किमान चारशे ते पाचशे वर्षांचा इतिहास लाभलेले माद्याळचे सोमलिंग मंदिर हे एक जागृत व नवसाला पावणारे देवस्थान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मांद्याळ हे गडहिंग्लज तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेनजीकचे लहानसे गाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमधीलही हजारो भाविक येथे सोमलिंग महादेवाच्या दर्शनासाठी येतात. असे सांगितले जाते की तालुक्यातील राजकारणी मंडळींमध्येही हे मंदिर लोकप्रिय आहे. कोणत्याही छोट्या-मोठ्या निवडणुकीपूर्वी उमेदवार येथे येऊन सोमलिंग महादेवाचे आशीर्वाद घेतात.
मंदिराची आख्यायिका अशी की माद्याळ गावाच्या उत्तरेला असणाऱ्या टेकडीनजीक कोडी सोमप्पा नावाचे एक ठिकाण आहे. कोडी हा कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ आहे शक्ती. त्या ठिकाणी एका प्राचीन मंदिरासह काही ग्रामस्थांची घरे होती. सध्या जेथे सोमलिंग मंदिर आहे तेथे पूर्व घनदाट जंगल होते. कोडी सोमप्पा येथील ग्रामस्थांची गुरे या भागात चरायला येत असत. त्यातील एक गाय दररोज एका विशिष्ट ठिकाणी येऊन आपला पान्हा सोडत असे. ग्रामस्थांच्या निदर्शनास जेव्हा हा प्रकार आला तेव्हा त्यांनी त्या जागेवर पाहिले असता तेथे स्वयंभू शिवलिंग आढळले. ग्रामस्थांनी शिवलिंगाभोवतीची जागा साफ करून तेथे लहानसे मंदिर बांधले व पूजा करायला सुरुवात केली. त्यासोबतच या मंदिर परिसरात वसाहत वाढत गेली व आजचे गाव झाले.
गावाच्या मध्यभागी असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर परिसरात एक सुंदर आणि प्राचीन दीपमाळ आहे. हत्तीशिल्पांनी तोलून धरलेली ही उंच दीपमाळ गावातील बैठ्या घरांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसते. या दीपमाळेवर काही अक्षरे दिसतात, पण झीज झाल्याने ती नीटशी वाचता येत नाहीत. तेथे एका दगडावर ‘शक १८३४’ (इ.स. १९१२) अशी कोरीव नोंद आहे. मंदिराभोवती दगडी आवारभिंत आहे. त्याला चारही बाजूंनी दरवाजे आहेत. ही भिंत इ.स. १९२४ साली बांधल्याचा त्यावर उल्लेख आहे. या सीमाभिंतीत असलेल्या भक्कम व दगडी महाद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या वरच्या भागात तीन घुमट्या आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या घुमटीत गणपतीची मोठी मूर्ती आहे.
या प्रवेशद्वारातून दुमजली सभामंडपात प्रवेश होतो. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाच्या बांधकामात पूर्णपणे लाकडांचा वापर केलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळून या सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर जाता येते. मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी ४०० ते ५०० भाविकांना बसता येईल, अशी येथे व्यवस्था आहे. इ.स. १८०० मध्ये मुख्य मंदिरासमोर हा सभामंडप बांधल्याची नोंद आहे. खुल्या सभामंडपाला लागून पुढे बंदिस्त सभामंडप आणि गर्भगृहाचे दगडी बांधकाम आहे. या सभामंडपाच्या पायरीवर एक कन्नड भाषेतील शिलालेख असून येथील खांबावर कोरीव नक्षीकाम आहे. या सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अखंड पाषाणात कोरलेली नंदीची सुबक मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांत डावीकडे गणपती व उजवीकडे विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दगडी शिळांवर कोरलेल्या या विठ्ठलास मिशा आहेत. विठ्ठल व रखुमाई या दोघांच्याही मूर्ती कटेवर कर व डोक्यावर मुकुट असलेल्या आहेत. गर्भगृहाची द्वारपट्टी ही पितळी पत्र्याने मढविलेली आहे. या द्वारपट्टीच्या दोन्ही बाजूला जय व विजय हे द्वारपाल आहेत, तर ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. या लहानशा गर्भगृहात तब्बल बारा दगडी स्तंभ आहेत. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. याशिवाय येथे आणखी एक शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या शेजारीच सोमलिंग महादेवाचे शेजघर आहे. रोज रात्री ते खुले केले जाते. देव या शेजघरात निद्रा घेतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
मंदिराच्या दगडी बांधकामाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या शिखरावर आणि छतावर जमणारे पाणी वाहून बाजूला पडावे यासाठी अनेक प्राणीमुखे देवळाच्या सभोवती दिसतात. गर्भगृहावरील शिखर हे ४० फूट उंचीचे आहे. यामध्ये खालच्या बाजूला असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या मध्यभागी अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. मुख्य शिखरावर आमलक व त्यावर कळस आहे. या मंदिराच्या प्रांगणात मंगळाई व नागदेवतांसह इतर स्थानिक देवतांच्या मूर्ती व प्रतिमा आहेत.
मांद्याळ गावातील ग्रामस्थांची सोमलिंग महादेवावर अपार श्रद्धा आहे. घरात कोणताही गोड पदार्थ केला तर त्याचा काही भाग या महादेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. शेकडो वर्षांपासून ही प्रथा अद्यापही येथे सुरू आहे. चैत्र पाडव्यापासून पाच दिवस येथे मोठी यात्रा असते. ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. यात्राकालावधीत सोमेश्वर महादेवाच्या पालखीची वाजत-गाजत नगरप्रदक्षिणा केली जाते. पंचागवाचन, दंडवत व महाप्रसाद असे अनेक उपक्रम या निमित्ताने होतात. यात श्रीफळ उडवण्याचाही एक अनोखा प्रकार असतो. श्रावणात दररोज सोमलिंग महादेवाचा अभिषेक होतो व दर सोमवारी विशेष पूजा होते. याशिवाय दररोज पहाटे पाच ते सहा आणि सायंकाळी सहा ते सात या कालावधीत येथे सनई-नगारावादन होते.