रामटेक शहरापासून काही अंतरावर असलेले रामटेक गड नागपूर जिल्ह्यातील प्राचीन व मोठ्या तीर्थस्थानांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. पद्मपुराणातील उल्लेखानुसार, श्रीरामांनी पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत आपल्या वनवासकाळातील ४ महिने या गडावर वास्तव्य केले होते. महाकवी कालिदासांनी आपल्या ‘मेघदूत’ या अभिजात काव्यातही रामटेकचे वर्णन केलेले आहे. भाविक व पर्यटकांच्या येथील वाढत्या संख्येमुळे या स्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात आला आहे.
रामटेक या तालुक्याच्या शहरापासून साधारणतः ३ किमी अंतरावर श्रीरामांचे हे प्रसिद्ध मंदिर आहे. एका लहानशा टेकडीवर असल्याने त्याला ‘गडमंदिर’ असेही म्हटले जाते. नागपूरच्या भोसले घराण्यातील पहिले राजे रघुजी भोसले यांनी हे किल्लेवजा मंदिर बांधले, अशी नोंद आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता असला तरी रामटेक गावातून येथे येण्यासाठी जुना पायरी मार्गही अस्तित्वात आहे. या गडावर श्रीरामांच्या मुख्य मंदिरासह लक्ष्मण मंदिर, लक्ष्मी नारायण, अगस्ती ऋषी, वराह मंदिर व चक्रधर स्वामी ही प्रमुख मंदिरे आहेत.
वाल्मिकी रामायण व पद्मपुराणातील उल्लेखानुसार, श्रीराम दंडकारण्यातून लक्ष्मण आणि सीतेसह पंचवटीकडे जाताना पावसाळ्यातील ४ महिन्यांच्या काळात त्यांनी येथील अगस्ती ऋषींच्या आश्रमात वास्तव्य केले होते. (आजही हा आश्रम येथे आहे) यावेळी श्रीरामांना आश्रम परिसरात मानवी हाडांचे ढीग दिसले. याबाबत अगस्तींनी सांगितले की या अस्थी ऋषी–मुनींच्या आहेत. लंकाधीश रावण व त्याचे मायावी राक्षस ऋषी–मुनींच्या यज्ञकार्यात अडथळा आणून त्यांची हत्या करतात. यावर श्रीराम संतापले व त्यांनी अगस्तींसमोर हा सर्व परिसर राक्षसांपासून मुक्त करेन, अशी प्रतिज्ञा घेतली. (अभ्यासकांच्या मते ‘टेक‘ या शब्दाचा अर्थ ‘प्रतिज्ञा’ असा होतो. येथे श्रीरामाने प्रतिज्ञा घेतली म्हणून ‘रामटेक‘ असे या स्थानाला नाव प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.) या काळात अगस्ती ऋषींसोबत राहून श्रीरामांनी विविध शस्त्रास्त्रांचे ज्ञान अवगत करून घेतले. राक्षसांच्या वधासाठी अगस्तींनी यावेळी श्रीरामांना दिव्य अस्त्रे दिली. त्या अस्त्रांचा वापर करूनच पुढे श्रीरामांनी रावणाचाही वध केला होता.
मंदिरात प्रवेश करण्याआधी लागणाऱ्या गडाच्या पहिल्या पश्चिमाभिमुख महाद्वाराजवळ वराह मंदिर आहे. विष्णूंच्या १० अवतारांपैकी वराह तिसरा अवतार मानला जातो. या मंदिरात वराहाची मूर्ती असल्याने येथील महाद्वाराला ‘वराह दरवाजा’ असे म्हटले जाते. वाकाटककालीन ही वराह मूर्ती आहे. ही मूर्ती चार खांबांच्या उंच चौथऱ्यावर असून तिची उंची ५ फूट व लांबी ६ फूट आहे. या मूर्तीच्या ४ पायांमध्ये अरुंद जागा आहे. त्या पोटाखालील अरुंद जागेतून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाता आल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
वराह मंदिराबाबत असे सांगितले जाते की पूर्वी संपूर्ण देश मुस्लिमांच्या अधिपत्याखाली होता. औरंगजेबाच्या कार्यकाळात हिंदू राजांची, तसेच तेथे असणाऱ्या देवस्थानांची अवस्था बिकट होती. अनेक मंदिरे पाडून त्या जागेवर मशिदी बांधण्यात येत होत्या. मुस्लिम धर्मियांमध्ये वराह (डुक्कर) अशुद्ध आणि अपवित्र मानले जाते. डुक्कर समोर दिसल्यास अपशकून समजला जात असे. याचाच फायदा घेऊन अनेक हिंदू राजांनी मंदिरांभोवती तटबंदी बांधली आणि प्रवेशद्वारावर वराह मूर्ती बसवल्या, ज्यामुळे मुस्लिम आक्रमक मंदिरांपर्यंत पोचू नयेत व हिंदू देवता आणि मंदिरे त्यांच्या दहशतीपासून सुरक्षित राहावीत. रामटेक गड मंदिराच्या तटबंदीच्या प्रवेशद्वारावर वराहाची स्थापना याच हेतूने झाली असावी आणि प्रवेशद्वाराला ‘वराह दरवाजा’ असे नावही दिले गेले असावे.
वराह मंदिराच्या पुढे महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. चक्रधर स्वामींनी १२६७ मध्ये महानुभव पंथ संप्रदायाची सुरुवात केली. अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी समाजात जागरूकता निर्माण केली. स्वामींनी जाती व्यवस्था आणि निरर्थक परंपरांना कडाडून विरोध केला होता. स्त्री–पुरुष समानतेचा उपदेशही त्यांनी केला. आपल्या भ्रमंतीदरम्यान त्यांचे रामटेक येथे या स्थानावर काही काळ वास्तव्य होते. येथून ते पुढे नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे गेले, असा उल्लेख ‘लीळा चरित्र’ या ग्रंथात आहे.
चक्रधर स्वामी मंदिराच्या पुढे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. असे संगितले जाते की या आश्रमामध्ये श्रीराम आणि अगस्तींची भेट झाली होती. प्राचीन काळापासून येथील धुनी आज शेकडो वर्षांनंतरही अखंड प्रज्वलित असते. या मंदिरात अगस्ती ऋषींची मूर्ती आहे.
रामटेक गडाचे व तेथे असणाऱ्या मंदिरांचे बांधकाम हे केवळ दगड व चुना यांच्या साह्याने करण्यात आलेले आहे. अनेक शतके उलटूनही येथील बांधकाम सुरक्षित आहे. मंदिर संकुलात प्रथम दशरथ मंदिर आहे. मंदिराच्या मागे मोठा तलाव असून त्यावर घुमटी आहे. तलावात जाण्यासाठी दोन बाजूने पायऱ्या आहेत. असे सांगितले जाते की या तलावातील पाण्याची पातळी वर्षभर सारखीच राहते, ती कधीही कमी–जास्त होत नाही. घुमटीच्या खाली भिंतीवर गंडभेरुंड (मनुष्याचे किंवा पक्ष्याचे धड, पण दोन तोंडे आणि दोन पंख असणारा काल्पनिक पक्षी) कोरलेला आहे. या तलावाजवळून रामटेक गावातून गडावर येण्यासाठी पायरी मार्ग आहे.
दशरथ मंदिराच्या पुढे लक्ष्मण मंदिर आहे आणि त्याच्या मागे भव्य असे श्रीरामांचे मंदिर आहे. या मंदिरांमध्ये श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. प्राचीन नोंदींनुसार, या मूर्तींच्या स्थापनेपूर्वी येथे केवळ श्रीरामांच्या पादुकांची पूजा होत असे. रघुजी भोसले यांनी देवगडच्या स्वारीत यश मिळाल्यास येथे मूर्ती बसविण्याचा संकल्प केला होता आणि त्यासाठी जयपूर येथून मूर्तीही मागविल्या होत्या; परंतु श्रीरामांनी त्यांना सूर नदीतील प्राचीन मूर्तींची येथे प्रतिष्ठापना करा, असा स्वप्नदृष्टांत दिल्याने जयपूरहून आणलेल्या मूर्तींची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली नाही, त्या आजही तेथे पाहायला मिळतात. या मंदिरांमध्ये सध्या असलेल्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या असून २.५ ते ३ फूट उंचीच्या आहेत. या मंदिरांवरील कोरीवकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. या दोन्ही मंदिरांमध्ये नागपूरच्या भोसले घराण्यातील योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे पाहायला मिळतात. श्रीराम मंदिराच्या मागे लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे.
या मंदिरांमध्ये दरवर्षी २ मोठे उत्सव होतात. त्यातील पहिला उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत चालतो. प्रातःकाळी श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक, त्यानंतर महापूजा करून उत्सवाला सुरुवात होते. रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता रामजन्म साजरा करण्यात येतो. या कालावधीत आलेल्या भाविकांना दररोज महाप्रसाद देण्यात येतो. येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला (कार्तिक पौर्णिमा) साजरा केला जातो. स्थानिक भाषेत याला ‘टिपूर पौर्णिमा’ असे म्हटले जाते. या काळात मंदिरासह शहरातील प्रत्येक घरासमोर रांगोळी व सजावट केली जाते. आश्विन पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या काळात हा उत्सव साजरा होतो. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा निघते. त्यामध्ये श्रीरामांच्या जीवनावर आधारित पन्नासपेक्षा जास्त चित्ररथ सहभागी होतात. रात्री १२ वाजता एक–दोन वर्षांपूर्वीचे देवाचे जुने वस्त्र आणि पितांबर ‘त्रिपूर‘ म्हणून मंदिराच्या कळसावर जाळले जातात.
या उत्सवकाळात विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातून असंख्य भाविक येथे येतात. रामटेकचे हे गडमंदिर नागपूरच्या भोसले घराण्याने बांधले असल्यामुळे मंदिरातील पूजा–अर्चा, यात्रेचे व उत्सवाचे नियोजन आजही त्यांच्या वंशजांकडून करण्यात येते.
मंदिरांशिवाय रामटेक हे मँगनिजच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. येथे मँगनिजचे मोठे साठे उपलब्ध आहेत. देशातील एकूण मॅंगनिजच्या साठ्यांपैकी ४० टक्के साठे महाराष्ट्रात असून त्यात रामटेकमधील वाटा अधिक आहे. याशिवाय रामटेकमधील विड्याची पाने प्रसिद्ध असून मुंबई व पुणे येथे त्याचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्रातील पहिल्या संस्कृत विद्यापीठाचा मानही रामटेकलाच जातो. महाराष्ट्र शासनातर्फे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथे सुरू करण्यात आले आहे.