७० ला भानापुरा पीठाचे जगतगुरू शंकराचार्य स्वामी सत्यावित्रानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी केल्याचा उल्लेख आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रथम किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जावे लागते. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने भव्य बुरूज व त्याशेजारी तटबंदी आहे. या प्रवेशद्वारावर १ गणेशशिल्प व शत्रूवर बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जागा पाहायला मिळतात. बुरूज दुमजली असून त्यामध्ये द्वारपाल वा रक्षकांना राहण्यासाठी बनविलेल्या खोल्या आहेत.
सोमेश्वर मंदिर हे काहीसे उंचावर असून नदीपात्रातील एका लहानशा पुलावरून या मंदिरात जावे लागते. मुख्य मंदिराच्या सभामंडपात श्रीराम–लक्ष्मण–सीता, विठ्ठल–रुख्मिणी, गणपती, हनुमान, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गाभारा हा सभामंडपापासून काहीसा उंचावर असून सभामंडपातील नंदीच्या मूर्तीपासून ४ पायऱ्या चढून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी असून ती आधी शुभ्र रंगाची होती व नंतर तिचा रंग बदलून ती काळी झाल्याचे सांगितले जाते.
कोटेश्वर मंदिरापासून १०० मीटरच्या अंतरावर पुरातन महाकाली मंदिर आहे. असे सांगितले जाते की तेथील एका लहानशा टेकडीवर असलेल्या या मंदिरातील दिवा वर्धा जिल्ह्यातील आष्टी गावातून दिसतो. याशिवाय या परिसरात गंगामंदिर, ऋषी मंदिर व शनी चौथरा आहे. मंदिराजवळ असलेल्या वर्धा व जाम नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात. नवरात्री, ऋषी पंचमी, श्रावण महिना आणि महाशिवरात्री या उत्सवांवेळी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. येथील मंदिरात भेट देणाऱ्या भाविकांची संख्या व येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे राज्य शासनाने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षाला ४ लाखांहून अधिक भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य शासनाकडून हा दर्जा प्राप्त होतो.)