सिद्ध महालक्ष्मी मंदिर

शेगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा

विदर्भाची पंढरी म्हणून विख्यात असलेल्या शेगावच्या पवित्र भूमीत, श्री गजानन महाराज संस्थानापासून हाकेच्या अंतरावर वसलेले श्री क्षेत्र शक्तिपीठ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. मतिमंद मुलांच्या शाळेसाठी खोदकाम करताना डिसेंबर २०२० मध्ये सिद्ध महालक्ष्मीची स्वयंभू मूर्ती येथे सापडली. काळ्या गंडकी पाषाणात साकारलेली ही मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. एकाच पाषाणात आदिमाता महालक्ष्मी आणि भगवान नारायण यांचे दिव्य आणि दुर्मीळ दर्शन या मूर्तीत घडते. एकाच मूर्तीमध्ये लक्ष्मीनारायणाचे दर्शन होणे ही बाब भक्तांसाठी अत्यंत सौभाग्याची आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.

पौराणिक कथांनुसार, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच नारायण हे चराचर सृष्टीचे पालनकर्ते आणि एकमेकांचे अविभाज्य भाग मानले जातात. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा चौदा रत्नांपैकी एक म्हणून माता लक्ष्मी प्रकट झाली, तेव्हा तिने सर्व देव, दानव आणि ऋषीमुनींमध्ये केवळ भगवान विष्णूंच्या शांत, गंभीर आणि धर्मनिष्ठ स्वरूपाची निवड करून त्यांच्या गळ्यात वरमाला घातली. तेव्हापासून लक्ष्मी आणि नारायण यांचे नाते हे केवळ पती-पत्नीचे नसून ते शक्ती आणि शक्तिमान असे आहे. विष्णू जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात, तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा सीता, रुक्मिणी किंवा पद्मावती अशा विविध रूपांत त्यांच्या सोबत असते, यावरून त्यांचे अतूट नाते स्पष्ट होते.

आध्यात्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून पाहता, लक्ष्मी आणि नारायण यांचे एकत्र असणे हे मानवी जीवनासाठी अत्यंत फलदायी आणि महत्त्वाचे मानले जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लक्ष्मी ही संपत्तीची, वैभवाची आणि ऐश्वर्याची देवी आहे, तर विष्णू हे धर्माचे, नीतीचे आणि मर्यादेचे रक्षक आहेत. जिथे लक्ष्मी आणि नारायण एकत्र असतात, तिथे संपत्तीसोबत सद्बुद्धी आणि नीतिमत्ताही वास करते.

शेगाव-बाळापूर मार्गावर, गजानन महाराज संस्थानाने उभारलेल्या ‘आनंदसागर’ प्रकल्पापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर नागपूर येथील आविष्कार संस्थेतर्फे श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय उभारण्यात आले आहे. हे विद्यालय उभारण्यासाठी खोदकाम सुरू असताना डिसेंबर २०२० मध्ये जमिनीत देवीची ही मूर्ती सापडली. त्यानंतर येथे भव्य मंदिर उभारण्यात आले. २७ जानेवारी २०२३ रोजी या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिरासमोर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेले मोठे प्रांगण आहे. प्रांगणात दोन्ही बाजूंना दीपमाळा आहेत आणि त्यासमोरच असलेले गजराज भाविकांचे स्वागत करतात. येथून काही पावलांवरच हनुमानाचे स्थान आहे. येथील हनुमानाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना सिंहांची शिल्पे आहेत. मंदिरासमोर मोठी प्रवेश कमान आहे, त्यावर मेघडंबरी आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना दोन्ही बाजूंना तुतारी घेऊन उभे असलेल्या शिलेदारांचे शिल्प नजरेस पडते. प्रांगणाच्या उजवीकडे असलेल्या दर्शनबारीतून थेट मंदिरापर्यंत येता येते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन द्वारपाल तसेच गजराजांचे शिल्प भाविकांचे स्वागत करतात. मुखमंडप, अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपातील स्तंभांवर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या गर्भगृहासमोर सोनेरी रंग दिलेले तसेच आकर्षक कलाकुसर असलेले सुंदर प्रवेशद्वार आहे ज्यावर घुमटाकार शिखर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाचे स्थान आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावरील आकर्षक मखरात देवीची मूर्ती विराजमान आहे. या एकाच मूर्तीमध्ये आदिमाता महालक्ष्मी आणि भगवान श्रीनारायण यांचे एकत्रित दर्शन होते. ही देखणी मूर्ती पवित्र अशा काळ्या गंडकी पाषाणात म्हणजेच शालिग्राम शिळेत अत्यंत कौशल्याने कोरलेली आहे. या एकाच शिळेच्या उजव्या भागात महालक्ष्मीचे वात्सल्यपूर्ण रूप दिसते, जिच्या चेहऱ्यावर कोमल भाव आहेत, नाकात नथ आहे आणि खाली झुकलेले डोळे मातेची लज्जा व प्रेम व्यक्त करतात. तर याच मूर्तीच्या डाव्या भागात भगवान विष्णूंचे तेजस्वी रूप साकारलेले आहे. एका बाजूला देवीच्या
हातात समृद्धीचे प्रतीक असलेले कमळ आहे, तर दुसऱ्या बाजूला विष्णूंच्या हातात संरक्षणाचे सुदर्शन चक्र आहे. ही मूर्ती जमिनीच्या खोदकामात सापडलेली असल्याने तिला स्वयंभू मानले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणेच या मूर्तीला दररोज सुवर्णालंकार आणि वस्त्रांनी नित्यनियमाने सजवले जाते, ज्यामुळे तिचे सौंदर्य आणि त्यामागील कलाकुसर केलेली प्रभावळ अधिकच खुलून दिसते. मूर्तीसमोर श्रीविष्णू-लक्ष्मी परिवाराच्या मूर्ती आहेत. येथे गणेश, कुबेर, सरस्वती तसेच गजराजांच्या धातूच्या मूर्ती आहेत. येथे श्रीयंत्र तसेच ध्वजपताकाही आहेत.

या मंदिरात कालभैरव, त्र्यंबोलीमाता तसेच कुबेरदेवाचेही दर्शन होते. कुबेरदेवाचे दर्शन घेतल्यानंतर तळघरातील बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. सुरुवातीलाच नंदीची मूर्ती आहे. भाविकांना प्राचीन शिवालयात आल्याचा अनुभव येण्यासाठी येथील भिंतींवर हेमाडपंती स्थापत्यशैलीसारखी रचना करण्यात आली आहे. येथे बारा ज्योतिर्लिंगांबरोबरच स्फटिक तसेच शुद्ध पाऱ्यापासून बनवण्यात आलेल्या शिवलिंगांचेही दर्शन होते. येथे द्विनेत्र शिवलिंग, अर्धनारीनटेश्वर शिवलिंग, ब्रह्मलिंग तसेच १००१ रुद्राक्ष एकत्र करून निर्माण केलेले शिवलिंगही आहे. येथे शिवशंकरांची भव्य, ध्यानस्थ मूर्तीही विराजमान आहे. ओंकारेश्वर व केदारनाथाच्या शिवलिंगाच्या प्रतिकृतीच्या वरच्या बाजूस असलेल्या गोमुखातून येथील शिवलिंगांवर जलाभिषेक होतो. या मंदिराच्या परिसरात एक ध्यानमंदिरही आहे. येथेही शिवशंकरांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहावर वर निमुळत्या होत गेलेल्या चौकोनी शिखरावर देवकोष्ठकांच्या प्रतिकृती आहेत. येथे सूर्यप्रतिमाही आहेत. शिखरावर आमलक व कळस आहे.

हे मंदिर सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत दर्शनासाठी खुले असते. येथे नित्यनेमाने पूजाअर्चा करण्यात येते. कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिराप्रमाणेच येथील मूर्तीलाही साजशृंगार करण्यात येतो. मंदिर परिसरात भक्तनिवास, ‘स्वावलंबन व्हिलेज शॉर्ट स्टे होम’, ‘पूर्णब्रह्म प्रसादालय’, गोसेवा केंद्र, निसर्गोपचार केंद्र तसेच दिव्यांग हस्तकला केंद्रही आहे. जवळच लहान मुलांसाठी उद्यानही आहे. परिसरात गजानन महाराजांची संगमरवरी दगडात घडवलेली भव्य मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, गणेश, दत्तात्रेय आणि साईबाबांच्याही मूर्ती आहेत.

उपयुक्त माहिती:

  • शेगाव येथून ५ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ७० किमी अंतरावर
  • शेगावर येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी विविध पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८७६७० ७३५२०

सिद्ध महालक्ष्मी मंदिर

शेगांव, ताल. शेगांव, जिला. बुलढाणा

Back To Home