कोल्हापूरमधील कात्यायनीच्या डोंगरातील जंगल म्हणजे शिकारीचे राखीव जंगल होते. तेथून उगम पावणारी आणि पुढे पंचगंगेस येऊन मिळणारी नदी म्हणजे जयंती. ही उपनदी, परंतु कालांतराने तिला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आणि त्याच्या काठावर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे जुने मंदिर ओढ्यावरचे सिद्धविनायक मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. पूर्वी जुन्या कोल्हापूरची वेस या मंदिराजवळ होती. सध्या हे मंदिर मध्यवस्तीत आहे. करवीर यात्रा करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ही यात्रा सुफल संपन्न व्हावी याकरीता सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
हे मंदिर येथील जोशीराव घराण्याने बांधले आहे. पंडित, कवी आणि ज्योतिषी म्हणून हे जोशीराव घराणे विख्यात होते. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ‘करवीरनिवासिनी महालक्ष्मी’ या ग्रंथात या घराण्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, जोशीराव घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष बल्लाळ जोशी हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे. छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्वाणानंतर ते कोल्हापूर प्रांती महाराणी ताराबाईंच्या आश्रयास आले. ‘करवीर माहात्म्य’ हा मराठी ग्रंथ लिहिणारे दाजीबा जोशीराव हे त्यांचेच वंशज. या ग्रंथाच्या अखेरीस ‘कवीकुलवर्णन’मध्ये त्यांनी शहाजी महाराज ऊर्फ बुवासाहेब यांचे आपण आश्रित असल्याचे म्हटले आहे. बुवासाहेब महाराजांची राजवट १८२१ ते १८३७ होती. याच काळात करवीर माहात्म्याची रचना झाली.
जोशीराव घराण्याचे मुख्य आराध्य दैवत गणेश हे आहे. बल्लाळ जोशीराव यांची कोल्हापूर छत्रपतींचे ज्योतिषी व धर्मकार्य सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. त्या काळात त्यांनी कोल्हापूरमध्ये तीन प्रमुख गणेश मंदिरांची स्थापना केली. त्यातील एक अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूस असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर, दुसरे महाद्वारातून बाहेर पडल्यावर नजीकच असलेले बिनखांबी गणेश मंदिर आणि तिसरे जयंती ओढ्याच्या काठावरचे सिद्धिविनायक मंदिर. ओढ्यावरचे हे मंदिर पूर्वी शहराच्या वेशीवर होते. आता नगररचनेत झालेल्या बदलांमुळे ते शहराचा भाग बनले आहे. एवढेच नव्हे, तर रस्त्यास समपातळीवर असलेले हे मंदिर आता मुख्य रस्त्यापासून खालच्या बाजूला गेले आहे. आता मुख्य रस्त्यावरून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात यावे लागते. येथे उतरल्यानंतर उजवीकडच्या बाजूस हे पूर्वाभिमुख मंदिर स्थित आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. सभामंडप आधुनिक बांधकामाचा, मोठा आणि खुल्या स्वरूपाचा आहे. त्यात संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. भरपूर प्रकाश आणि हवेशीर अशा या सभामंडपामध्ये एकाचवेळी भरपूर भाविक कीर्तन-भजनासाठी बसू शकतात.
येथील गर्भगृह दगडी आहे व हेच जुन्या काळातील मूळचे मंदिर आहे. त्याच्या समोरच्या बाजूला सिमेंट कॉंक्रिटची मोठी कमान केलेली आहे. तिच्या स्तंभांवर जय-विजय या द्वारपालांच्या रंगीत तसबिरी चितारलेल्या आहेत. मंदिराचे दगडी शिळांत बांधलेले गर्भगृह सहा बाय सहा चौरस फुटांचे आहे. त्याचे प्रवेशद्वार लहान म्हणजे तीन फूट उंचीचे आहे. प्रवेशद्वारास चांदीचा पत्रा बसवलेला आहे व त्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात चांदीच्या मखरामध्ये गणेशाची सुंदर मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
ही मूर्ती ललितासनात (उजवी मांडी घातलेली) आहे. शेंदरी रंगाने रंगविलेली ही मूर्ती डाव्या सोंडेची व चतुर्भुज आहे. मूर्तीच्या उजव्या हातात परशू आणि दंत तर डाव्या हातात अंकुश आणि मोदक आहे. मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकुट आहे. माथ्यावर पाच फण्यांच्या शेषाने छत्र धरलेले आहे. या सिद्धिविनायकाच्या उजवीकडे गणेशाची आणखी एक मूर्ती विराजमान आहे. ती जुनी दगडी मूर्ती आहे व करवीर माहात्म्यात अगस्ती-लोपामुद्रा यांनी येथे ज्या गणरायाचे दर्शन घेतले असा उल्लेख आहे, तो गणेश हाच असे मानले जाते. त्यास वरदविनायक म्हटले जाते. सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या उजवीकडे नागदेवतेचीही मूर्ती आहे.
मंदिराच्या प्रांगणात महादेवाचे आणि गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. मुख्य रस्त्यावरून पायऱ्यांनी खाली उतरल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. गणपतीच्या दोन मूर्ती हे जसे येथील सिद्धिविनायकाच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे, त्याच प्रमाणे या महादेवाच्या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथे दोन नंदी आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील शिवपिंडीही वेगळ्या स्वरूपाची आहे. तिची शाळुंका चौकोनाकार आहे व त्यावर शंकराचा मुखवटा व नागफणा आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या डाव्या बाजूला गोपाळकृष्णाचे आधुनिक पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात राधा कृष्णाची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे.
सिद्धिविनायक मंदिरात भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेशजन्माचा उत्सव अत्यंत जल्लोषात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतो. येथे संकष्ट चतुर्थी आणि विनायकी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. नवरात्रात ललितापंचमीच्या दिवशी गणरायातर्फे आदिशक्ती श्री महालक्ष्मीची ओटी भरली जाते. या मंदिरात दुर्वांकूर पूजा, पाद्यपूजा व पंचामृत अभिषेक पूजाही केली जाते. त्याकरीता ठराविक दक्षिणा आकारली जाते. भाविकांच्या इच्छेनुसार पूजाविधी करून प्रसाद पोष्टाने पाठविण्याची सोयही येथे आहे. येथे दर संकष्टी चतुर्थीस खिचडी वाटप केले जाते.