सोमेश्वर महादेव मंदिर

तळीखेड, ता. निलंगा, जि. लातूर

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तळीखेड येथे असलेले सोमेश्वर महादेव मंदिर मांजरा नदीच्या खोऱ्यातील प्राचीन त्रिकूट मंदिरांच्या साखळीतील महत्त्वाचे मंदिर मानले जाते. कल्याणीच्या उत्तर चालुक्य साम्राज्याच्या कालखंडात या नदीखोऱ्यात अनेक उत्कृष्ट मंदिरांची निर्मिती झाली होती. निलंगा शहरातील नीलकंठेश्वर आणि भूतमुंगळी येथील सदाशिव मंदिराप्रमाणे या मंदिरातही तीन गर्भगृहे आहेत. स्थापत्यशास्त्राच्या आणि कोरीवकामाच्या निकषांनुसार याच्या निर्मितीचा कालखंड साधारणपणे १२व्या शतकातील मानला जातो. तळीखेड हे गाव त्याकाळी एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असल्याचे सांगितले जाते.

या मंदिरासंदर्भात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यापैकी स्थानिक लोककथांनुसार हे मंदिर पांडवांनी उभारले होते. दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार, चंद्राचा विवाह दक्ष प्रजापतीच्या २७ कन्यांशी अर्थात नक्षत्रांशी झाला होता. मात्र चंद्राचे प्रेम केवळ रोहिणीवर अधिक होते आणि तो इतर पत्नींकडे दुर्लक्ष करत असे. यामुळे संतापलेल्या दक्ष प्रजापतीने चंद्राला क्षयरोग होईल, असा शाप दिला. या शापामुळे चंद्राची कला दररोज कमी होऊ लागली आणि तो निस्तेज पडू लागला. यामुळे संपूर्ण सृष्टीत असंतुलन निर्माण झाले. तेव्हा देवराज इंद्राच्या सल्ल्याने चंद्र शापमुक्तीसाठी भगवान शंकराला शरण गेला. शंकराने त्याला पृथ्वीवर शांत आणि पवित्र असलेल्या ठिकाणी तपश्चर्या करायला सांगितली.

चंद्र अशा जागेच्या शोधात फिरत असताना मांजरा नदीच्या खोऱ्यातील एका घनदाट जंगलात सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी पोहचला. त्याने या ठिकाणी एक कुंड निर्माण केले आणि त्या पात्रात स्नान करून भगवान शंकराची कठोर तपश्चर्या सुरू केली. चंद्राने येथे अनेक वर्षे ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करत शंकराची आराधना केली. त्याच्या निस्सीम भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्या स्थळी ते लिंगरूपाने प्रकट झाले. त्यांनी चंद्राला एक वर दिला. त्यानुसार चंद्राची कला १५ दिवस कमी होत जाईल. या काळाला कृष्ण पक्ष म्हटले जाते. तसेच पुढील १५ दिवस ती वाढत जाईल. या काळाला शुक्ल पक्ष म्हटले जाते. या चक्रामुळे सृष्टीचे व्यवहार सुरळीत सुरू राहतील. चंद्राला ‘सोम’ असेही म्हटले जाते. त्याच्यामुळे भगवान शंकर येथे प्रकट झाले, म्हणून येथे असलेल्या त्यांच्या लिंगाला सोमेश्वर महादेव असे म्हटले जाते. चंद्राने एका तळीत स्नान करून, तपश्चर्या केली आणि शापातून मुक्ती मिळवली. तीच तळी आजही या गावाच्या नावाचा भाग आहे.वरूनच या गावाला तळीखेड हे नाव पडले.

या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची व त्रिकूट पद्धतीची म्हणजे तीन गर्भगृहांची आहे. मंदिराच्या परिसरात प्राचीन दगडी ओवऱ्या व प्रांगणात एक कमी उंचीची दीपमाळ आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी गवाक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात मध्यभागी चार नक्षीदार खांबांच्या मध्ये रंगशिळा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर द्वारस्तंभ वगळता साधेच नक्षीकाम दिसते. सभामंडपात असलेल्या देवकोष्टकांमध्ये हिरण्यकशिपूचा वध करणारे नरसिंह, गणपती आणि शेषशायी विष्णू यांच्या मूर्तीही दिसतात. याशिवाय येथे असलेली वराहमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या वरच्या डाव्या हातात शंख असून तिच्या खांद्यावर एक लहान स्त्रीमूर्ती बसलेली आहे. खालच्या उजव्या हातात गदा आहे. मूर्तीची झीज झाल्यामुळे इतर तपशील दिसत नाहीत. येथेच सप्तमातृकांसारख्या एका ओळीत कोरलेल्या काही छोट्या मूर्ती दिसतात, पण त्यांची संख्या सातपेक्षा जास्त आहे.

सभामंडपात आणि या गर्भगृहांच्या समोर असलेल्या अंतराळात काही देवकोष्टके आहेत. त्यामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. रंगशिळेवर उभे राहिले असता समोर दिसणाऱ्या गर्भगृहात शिवपिंड आहे. तिच्या शाळुंखेत तीन पिंडींचा आकार दिसतो. पिंडीवर पाच फण्यांचा पितळी नाग आहे. हे जटाशंकराचे स्थान असल्याचे सांगितले जाते. या गर्भगृहाच्या अंतराळात समोरासमोर दोन देवकोष्टके आहेत. त्यातील एका कोष्टकात शंकर-पार्वतीची मूर्ती आहे. यात पार्वती देवी शंकराच्या अंकावर ( डाव्या मांडीवर ) आरूढ झालेली दिसते. त्या समोरच्या देवकोष्टकात चतुर्भुज देवतेची मूर्ती आहे. ही विष्णूची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. परंतु शंख, चक्र, गदा आणि पद्म या खुणा या मूर्तीमध्ये स्पष्ट आढळत नाहीत. या मूर्तीचे दोन्ही खालील हात एकत्र आलेले असून त्यांच्या तळहातावर काहीतरी वस्तू धरल्यासारखे वाटते. डाव्या बाजूच्या गर्भगृहात काळ्या पाषाणात कोरलेली दुर्गादेवीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या अंतराळात समोरासमोर असलेल्या देवकोष्टकात दोन मूर्ती आहेत. त्यातील एक पद्मासनातील देवतेची मूर्ती आहे. या मूर्तीच्या खालच्या हातात ताम्रपत्र तर वरच्या दोन्ही हातांत पाश आणि अंकुश दिसतात. चालुक्यकालीन मूर्तिकलेत पाश आणि अंकुश धारण केलेली, पद्मासनात बसलेली ही मूर्ती प्रामुख्याने ललिता सुंदरीची मानली जाते. या मूर्तीच्या समोर एक उभ्या देवतेची मूर्ती आहे. या मूर्तीला दाढी कोरण्यात आल्यामुळे ती ब्रह्मदेवाची असल्याचा कयास बांधता येतो. तिची झीज झाल्यामुळे ब्रह्मदेवाची इतर मुखे स्पष्ट दिसत नाहीत.

उजव्या बाजूच्या अंतराळाजवळ एक नंदीमूर्ती दिसते. त्याच्या समोर मुख्य गर्भगृह आहे. त्रिकूट पद्धतीच्या मंदिरात मुख्य गर्भगृह हे रंगशिळेच्या समोर असते, पण येथे थोडी वेगळी रचना दिसते. हे गर्भगृह मंदिराच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा खोलगट भागात आहे. येथे येण्यासाठी सहा पायऱ्या उतराव्या लागतात. येथे असलेल्या शिवलिंगाची शाळुंखा जमिनीलगत पसरट गोलाकार आहे. त्यात असणारे लिंगही कमी उंचीचे व अर्धगोलाकार स्वरूपाचे आहे. या गर्भगृहाच्या अंतराळात असलेल्या दोन देवकोष्टकांपैकी एका कोष्टकात शंकराच्या अंकावर आरूढ असलेल्या पार्वतीची मूर्ती आहे. ही मूर्ती दुसऱ्या अंतराळात असलेल्या शंकर-पार्वतीच्या मूर्तीसारखीच आहे. त्या मूर्तीच्या तुलनेत या मूर्तीची झीज कमी झालेली असल्याने ही अधिक रेखीव आणि स्पष्ट दिसते. या मूर्तीच्या समोरच्या देवकोष्टकात असलेली मूर्ती अर्धनारीश्वराची आहे.

मंदिरावरील आधुनिक बांधकामाचे शिखर चार टप्प्यांचे व चौरसाकार आहे. त्यावर आमलक व कळस आहे. तळीखेड येथील या सोमेश्वर मंदिर परिसरात एक प्राचीन शिलालेख आहे. हा शिलालेख या मंदिराच्या इतिहासावर आणि प्राचीनतेवर शिक्कामोर्तब करतो. चालुक्य काळात या भागात कानडी आणि मराठी या दोन्ही भाषांचा प्रभाव होता. त्यामुळे या शिलालेखाची भाषा प्रामुख्याने हळकन्नड (जुनी कानडी) आहे. तो कल्याणी चालुक्य राजांच्या काळातील प्रादेशिक भाषांच्या समन्वयाचा उत्तम नमुना मानला जातो. प्राचीन काळी जेव्हा मंदिरे बांधली जात, तेव्हा त्यांच्या नित्य पूजेसाठी आणि देखभालीसाठी राजा किंवा स्थानिक जहागीरदार एखादे गाव किंवा जमीन दान देत असत. या शिलालेखात तळीखेड गावातील काही जमीन सोमेश्वर देवाच्या नैवेद्यासाठी आणि नंदादीपाच्या तेलासाठी दान दिल्याची नोंद असल्याचे सांगितले जाते. या शिलालेखातील ऐतिहासिक नोंदींनुसार हे मंदिर बाराव्या शतकात उभारण्यात आले असल्याचे सिद्ध होते.

भगवान शंकराला समर्पित असलेल्या या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्रीचा असतो. या दिवशी पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात सोमेश्वराचा पवित्र अभिषेक केला जातो. या सोहळ्याच्या वेळी येथे मोठी जत्रा भरते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्रावणात दररोज रुद्राभिषेक आणि भजन-कीर्तनाचे विशेष आयोजन केले जाते. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेला मंदिरासमोर दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. भाविक या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० पर्यंत दर्शन घेऊ शकतात. विशेष सण आणि श्रावण सोमवारी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते.

उपयुक्त माहिती

  • निलंगा येथून २० किमी अंतरावर
  • लातूर येथून ७० किमी अंतरावर
  • निलंगा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

सोमेश्वर महादेव मंदिर

तालीखेड़, तालुका निलंगा, जिला लातूर

Back To Home