शुक्लेश्वर महादेव मंदिर
वाठोडा शुक्लेश्वर, ता. भातकुली, जि. अमरावती
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात पयोष्णी अर्थात पूर्णा नदीच्या तीरावर वाठोडा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर विदर्भातील शैव परंपरेचे एक प्राचीन केंद्र मानले जाते. येथील शिवपिंड दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी स्थापन केल्याची लोकश्रद्धा असून हे स्थान ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखले जाते. एकाच पाषाणात कोरलेली साडेअकरा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती, नदीकाठचा परिसर आणि शेकडो वर्षांची परंपरा यामुळे या मंदिराला भाविकांमध्ये मोठे श्रद्धेचे स्थान लाभले आहे. महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी जमते.
वाठोडा या परिसराचा इतिहास पयोष्णी नदीकाठच्या सुपीक खोऱ्याशी जोडलेला आहे. अमरावती जिल्हा गॅझेटिअरमधील नोंदीनुसार, पूर्णा नदीच्या खोऱ्यातील हा परिसर प्राचीन काळापासून राजकीय आणि व्यापारी दळणवळणाच्या मार्गावर वसलेला होता. या गावाला ‘वाठोडा शुक्लेश्वर’ हे जोडनाव येथील शुक्लेश्वर महादेव मंदिरामुळे मिळाले.
प्राचीन काळी या परिसरात असलेल्या वडाच्या वृक्षांच्या बागांवरून किंवा वस्त्यांवरून ‘वाठोडा’ आणि मंदिरातील अधिष्ठात्यावरून ‘शुक्लेश्वर’ अशी या नामाभिधानाची व्युत्पत्ती स्थानिक दस्तऐवजांमध्ये नोंदवली गेली आहे. गावाच्या सीमेवरून वाहणारी पयोष्णी नदी या स्थळाचे भौगोलिक महत्त्व स्पष्ट करते.
महाभारतातील वनपर्वामध्ये पयोष्णी नदीचा उल्लेख अत्यंत पावन तीर्थक्षेत्र म्हणून येतो. या नदीत स्नान केल्याने वाजपेय यज्ञाचे (ज्या यज्ञाने अन्नसमृद्धी, शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होते) पुण्य लाभते आणि पातकांचे क्षालन होते, अशी पौराणिक मान्यता आहे. स्थलमाहात्म्यानुसार, दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी या नदीतीरावर तपश्चर्या केली होती आणि शिवाची आराधना करण्यासाठी स्वतःच्या हातांनी येथे एका पाषाणलिंगाची स्थापना केली. शुक्राचार्यांच्या नावावरूनच या देवालयाला ‘शुक्लेश्वर महादेव’ हे नाव पडले. काशी क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे मणिकर्णिका घाट आणि द्वादश ज्योतिर्लिंगांची उपासना केली जाते, त्याच धर्तीवर येथे पयोष्णी तीरावर साडेअकरा ज्योतिर्लिंगांची एकाच शिळेत प्रतिष्ठापना असल्याने विदर्भातील भाविक या तीर्थास ‘विदर्भाची काशी’ मानतात.
या स्थानाची प्राचीनता ऐतिहासिक साहित्यातही स्पष्ट होते. तेराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या विदर्भ भ्रमंतीदरम्यान वाठोडा येथे भेट दिल्याचा उल्लेख म्हाइंभट संकलित ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात येतो. त्यामुळे या स्थानाला किमान आठशे वर्षांचा लिखित इतिहास असल्याचे सिद्ध होते. संत परंपरेमध्येही या स्थानाचा महत्त्वाचा संदर्भ आढळतो. सन १९०५ मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रख्यात तत्त्वज्ञ संत गुलाबराव महाराज यांनी वाठोडा शुक्लेश्वर येथे येऊन श्रीमद्भागवतातील दशम स्कंधातील कात्यायनी व्रताची दीक्षा घेतली आणि सलग तेहतीस दिवस कठीण अनुष्ठान पूर्ण केले. त्यामुळे हे स्थान शाक्त परंपरेतही श्रद्धेस पात्र ठरले.
गावापासून काही अंतरावर नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिराभोवती सुमारे बारा फूट उंच भक्कम तटबंदी उभारलेली आहे. तटबंदीमध्ये प्रवेशासाठी दोन स्वतंत्र द्वारे आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराला तीन दगडी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभांवर असलेल्या देवकोष्टकांमध्ये देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण आणि त्यावरील सज्जावर चार दगडी स्तंभांवर तोललेला तीन शिखरांचा नगारखाना आहे.
तटबंदीच्या आत पेव्हरब्लॉकची फरसबंदी केलेले मोठे प्रांगण आणि त्यात तुळशीवृंदावन आहे. प्रांगणात मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप आहे व त्यात काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाची समोरील बाजू खुली आहे व त्यामध्ये दगडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांच्या तळावर आणि वरच्या कणीवर पद्मदलमंडल नक्षीकाम केलेले दिसते. हे सर्व स्तंभ महिरपी तोरणांनी परस्परांशी जोडलेले आहेत. अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर डाव्या व उजव्या बाजूस दोन देवकोष्टके आहेत. त्यांत गणपती आणि हनुमान यांच्या प्राचीन शेंदूरचर्चित मूर्ती आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार नक्षीदार द्वारशाखांनी युक्त आहे. गर्भगृह सभामंडपाच्या जमिनीपेक्षा किंचित खोल आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाची मोठी शिवपिंड आहे. मंदिराच्या सपाट छतावर पर्णलता व पुष्पलतांनी युक्त दगडी कठडा आहे. त्यावर प्रवेशद्वाराकडील बाजूस बाशिंगी रचना आहे. गर्भगृहाच्या छताच्या चारही कोपऱ्यांवर आमलक व कळस असलेली चार स्तंभवजा उपशिखरे आहेत. छताच्या मध्यभागी अष्टकोनी आधारावर मराठा-मोगल शैलीचा घुमट आहे. त्याच्या शीर्षभागी आठ छोट्या स्तंभांची अष्टकोनी छत्री, कलश आणि त्रिशूल बसवलेला आहे.
मंदिर संकुलात विविध कालखंडांतील अनेक उपमंदिरे आहेत. प्रांगणात एका दगडी मेघडंबरीखाली एकाच अखंड पाषाणात कोरलेली अकरा पूर्ण आणि एक अर्धी अशा साडेअकरा शिवपिंडींची वैशिष्ट्यपूर्ण रचना हे येथील प्रमुख आकर्षण मानले जाते. प्रांगणातील उंच चौथऱ्यावर अर्धखुल्या रचनेचे दुसरे एक महादेव मंदिर आहे. तिथे नंदी, शिवपिंड आणि मागील देवकोष्टकात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिरालगत कृष्णेश्वर मंदिर आहे. संकुलात जमिनीखाली पायऱ्या उतरून जावे लागणारे एक गुहारूपी नृसिंह मंदिर आहे. या मंदिरातील गर्भगृहात हिरण्यकशिपूचा वध करणाऱ्या भगवान नृसिंहाची पाषाणमूर्ती आहे. या गुहेजवळच साधकांसाठी एक पुरातन ध्यानगुहा आणि काही लहान शिवमंदिरे आहेत. प्रांगणात असलेल्या स्वतंत्र कालभैरव मंदिरात कालभैरवाची काळ्या पाषाणातील प्राचीन चतुर्भुज मूर्ती आहे. याशिवाय अर्धखुल्या मंडपात चार ते पाच मोठ्या शिवपिंडी, एका उंच चौथऱ्यावरील देवळीत कमानीवर वानरशिल्प असलेली हनुमानाची मूर्ती आणि तटबंदीच्या बाहेर गर्भगृहात पाषाणपादुका असलेले सतीमाता मंदिर आहे.
शुक्लेश्वर महादेव मंदिरात नित्य धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडतात. दररोज सकाळी ५:३० वाजल्यापासून दुपारी १२:३० पर्यंत व दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ८:३० वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. महाशिवरात्र हा शुक्लेश्वर देवस्थानचा सर्वांत मोठा वार्षिक उत्सव मानला जातो. माघ वद्य त्रयोदशी आणि चतुर्दशीला येथे मोठी यात्रा भरते. या वेळी अमरावती जिल्ह्यासह विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेच्या काळात पयोष्णी नदीत स्नान करून दर्शन घेण्याची परंपरा आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे लघुरुद्र, अभिषेक आणि धार्मिक कीर्तनांचे आयोजन केले जाते. या उत्सवांदरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप होते.
उपयुक्त माहिती
- भातकुली येथून १५ किमी अंतरावर
- अमरावती शहरापासून २८ किमी अंतरावर
- अमरावती व भातकुली येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९८५०५२४२६५
