फलटण तालुक्यातील कुळकजाई येथील डोंगरावर असलेले सीतामाईचे मंदिर सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की या डोंगरावर सीतेने अनेक वर्षे वास्तव्य केल्याने हा डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणून ओळखला जातो. या परिसरात माता सीतेने लव आणि कुश यांना जन्म दिला. या मंदिराचे वेगळेपण असे की येथे मकर संक्रांतीला महिलांची यात्रा भरते. या यात्रेत सीतामाईच्या पायाशी सौभाग्याचा वाण अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की श्रीरामांनी रावणाचा पराभव करून लंकेतून सीतेला अयोध्येत परत आणल्यानंतर काही लोकांकडून तिच्या पावित्र्याबद्दल शंका घेण्यात आली. आपण पवित्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी सीतेने अग्निपरीक्षा दिली. तरीही नागरिकांमध्ये याबाबत कुजबूज सुरूच होती. त्यामुळे श्रीरामांनी गर्भवती असलेल्या सीतेचा त्याग करण्याचा निर्णय घेतला व लक्ष्मणास तिला दंडकारण्यात सोडण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे लक्ष्मणाने दंडकारण्याचा भाग असलेल्या या डोंगरावर सीतेला आणले. तहानेने व्याकुळ झालेल्या सीतेने लक्ष्मणाकडे पाण्याची मागणी केली. त्यावेळी लक्ष्मणाने जमिनीत बाण मारून भूगर्भातून पाणी काढले व ते दोन द्रोणांत भरून सीतेकडे नेले; परंतु तोपर्यंत ग्लानी आल्याने सीता जमिनीवर निपचित पडून होती. लक्ष्मणाने ते पाण्याचे द्रोण सीतेच्या बाजूला ठेवले व तो अयोध्येकडे निघाला.
सीतेला जेव्हा जाग आली तेव्हा तिच्या धक्क्याने त्या द्रोणातील पाणी सांडून वाहू लागले. त्यातील एका द्रोणातील पाण्याचे रूपांतर बाणगंगा नदीत व दुसऱ्या द्रोणातील पाण्याचे रूपांतर माणगंगा नदीत झाले. या दोन्ही नद्यांचे उगमस्थान सध्या जेथे सीतामाई मंदिर आहे तेथे आहे. माणगंगा नदी ही माण तालुक्यातून, तर बाणगंगा नदी फलटण तालुक्यातून वाहू लागली. या परिसरात वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. आपल्या वडिलांप्रमाणे असणाऱ्या वाल्मिकींच्या आश्रमात सीता राहू लागली. पुढे तिने लव व कुश यांना येथे जन्म दिला. सीतेच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत नंतरच्या काळात भाविकांनी मंदिर बांधले. तेच हे सीतामाईचे मंदिर होय.
कुळकजाई गावापासून काही अंतरावर सीतामाई डोंगर आहे. फलटण तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाणगंगा नदीच्या उगमस्थानापासून १०० मीटर अंतरावर माणगंगा नदीचे उगमस्थान आहे. या दोन्ही नद्यांच्या उगमस्थानांच्या मध्यभागी सीतामाईचे मंदिर आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता आहे. वाहनतळापासून सुमारे ७० मीटरवर असलेल्या मंदिरापर्यंत दर्शनमार्गाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांचा ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी या मार्गावर वरच्या बाजूला पत्र्याची शेड, तर दोन्ही बाजूने लोखंडी रेलिंग लावलेले आहेत. मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात सीतामाईची मूर्ती आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला एका घळीसदृश्य जागेत शिवपिंडी आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने वर गेल्यावर तेथे एक पादुकांचे मंदिर आहे. याशिवाय परिसरात मारुतीचे मंदिर व एक बारव आहे. या मंदिरापासून जवळच महर्षी वाल्मिकी यांचे वास्तव्याचे ठिकाण व मंदिर आहे.
वसा देणे व वाण लुटणे ही महाराष्ट्रातील अतिशय जुनी प्रथा आहे. यामध्ये संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी मंदिरात जाऊन किंवा इतर स्त्रियांना घरी बोलावून भेटवस्तू देतात. त्यासोबतच आपल्या शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे सुगडात (मातीचे छोटे भांडे) वाण दिले जाते. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात. कुळकजाई येथील सीतामाईचे हे मंदिर वाण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मकर संक्रांत हा येथील मुख्य उत्सव असतो. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते, ती महिलांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. सीतामाईंच्या पायाशी सुगड अर्पण करून सण साजरा करण्याची येथे शेकडो वर्षांची परंपरा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला सौभाग्याचे वाण देण्यासाठी येथे आवर्जून येतात. एसटी महामंडळातर्फे या यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातील अनेक भागांसह पुणे, फलटण व बारामती येथून विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते. वडूज व दहीवडी आगारातून या दिवशी दर ३० मिनिटांनी येथे एसटीची सेवा पुरविण्यात येते.
दरवर्षी चैत्र वद्य सप्तमीला येथे लव–कुश जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. तसेच ज्येष्ठ अमावास्या, आषाढी अमावास्या, नारळी पौर्णिमा या दिवशी येथे उत्सव साजरे होतात. प्रत्येक अमावास्येला भजन, कीर्तन व भंडारा असे कार्यक्रम असतात. सत्यनारायण महापूजा व अन्नदानाची परंपरा येथे अखंडित सुरू राहावी यासाठी परिसरातील १२ गावांनी १२ महिन्यांच्या पूजा निश्चित केलेल्या आहेत. त्यात फलटण तालुक्यातील साठे, टाकळवाडे, वडले, कांबळेश्वर, तावडी, माळवाडी, माण तालुक्यातील पालवण, कळसकरवाडी, गाडेवाडी, खोकडे, कुळकजाई, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कांबळेश्वर या गावांचा समावेश आहे. ज्या महिन्यात ज्या गावाची पूजा असते तेथील शेकडो ग्रामस्थ अन्नदानाचे साहित्य घेऊन येतात. उपस्थित भाविकांना त्या दिवशी अन्नदान केले जाते. रात्री भजन व कीर्तन असे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांच्यावेळी आयोजक व भाविकांच्या सोयीसाठी येथे आश्रम व भक्त निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे.