अणजूर (अंजूर) हे भिवंडी तालुक्यातील एक लहानसे गाव. कल्याण व ठाण्याची खाडी यांच्या पोटात शिरलेले हे भिवंडीचे भूशीर समजले जाते. येथील एका पेशवेकालीन वाड्यात सिद्धिविनायकाचे अधिष्ठान आहे. ‘अणजूरकर नाईकांचा वाडा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वास्तूतील गणेशाची ‘नवसाला पावणारा देव’ अशी ख्याती आहे. या गणेशाची मनोभावे सेवा केल्यास अपत्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या इच्छापूर्ती गणेशाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येथे येतात.
ऐतिहासिक माहितीनुसार, गंगाजी नाईक नावाच्या सरदाराने इ.स. १७१८ मध्ये या मंदिराची स्थापना केली. ‘साष्टीची बखर’मधील संपादकीय टिपणांनुसार, नाईक यांच्या घराण्याचे मूळ आडनाव ‘राणे’ होते. बाराव्या-तेराव्या शतकात मुंबईसह साष्टी बेटावर बिंब राजाची सत्ता होती. माहीम ऊर्फ बिंबस्थान येथे त्याची राजधानी होती. इ.स. १२१२ मध्ये राणे घराण्यातील एका पुरुषाने महीबिंब या राजाच्या निधनानंतर त्याची पत्नी कामाई आणि मुलगा केशवदेव यांना माहीमच्या हरद पुरो याच्या साह्याने एका संकटातून वाचवले होते. यानंतर या घराण्यास ‘नाईक’ ही मानाची पदवी बहाल करण्यात आली. या संकटाविषयी ‘महिकावतीची बखर’मध्ये असे म्हटले आहे, की महीबिंबाच्या प्रधानाची कामाईवर वाईट नजर होती. तेव्हा कामाईने ‘तेधवा माहिमाचा आपला अधिकारी बोलाविला । त्यासि वृत्तांत सांगितला।
जरी प्रधान दुष्टबुद्धी त्यास कैसा येत्न करावा । हरद पुरी अदिकारि बोलिला । जर तू आणची माता । जुत पाहे ऐसा कोण आहे।’ या नंतर त्यांनी ‘सूर्यअस्त होतेच माहाला प्रधानाचा वेढिला । तेथे युद्ध जाले । पाहाल्या पाहाल्या प्रधान मारिला ।’ पुढे १५८० ते १५९० च्या दरम्यान या घराण्यातील बाळ नाईक, भिव नाईक व तान नाईक हे बंधू फिरंग्यांच्या जुलमामुळे वांद्र्यावरून कळव्यास व तेथून अणजूर येथे येऊन स्थायिक झाले.
इ.स. १५३३ पासून वसई, कल्याण, ठाणे, मुंबई आणि रेवदंडा या भागावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. इ.स. १६६१-६२ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहाप्रीत्यर्थ पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली. मात्र ठाणे, कल्याण, वसई आणि रेवदंडा भागावर पोर्तुगीजांचा अंमल कायम होता. त्यावेळी पोर्तुगीजांनी स्थानिकांवर अनन्वित अत्याचार केले. अनेकांची वतने हिरावून घेतली. धर्मांतरही घडवून आणले. या पार्श्वभूमीवर नाईक घराण्यातील निंबाजी नाईक यांनी पोर्तुगीजांविरोधात लढा पुकारला. या लढ्यात मदत मिळावी या हेतूने त्यांनी प्रल्हाद जोशी नावाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठवले. मात्र, संभाजी महाराजांवर आपत्ती आल्याने त्यांची मदत निंबाजी यांना मिळू शकली नाही.
निंबाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या सहा अपत्यांपैकी गंगाजी यांनी पित्याचे अपूर्ण काम हाती घेतले. साष्टीच्या बखरीत याबाबत असे म्हटले आहे की ‘तो दुष्ट राजा (फिरंगी) देव धर्म माराष्ट्रचा चालु देत नाहि रयत वाटविली व आमचि घरे बाटविलि।’ हे दुःख त्यांच्या मनी होते. ‘आपले वडिलाचे चालत आलें ते चालवावें आपलि देवालये तिर्थें क्षेत्रे मुक्त व्हाविं मराष्ट्र राजा मराष्ट्र धर्म व्हावा’ ही त्यांची भावना होती. या कार्याला आपले कुलदैवत असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराचा आशीर्वाद मिळावा, यासाठी इ.स. १७१८ मध्ये ते मोरगाव येथे गेले. फक्त एक जुना शेला, धोतर, मुंडासे आणि अर्धा रुपया घेऊन ते निघाले होते. अणजूर ते मोरगाव हे सुमारे २३० कि.मी. अंतर चालत असताना वाटेत दमाजी थोरात या सरदाराच्या बेरडांनी त्यांना लुटले. मात्र मारहाण केली नाही. मोरगावपर्यंतचा त्यांचा सात दिवसांचा प्रवास निराहार होता. मोरगावातही त्यांनी चौदा दिवस निराहार व्रत केले. एकवीस दिवसांच्या या अनुष्ठानानंतर त्यांना गणपतीने दृष्टांत देऊन चिंचवडला जाण्यास सुचवले. त्यानुसार ते चिंचवडला गेले. तेथे मोरया गोसावींचे नातू नारायणदेव यांनी त्यांचे पुत्र चिंतामणी (दुसरे) यांच्याकरवी गंगाजी यांना अनुग्रह दिला. त्यावेळी चिंतामणी म्हणाले की ‘तूं क्षत्रियवंशांत उत्पन्न होऊन स्वधर्मरक्षण करण्यास यत्न करितोस तर तुजला मी तलवार देतों ती ही घे व हा उजव्या शुंडेचा गणपति देतों हा कार्यसिद्धि करिल असें म्हणून पाण्यातून एक धोंडा काढून दिधला तो उजव्याच सोंडिचा गणपति दिसला.’ अणजूरला परत आल्यावर गंगाजींनी इ. स. १७१८ मध्ये चंपाषष्टीच्या मुहूर्तावर आपल्या वाड्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे इ. स. १७३९ मध्ये शूरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसई किल्ला आणि आजूबाजूचा प्रांत जिंकला. वसईची मोहीम फत्ते झाल्यावर नाईकांच्या वाड्यातील सिद्धिविनायकावर परिसरातील लोकांची श्रद्धा बसली ती आजही कायम आहे. येथील स्थानिकांकडून या वाड्यास ‘इनामदारांची माडी’ व येथील गणपतीस ‘माडीतला गणपती’ असेही संबोधिले जाते.
ठाणे-नाशिक रस्त्यापासून जवळ असलेल्या अणजूर गावातील हा वाडा पेशवेकालीन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. चुना व दगडाचा वापर करून बांधलेल्या या वाड्याभोवती दगडी भिंत आहे. वाड्याच्या मागील बाजूस घडीव दगडांनी बांधलेली पुष्करणी (तळे) आहे. मातीचे प्रांगण असलेल्या वाड्यात जाण्यासाठी दोन जिने आहेत. कौलारू छत असलेल्या वाड्याच्या बांधकामात जास्तीत जास्त लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे. लाकडी खांब, लाकडी तुळया आणि फळ्यांचा त्यात समावेश आहे. या वाड्यात पूर्वीच्या काळी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या, देवळ्या, कोनाडे व लाकडी जिने पाहायला मिळतात. येथील दरवाजा, त्याची चौकट आणि खांबांवर आकर्षक कोरीवकाम आहे. दरवाजाच्या ललाटबिंबावर लाकडात कोरलेली गणेशमूर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूस सिद्धिविनायक गणेशाची मोठी प्रतिमा आहे.
आतील खोलीत अनेक देव-देवतांच्या प्रतिमा आहेत. येथे नाईक (अणजूरकर) घराण्याची वंशावळ आहे. येथेच मोठ्या लाकडी मखरात व पितळेच्या आकर्षक देव्हाऱ्यात सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. पितळी देव्हाऱ्याच्या चार खांबांवर घुमट आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीची ही दगडी मूर्ती आठ इंचाची आहे. या शेंदूरचर्चित मूर्तीच्या कपाळावरील भाग थोडा पुढे आहे. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आहे. सुमारे २७५ वर्षे मूर्तीवर मधूनमधून शेंदूरलेपन होत असल्याने तिचे आकारमान वाढले होते. त्यामुळे या मूर्तीचा आकार दरवर्षी वाढतो, अशी भाविकांची समजूत झाली होती. १९७७ मध्ये मूर्तीवरील शेंदूराचे बाह्य आवरण दुभंगल्याने मूर्ती मूळ स्वरूपात दिसू लागली. त्यानंतर धार्मिक विधी झाल्यावर मूर्तीवर शेंदूराचे पातळ आवरण देण्यात आले. नंतर मूर्तीची पुन्हा विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्तीच्या गळ्यात मोत्यांचे सर आहेत. मूर्तीसमोर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. देव्हाऱ्यात इतर मूर्तीही आहेत. मूर्ती उजव्या सोंडेची असल्याने सोवळे पाळावे लागते. त्यामुळे गर्भगृहात केवळ पुजाऱ्यांनाच जाता येते. भाविकांना बाहेर उभे राहून दर्शन घ्यावे लागते.
दररोज सकाळी मूर्तीवर अभिषेक केला जातो. सकाळी ८.१५ व सायंकाळी ७ वाजता आरती होते. दुपारी गणेशाला सुग्रास नैवेद्य दाखवला जातो. दर विनायकी व संकष्टी चतुर्थीला येथे महाआरती होते. अंगारकी चतुर्थीला गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. भाद्रपद चतुर्थीला गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. सात दिवस चालणाऱ्या येथील गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. माघ महिन्यात येथे गणेश जयंतीचा मोठा उत्सव होतो. गणेश जयंतीच्या आठवडाभर आधी गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने होतात. माघी चतुर्थीला लघुरुद्र अभिषेक होतो. त्या रात्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला पलंगावर झोपविले जाते. सकाळी काकड आरती करून पुन्हा उठविले जाते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या सिद्धिविनायकाचे भाविकांना दर्शन घेता येते.