फुलंब्री तालुक्यात पाल येथे गिरिजा नदीच्या काठावरील सिद्धेश्वर महादेव मंदिर संपूर्ण जिल्ह्याचे आराध्यदैवत मानले जाते. गिरिजा हे जसे या नदीचे नाव आहे, तसेच ते पार्वतीचेही एक नाव आहे. तिच्या सोबत येथे सिद्धेश्वर महादेव वसले असल्याची भाविकांची धारणा आहे. हेमाडपंती शैलीतील या प्राचीन मंदिरातील शिवलिंग जागृत असल्याची श्रद्धा असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील असंख्य भाविक येथे बाराही महिने दर्शनासाठी येत असतात.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी या मंदिरात सिद्धमय नावाचे तपस्वी तपस्या करत. अनेक वर्षे ते या मंदिरात शंकराची सेवा करत होते. काशीला जाऊन गंगेचे पाणी आणून येथील शिवलिंगावर अभिषेक करावा, अशी त्यांची इच्छा होती. पण येथून काशीचे अंतर खूप असल्याने त्यांना ते शक्य होत नव्हते. एके दिवशी त्याच विचारात निद्रावस्थेत असताना त्यांना शंकराने दृष्टांत दिला. ‘तुझे वास्तव्य असलेल्या मंदिरानजीकच्या कोरड्या विहिरीतच गंगा प्रकट झाली आहे,’ असे शंकराने त्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांनी विहिरीजवळ येऊन पाहिले असता, ती विहीर काठोकाठ भऱल्याचे त्यांना दिसले. तेव्हापासून हे मंदिर त्यांच्या नावाने म्हणजेच सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
शैव आगमानुसार, सिद्धेश्वर हा संस्कृत शब्द अशा ६८ स्थानांच्या संदर्भात आहे की जेथे स्वयंभुवलिंग म्हणजेच स्वयंभू शिवलिंग स्थापित आहे. हे शिवलिंग सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते व अनादी काळापासून अस्तित्वात असते. त्यामुळेच ते क्षतीग्रस्त झाले तरी त्याच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता नसते. सिद्धेश्वर लिंगावर निवास करणाऱ्या देवतांमध्ये ध्वनी ही मुख्य देवता असते. देशभरात अनेक ठिकाणी सिद्धेश्वर रुपातील शंकराची मंदिरे आहेत. अरुणाचल प्रदेशातील हापोली शहरात सर्वांत उंच असे शिवलिंग असून ते सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मराठवाड्यातील टोका कायगाव, तसेच पिशोर येथेही सिद्धेश्वराचे मंदिर आहे. पौराणिक कथांमध्ये शंकरास सिद्धीदाता देव असे म्हटले आहे. सहा महिने नियमपूर्वक श्रीसिद्धेश्वराची पूजा केल्यास मनोवांछित सिद्धी प्राप्त होते, तसेच कृष्णपक्षातील अष्टमी आणि चतुर्दशीला जो सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन करतो त्यास शिवलोक प्राप्त होतो, अशीही धार्मिक श्रद्धा आहे.
पालमधील गिरिजा नदीकाठी असलेल्या या सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात अनेक झाडे आहेत. मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारण्यात आले असून ते अशा प्रकारच्या अन्य मंदिरांच्या तुलनेत लहान आकाराचे आहे. या मंदिराचा नेमका इतिहास अज्ञात आहे. मात्र स्थापत्यशैली आणि खासकरून मंदिरातील दगडी खांबांवरील कीचकमूर्ती पाहता ते चालुक्योत्तर काळातील असावे, असा अंदाज बांधण्यात येतो.
मंदिरासमोर एका चौथऱ्यावर शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती आहे. उघड्यावर असलेली ही मूर्ती अखंड पाषाण शिळेतून कोरलेली आहे. मूर्तीवरील कोरीव काम हे प्रामुख्याने भौमितिक आकारात दिसते. त्रिकोणाकृती शिंगे, दुमडलेले पाय, गळ्यातील चौकोनाकृती घंटांची माळ यामुळे हा नंदी आगळावेगळा ठरतो. या पुढे काही अंतरावर मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार तसेच सभामंडपाच्या भिंतींच्या बांधकामातही प्रामुख्याने चौरस वा आयताकृतींचा वापर करण्यात आला आहे. प्रवेशद्वारास रुंद पाषाणस्तंभांची चौकट आहे. चौकटीच्या वरच्या भागात ललाटबिंबावर ओम कोरलेला आहे. त्याशेजारीच आडवा त्रिशूल व डमरू आणि दुसऱ्या बाजूस मंदिराच्या जीर्णोद्धाराची तारीख (२.२.२००२) कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात सज्जासारखा भाग असून त्याच्या वर छोट्या अर्धवर्तुळाकार देवळीमध्ये शिवपंचायतन आहे. काळ्या पाषाणातील या मंदिराच्या सभामंडपाचा वरचा कठड्यासारखा दिसणारा भाग, तसेच मंदिराची शिखरे मात्र जीर्णोद्धाराच्या वेळी रंगविण्यात आली आहेत.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत. खालच्या बाजूस चौकोनाकार, छताकडील भाग वर्तुळाकार, त्यावर गोलाकार चकतीसारखा दिसणारा भाग म्हणजे कणी, त्यावर आडवा चौकोनी फळीसारखा दगडी भाग आणि त्याच्यावर जेथे स्तंभ वरील दगडी तुळईस टेकतो तेथे तरंगहस्त आहे. हा तुळईस खालून आधार देणारा अधिकच्या आकाराचा भाग असून त्या तरंगहस्तावर कीचक म्हणजेच यक्षमूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या अंतराळात असलेल्या गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर विविध शिल्पे आहेत.
सभागृहात आतील बाजूस असलेल्या स्तंभांमध्ये एका वेळी दोनच माणसे जाऊ शकतील एवढेच अंतर आहे. त्यातून पुढे जाताच अंतराळ आणि त्या पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार द्विशाखीय म्हणजे दोन द्वारपट्ट्या असलेले आहे. या दोन्ही शाखांवर वरच्या बाजूस सारखेच नक्षीकाम असून खाली सूरसुंदरींच्या प्रतिमा आहेत. गाभाऱ्याच्या द्वारास उंच उंबरठा म्हणजेच मंडारक आहे. त्यावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. गर्भगृहात आत खालच्या बाजूस संगमरवरी फरशीवर मधोमध मोठे पितळी शिवलिंग आहे. त्यावरील शाळुंकेच्या पाणी प्रवाहित होणाऱ्या मार्गाच्या मुखावर बाजूला दोन मोठ्या शंखाकृती कोरलेल्या आहेत.
या गर्भगृहावरील उंच शिखर नागरशैलीशी साधर्म्य असणारे आहे. त्यावर चार स्तरांत देवळ्या बनविलेल्या आहेत. या देवळ्यांमध्ये देव–देवतांच्या मूर्ती आहेत. या शिखराच्या खाली समोर म्हणजेच अंतराळावरही छोटे शिखर आहे. त्याहून लहान आकाराची दोन शिखरे सभागृहावर आहेत. मोठा आमलक आणि त्यावर कळस असे या शिखरांचे स्वरूप आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर या परिसरात एक बारव दिसते. या बारवेत गंगा प्रकट झाली होती, असे सांगण्यात येते. मंदिराच्या प्रांगणास पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. येथे प. पू. जानकीदासराम महाराज आणि २१ ऑक्टोबर २०११ रोजी अनंतात विलीन झालेले प. पू. निर्वाणदास मुनी महाराज यांच्या शेजारी शेजारी बांधलेल्या समाध्या आहेत. प्रांगणात गणेशाचे तसेच संतोषी मातेचे मंदिरही आहे.
सिद्धेश्वर महादेवाच्या या प्राचीन मंदिरात दर सोमवारी दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. खासकरून श्रावण महिन्यातील सोमवारी तसेच महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीस मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवला जातो. यावेळी येथे हजारो भाविकांची गर्दी असते. दर श्रावणी सोमवारीही मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.