सिद्ध बटुकेश्वर मंदिर

शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या आदिशक्ती महालक्ष्मीमातेचे स्थान असलेल्या करवीर या नगरात चार दिशांना चार संरक्षक देवतांची स्थाने आहेत. ती अशी – पूर्व दिशेला उज्ज्वलांबा म्हणजे उजळाई देवी, उत्तरेला ज्योतिबा, दक्षिणेला कात्यायिनी देवी व पश्चिमेस सिद्ध बटुकेश्वराचे मंदिर. ‘श्री करवीर माहात्म्य’च्या सातव्या अध्यायात ‘पश्चिमेस सिद्ध बटुकेश्वर’ असा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे मंदिर शिंगणापूर येथील चंबुखडी या भागात एका उंच टेकडीवर स्थित आहे. येथील गणेश सर्व मनोकामना पूर्ण करणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

‘श्री करवीर माहात्म्य’ या ग्रंथात या स्थानाचे माहात्म्य व आख्यायिका नमूद करण्यात आली आहे. करवीर माहात्म्य हा ग्रंथ दाजीबा जोशीराव यांनी १८२१ ते १८३२ या कालखंडात, म्हणजे पेशवाई संपून इंग्रजांची राजवट सुरू झाल्यानंतरच्या काळात लिहिला होता. त्याच्या ४८ व्या अध्यायात सिद्ध म्हणजे गणेश आणि बटुकेश्वर म्हणजे भैरवनाथ यांच्या कोल्हासुराशी झालेल्या युद्धाचे वर्णन आहे. अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपमुद्रा भारतभ्रमण करत असताना करवीर नगरीत आले होते. त्यांनी येथील सर्व तीर्थांचे आणि मंदिरांचे दर्शन घेतले. त्या प्रत्येक ठिकाणी लोपमुद्रा अगस्ती ऋषींना त्या स्थानाची आख्यायिका सांगत असे.

सिद्ध बटुकेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की कोल्हासूर या दैत्याचे राज्य पूर्वी या भागात होते. त्याने येथील चारी बाजूंना आपले प्रतिनिधी म्हणून असुरांची नियुक्ती केली होती. आदिमाया महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला आणि पश्चिम दिशेला असणाऱ्या मार्गावर कोल्हासुराचा सेनापती रक्ताक्ष याचे पारिपत्य करण्यासाठी गणेश आणि बटुक भैरव या दोघांना रक्ताक्षासोबत युद्ध करण्याचे आवाहन केले. दोघेही आपापल्या सैन्यासह येथे पोहोचले. रक्ताक्षाने बटुक भैरवावर मोहिनी घातली, त्यामुळे रक्ताक्षासमोर त्याचे काहीच चालले नाही. त्याला पराभव स्वीकारावा लागला. गणेशाने मात्र आपल्या सिद्धी आणि बुद्धीचा वापर करून रक्ताक्षाचे शिर धडावेगळे केले व विजय मिळवला. येथील परिसर पाहून आनंदित झालेल्या गणेशाने येथेच राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सिद्ध स्वरूपातील गणेश आणि बटुक भैरव येथेच कायमचे वास्तव्यास राहिले. बटुक भैरव ही शिवगणातील देवता व कालभैरवाचे बालरूप असल्याचे मानले जाते.

हमरस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूस, दोन छोट्या तळ्यांच्या काठी असलेल्या एका उंच टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. तेथे जाण्याकरीता पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. पूर्वी या टेकडीवर सिद्ध बटुकेश्वराचे छोटे मंदिर होते. त्याचे नूतनीकरण व मंदिर परिसराचाही विकास करण्यात आला आहे. मूळचे छोटेखानी मंदिर आणि त्यावर बांधण्यात आलेला सभामंडप असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या बाहेर कासवाची आणि त्याच्या पुढे नंदीची पांढऱ्या रंगातील मूर्ती आहे. तेथील भिंतीवर गणेश अथर्वशीर्ष लिहिलेले आहे.

सभामंडपातील सिद्ध बटुकेश्वराच्या मंदिराच्या भिंती संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेल्या आहेत. आत मध्यभागी गणेशाची दीड फूट उंचीची मूर्ती आहे. येथील गणेश हा उजव्या सोंडेचा आहे. ज्या गणपतीच्या सोंडेचे अग्र उजवीकडे वळलेले असते त्यास सिद्धिविनायक, तर ज्याच्या सोंडेचे अग्र डावीकडे वळलेले असते त्यास ऋद्धीविनायक असे म्हणतात. यानुसार येथील गणेश हा सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक हा मोक्षसिद्धीप्रद समजला जातो. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, त्यास जास्त सोवळे लागते, तो घरात ठेवू नये, असा अनेक भाविकांचा समज आहे. मात्र पंचांगकर्ते व खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या मते, हे गैरसमज आहेत व तसे कोणत्याही धर्मशास्त्रात म्हटलेले नाही. ते सांगतात की गणपती हा कधीही ‘कडक’ नसतो. तो कृपाळू व क्षमाशील असतो. गणपतीच्या डाव्या हातात लाडू किंवा मोदक असतो. तो खाण्यासाठी म्हणून सोंड डावीकडे केलेली असते. उजव्या हाताने तो आशीर्वाद देत असतो.

येथील सिद्ध गणेशाच्या मूर्तीच्या पायथ्याशी त्यांचे वाहन असलेला मूषक आहे. सोनेरी रंगाच्या पत्र्यापासून तयार केलेली व सुंदर नक्षीकाम असलेली महिरप गणेशमूर्तीच्या मागे आहे. गणेशाच्या डाव्या बाजूला बटुकेश्वराची मूर्ती आहे. येथील बटुक भैरव लिंग स्वरूपात आहे. काळ्या पाषाणातील हे शिवलिंग जमिनीस समतल आहे. या मंदिरावर चारी बाजूंनी उतरते असे सिमेंटचे छत आहे, तर सभामंडपाच्या छतावर या मंदिराच्या बरोबर वरच्या भागात उंच षटकोनी शिखर आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस येथील टेकडीखालील तळ्यात स्नान करून गणेशाची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे अनेक भाविक एक हजार दूर्वा वाहण्याचे व्रत करतात. या मंदिरात सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत रोज पंचोपचार करण्यात येतात. मंगळवार आणि शुक्रवारी अभिषेक असतो, तर संकष्टीला पहाटे ५.३० वाजता आणि रात्री चंद्रोदयावेळी अभिषेक व आरती करण्यात येते. माघी गणेश जयंतीला गणेशयाग व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात येतो. मंदिराच्या आवारात भाविकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. टेकडीवरून खाली कोल्हापूर शहराचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून ११ किमी अंतरावर
  • कोल्हापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
Back To Home