सिध्देश्वर पावणाई मंदिर

साळशी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

कोकणातील प्रत्येक गावाचे देवस्थान हे १२, ३६, ६४ आणि ८४ खेड्यांचा अधिपती असलेल्या देवस्थानांच्या आधीन येतात. त्या प्रमाणे त्या त्या देवांचा मानपान करण्याचे रिवाज कोकणात पाळले जातात. अशाच ८४ खेड्यांचे अधिपत्य असलेले सिध्देश्वर पावणाई मंदिर देवगड तालुक्यातील साळशी या गावात आहे. राजेशाहीत हे महालाचे म्हणजेच तालुक्याचे गाव होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोजक्या गाव-इनामी देवस्थानांपैकी हे एक देवस्थान आहे.

सिद्धेश्वर पावणाई मंदिर हे ६०० वर्षे प्राचीन असावे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत असे सांगितले जाते की पंधराव्या शतकात पैठण येथील मिराशी घराणे आपले कुलदैवत घेऊन या ठिकाणी आले. तेव्हापासून साळशी हे गाव आणि देवस्थान वसलेले आहे. छत्रपती शंभू राजे यांनी इ.स. १७२२ मध्ये या मंदिरास इनाम सनद दिली होती. ती इ. स. १८१८ पर्यंत सुरू होती. पुढे ब्रिटिशांनी छत्रपतींची सनद ग्राह्य मानून ३० ऑगस्ट १८६४ रोजी या मंदिरास सनद दिली. या सनदेत साळशी गावातील शेती महसूल देवस्थानाने जमा करायचा व त्यातील १/८ इतका वाटा सरकारजमा करून बाकीच्या रकमेतून देवस्थानचे दिवाबत्ती व्यवस्थापन पहावे, असा उल्लेख आहे. आजही मंदिराचा कारभार या सनदेनुसारच चालतो.

रस्त्यालगत असलेल्या सिध्देश्वर मंदिरास जांभ्या दगडांची सीमाभिंत आहे. या सीमाभिंतीत असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात सिध्देश्वर मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील प्राचीन गणेश मूर्ती आहे. याशिवाय या चौथऱ्यावर देवीची मूर्ती व पाषाण आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या दुसऱ्या कमी उंचीच्या चौथऱ्यावर पाच दीपस्तंभ आहेत. त्यासमोरील चौथऱ्यावर सात स्तरीय दीपस्तंभ आहे. त्यातील प्रत्येक थर हा कमळ फुलाच्या नक्षीदार कलाकुसरीने विभागलेला आहे. या दीपस्तंभाच्या टोकावर आमलक व कळस आहे.

हे मंदिर उंच जगतीवर आहे. प्रांगणातून मंदिरात जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा असून दोन्ही बाजूस भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर अखंड पाषाणातील नंदीची मोठी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडे गणेश व उजवीकडे शंख व गदाधारी विष्णू मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. या गर्भगृहास पायऱ्या पायऱ्यांच्या आकाराचे शिखर आहे, तर मंदिरावर सुमारे ५० फूट उंचीचे शिखर आहे. या शिखराच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या थरात अनेक देवकोष्ठके आहेत व त्यामध्ये देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिरात केवळ पुरुषांनाच प्रवेश आहे.

सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी पावणाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरालाही सीमाभिंत असून त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या समोरील भागात पाच दीपस्तंभ आहेत. दोन सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर हे काँक्रिटचे असले तरी पावणाई देवीचे मंदिर मात्र कौलारू व कोकणी पद्धतीचे आहे. संपूर्ण बांधकामात जास्तीत जास्त लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. दोन्ही सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचे आहेत व त्याच्या बाजूने कक्षासने आहेत. मुख्य सभामंडपास आतील बाजूस सहा-सहा व बाहेरील बाजूस सहा-सहा लाकडी खांब आहेत. आतील खांबांवर कोरीवकाम केलेले आहे. दोन खांबांच्या मध्ये असलेल्या कमानीवरही पाना-फुलांचे नक्षीकाम आहे व तेथे हनुमान, गरुड, ब्रह्मदेव, विष्णू तसेच श्रीकृष्णाची मराठा शैलीतील उठावशिल्पे कोरलेली आहेत. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे. तेथे प्रकाश व हवा येण्यासाठी अनेक गवाक्ष आहेत. अंतराळाच्या त्रिशाखीय प्रवेशद्वारावर दशावतार कोरलेले आहेत. तसेच द्वारचौकटीवर कीर्तिमुख व त्याच्या बाजूस अनेक नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. अंतराळात सहा अष्टकोनी लाकडी स्तंभ आहेत. स्तंभांचा वरील भाग वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामाने सुशोभित आहे.

गर्भगृहात पावणाई देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज उभी मूर्ती आहे. देवीच्या वरच्या दोन हातांत डमरू व त्रिशूल आहे. खालच्या हातांत तलवार व अमृत पात्र आहे. देवीच्या पायाजवळ एका बाजूला वाघ व दुसऱ्या बाजूस स्त्रीरूपी शक्ती आहे. डोक्यावर मुकुट, अंगावर उंची वस्त्रे व अलंकार आहेत. बाजूला शिव (बाबा) व काळकाई ( कालिका माता) यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. कोल्हापूर येथील अंबाबाईची, तुळजापूरची भवानी आणि पावणाई देवी या तिन्ही मूर्तींच्या जडणघडणीत बरेच साम्य आढळते.

मंदिराच्या प्रांगणात अनेक जैन मूर्ती आहेत. तसेच तळखांब वाशिक, गांगो, इटलाई, बाणकी देवी, धुरी ब्राह्मण देव, बांदा ब्राह्मण देव, सत्पुरुष स्थान, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, वटेश्र्वर मंदिर, रवळनाथ मंदिर, देवनाथ मंदिर अशी मंदिरे आहेत. या परिसरात असलेल्या धर्मशाळेजवळ दोन प्राचीन तोफा आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस अनेक समाध्या आहेत.

या मंदिरात दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ढोल-ताशांचा गजर, चौऱ्या, निशाण, देखावे असा राजेशाही थाट या सोहळ्याला असतो. याशिवाय गोकुळाष्टमी, शिमगा, हरिनाम सप्ताह, दिवाळी, कार्तिकी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमा असे उत्सवही येथे साजरे केले जातात. या मंदिरातील नंदादीप अखंड तेवत असतो. याशिवाय येथे देवीला कौल लावण्याची पद्धत आहे. या देवस्थानाच्या अखत्यारित येणाऱ्या ८४ खेड्यांतील ग्रामस्थ आपल्या घरातील शुभकार्याच्या वेळी देवीस नारळ-सुपारी अर्पण करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतात.

ऐतिहासिक नोंदींनुसार, येथे राजेशाही असताना ‘साळस महाल’ हे तालुक्याचे ठिकाण होते. त्यावेळी साळशी हे मुख्य बाजारपेठेचे गाव होते. साळस महालात बारा बलुतेदार होते. विशेष म्हणजे या महालाच्या नावाने ओळखली जाणारी वजने व मापे आजही येथे वापरली जातात. विशेषत: साळशी पायली हे माप संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचलित आहे. साळशीतील माळरानावर असलेले कोरीव कातळशिल्प सन २०२० मध्ये प्रकाशात आले. यामुळे या भागात प्रागैतिहासिक काळापासून लोकवस्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून ३० किमी, तर खारेपाटणपासून ४२ किमी अंतरावर
  • देवगड, मालवणपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात न्याहरी व धर्मशाळेची व्यवस्था आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३६४ २३६२८५
Back To Home