पुराणकथेनुसार राजा भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी अथक प्रयत्नांअंती स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणण्यात यश मिळवले. परंतु, गंगेचा आवेग पृथ्वी सहन करू शकत नव्हती म्हणून महादेवाने तिला आपल्या जटांमध्ये धारण केले आणि तिथून ती पृथ्वीवर अवतरली. त्यामुळे जिथे जिथे गंगा (किंवा नदी, पाण्याचा स्रोत) आहे, तिथे तिथे महादेवाची प्राचीन मंदिरे पहावयास मिळतात. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध महादेव मंदिर गोदावरी नदीच्या काठावर बीड जिल्ह्यातील लिमगाव येथे आहे. हे जागृत देवस्थान असल्याने शुक्लेश्वर महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले ‘लिमगाव’ हे एक प्राचीन आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. या गावाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या येथील शुक्लेश्वर मंदिराबाबत आख्यायिका अशी की एकदा एका राजाच्या हातून महापाप घडल्याने त्याने प्रायश्चित्त घेण्याचे निश्चित केले. तेव्हा गुरू शुक्लाचार्यांनी राजाला काळे वस्त्र देऊन महादेवाच्या नामाचा जप करीत नदीच्या उगमाकडे जाण्यास सांगितले. जाताना ठरावीक अंतरावर हे वस्त्र पाण्यात बुडवून काढायचे आणि जेव्हा काळे वस्त्र पांढरे होईल तेव्हाच राजाचे प्रायश्चित्त पूर्ण होईल, असे गुरूंनी सांगितले. राजा मजल दरमजल करीत या ठिकाणी आला व काळे वस्त्र येथील गोदावरी नदीच्या पात्रात बुडवताच ते पांढरे झाले. त्यानंतर राजाने या ठिकाणी मंदिर बांधले. तेच हे मंदिर शुक्लेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध झाले.
मंदिर गावापासून काही अंतरावर वसले आहे. मंदिरास भक्कम तटबंदी आहे, ज्यामध्ये साधेसे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. दर्शनमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. दर्शनमंडपासमोर वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. दर्शनमंडपाच्या डाव्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. अर्धखुल्या स्वरूपाचा हा मंडप १९९४ मध्ये बांधण्यात आला. दर्शनमंडपात सहा-सहा चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. तुळईवर पानाफुलांच्या नक्षी व वितानावर चक्राकार नक्षी आहे. दर्शनमंडपात मध्यभागी समाधीचा चौथरा आहे.
पुढे उंच अधिष्ठानावर हेमाडपंती शैलीतील दगडी बांधकाम व त्यावर विटांचे बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे. दर्शनमंडपापेक्षा अर्धमंडप उंचावर असल्यामुळे सुमारे दहा पायऱ्या चढून मंदिरासमोरील उंच चौथऱ्यावर व येथून दर्शनमंडपाच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्या आहेत. चौथऱ्यापेक्षा अर्धमंडप काही इंच उंच आहे. अर्धमंडपात पाषाणी स्तंभपादावर चौकोनी लाकडी स्तंभ आहेत.
अर्धमंडपापेक्षा सभामंडपाचे प्रवेशद्वार काहीसे उंचावर आहे. प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वारातील स्तंभशाखा सुस्पष्ट आहे. प्रवेशद्वारात खालील बाजूस द्वारपाल व द्वारपालिका यांची शिल्पे आहेत, तर ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. मंडारकास चंद्रशिला आणि कीर्तीमुख आहे.
सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला दरवाजे आहेत. सभामंडपात एकूण बारा नक्षीदार स्तंभ आहेत. त्यांपैकी आठ स्तंभांवर घुमटाकार वितान आहे. वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. चार स्तंभ सभामंडपाच्या चार कोपऱ्यात आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडातील चौकोनी पटावर संयुक्त नक्षी आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारातील दोन स्तंभावरील हस्तांवर भारवाहक चतुर्भुज यक्ष शिल्पे आहेत. या यक्षांनी दोन हातांनी छताचा भार तोलून धरला आहे, असे भासते तर उर्वरित दोन हात गुडघ्यावर ठेवले आहेत. सभामंडपातील जमिनीस फरशी आच्छादन केले असले, तरी मध्यभागी असलेला चौकोनी उंच भाग रंगशिळा असल्याचे स्पष्ट जाणवते. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला व अंतराळात दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत. त्यात गणपती,
हनुमान आदी देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपापुढे अरुंद अंतराळ आहे. अंतराळाच्या अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे.
गर्भगृह अंतराळापेक्षा सुमारे एक फूट उंचावर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा अशा तीन द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या खालील बाजूस द्वारपाल, द्वारपालिका व गंगा-यमुना यांची शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे, तर उत्तरांगावर शिखरशिल्पांचे तोरण आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात महादेवाचा उत्सवकाळात वापरला जाणारा पितळी मुखवटा आहे.
गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाचे प्राचीन बांधकाम पंचरथ प्रकारचे आहे. छतावरील शिखर नंतर बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. गर्भगृहाच्या मागील बाजूला निर्माल्य तीर्थ प्रणाल आहे. त्याच्या बाजूला प्राचीन शिवपिंडी व गणेश मूर्ती आहेत. मंदिराच्या छतावर चारही बाजूंनी सुरक्षा कठडा आहे.
गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे अष्टकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील तीन थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत. शिखराच्या चौथ्या थरात स्तूपिका व कळस आहेत.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लघुरुद्र अभिषेकाने दिवसाची सुरुवात होते. दिवसभरात मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. चैत्र पौर्णिमेस देवाचा पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत साजरा केला जातो. देवाचा मुखवटा पालखीत ठेवून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मंदिर परिसरात मोठी जत्रा असते. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची गर्दी असते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आदी दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.