श्रीमद् अनंत मंदिर

सावईवेरे, ता. फोडा, जि. दक्षिण गोवा

‘विशाल विश्वाच्या कल्याणासाठी तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य व्यापणारा’ असे ऋग्वेदात (१.१५५) ज्याचे वर्णन आहे तो भगवान विष्णू हा हिंदू धर्मशास्त्रांत कधी सूर्याचे, कधी आकाशाचे रूप मानलेले आहे. या विष्णूपासूनच नार म्हणजे जलाची निर्मिती झाली. या संदर्भातच विष्णूस नारायण म्हणजे जलात निवास (अयन) करणारा असे म्हटले जाते. विष्णूचे एक रूप शेषशायी नारायणाचे आहे. या स्वरूपातील विष्णूची प्राचीन मूर्ती असलेले मंदिर सावई-वेरेमध्ये स्थित आहे. या श्रीमद् अनंत मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अधिष्ठान एका तलावावर आहे.

गोमंतकाची भूमी वसवणारा भगवान परशुराम हा विष्णुचा अवतार होय. या भूमीत वैष्णव संप्रदायाचा मोठा प्रभाव असल्याचे पाहावयास मिळते. विष्णूची काही प्राचीन देवालये गोव्यामध्ये आहेत. अनंत देवस्थान हे यातीलच एक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अनंत हे मूलतः शेषाचे नाव आहे. पौराणिक वाङ्मयात शेषनाग अनंतरूपी काल स्वरूपात क्षीरसागरात वेटोळे घालून बसलेला असतो, असे म्हटले आहे. या अनंत शेषनागावर विष्णु पहुडलेले असतात. त्यांच्या नाभीतून एक कमलपुष्प निघालेले असते व त्याच कमलपुष्पातून ब्रह्मदेवाचा उदय होतो, अशी कल्पना ‘विष्णुपुराणा’त मांडलेली आहे. विष्णुच्या या शेषशायी रूपास अनंतशायी विष्णू असेही म्हटले जाते. केरळमधील थिरुवनंतपूरम् येथे शेषशायी विष्णूचे पद्मनाभ मंदिर सुप्रसिद्ध आहे. तेथे विष्णू अनंत शेषावर पहुडलेले आहेत.

सावईवेरे येथील हे मंदिर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. एका मुस्लिम व्यक्तीच्या होडीतून येथील अनंतशायी विष्णूची मूर्ती सापडल्याचे सांगण्यात येते. त्याविषयीची आख्यायिका अशी की सुमारे ४०० वर्षांपूर्वी सावई-वेरे येथील एका व्यक्तीस गावातील नदीकाठी अनंताची पाषाणमूर्ती असल्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार त्याने मूर्तीचा शोध सुरू केला. नदीकाठी कोठेही त्याला मूर्ती आढळली नाही. त्याच वेळी त्याला नदीच्या पलीकडे एक होडी असल्याचे दिसले. तेथे मूर्तीबाबत विचारणा करण्यासाठी ती व्यक्ती नदी ओलांडून गेली. ती होडी ज्या व्यक्तीची होती तिला त्याने विचारले. त्यावर ती व्यक्ती म्हणाली की ‘मी मुस्लिम व्यापारी आहे. आमच्या धर्मात मूर्तीपूजा केली जात नाही. त्यामुळे मला मूर्तीबाबत काहीच माहिती नाही.’ तरीही ती व्यक्ती व तिच्यासमवेत आलेले काही गावकरी मूर्तीचा आजुबाजूस शोध घेत राहिले. अचानक त्यातील एका गावकऱ्यास होडीत असलेला एक पाषाण दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, ती अनंतशायी विष्णूची अत्यंत कलात्मकरीत्या घडवलेली मूर्ती होती. त्या मुस्लिम व्यक्तीने होडीचा तोल सावरण्यासाठी म्हणून तो पाषाण तेथे ठेवला होता.

यानंतर गावकऱ्यांनी मिळून ती मूर्ती गावात आणली. एका कुळागारात खड्डा खणून त्यात पाणी भरून त्यात ती मूर्ती ठेवली. काही काळातच तेथे या मूर्तीसाठी मंदिर उभारण्यात आले. अनंतशायी विष्णूचे स्थान क्षीरसागरात असल्याने या मंदिराचे अधिष्ठानही एका जलाशयावर ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या प्रांगणात काही पायऱ्या उतरून प्रवेश होतो. प्रांगणाच्या आजुबाजूला नारळी-पोफळीची झाडे आहेत. आत सर्वत्र हिरवळ, फुलझाडे लावलेली आहे. या भव्य मंदिराची रचना गोमंतकीय स्थापत्यशैलीची आहे. प्रवेशमंडप, सभामंडप, अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. प्रवेशमंडपाच्या वर चारही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. सभामंडपावर, तसेच महामंडपावरही दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. अर्धमंडपावर उभट घुमट व त्यावर कलश असलेले शिखर, तर गर्भगृहावर खाली चौकोनाकार, त्यावर षटकोनाकार मनोरा, त्यावर घुमटाकार आणि शीर्षस्थानी आमलक व कलश अशी शिखररचना आहे. गर्भगृहाच्या शिखरावरील अष्टकोनाकार भाग, तसेच त्यावरील घुमटाकार कोरीव नक्षीकामाने सुशोभित केलेला आहे. मंदिरासमोरील सात स्तरीय दीपस्तंभावरही उठावाचे नक्षीकाम केलेले आहे. मंदिर चोहोबाजूने पाण्यात असून एका बाजूला मोठे जलकुंड आहे. प्रवेशमंडपाच्या दोन्ही बाजूंना वैष्णव द्वारपालांच्या उंच मूर्ती आहेत. सभामंडप खुल्या प्रकारचा आहे. तेथील स्तंभांवर तसेच त्यावरील तुळया, कावी कलाप्रकारातील नक्षीने सजवलेल्या आहेत. या सभामंडपातून अर्धमंडपात प्रवेश करताना भाविकांना हे मंदिर जलाशयावर उभे असल्याची जाणीव होते. तेथील दर्शनीभिंतीलगत तळभागात फरशांऐवजी काचा बसवलेल्या आहेत. त्यातून खालील पाणी आणि त्यातील विहरणारे मासे दिसतात.

अर्धमंडपास कमानीच्या आकाराचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या वरच्या बाजूस भलेमोठे गरूडविमान आहे. त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या देवकोष्ठकात श्रीरामाची, तर उजवीकडे चतुर्भूज विष्णुची मूर्ती आहे. येथील महामंडप दुमजली स्वरूपाचा आहे. महामंडपाच्या बाह्यभिंतींत कमानदार खिडक्या आहेत. आत गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांवर लाकडात कोरलेले तरंगहस्त आहेत. त्याच्या वरच्या सज्जासारख्या भागास, लाकडी जाळी बसवलेली आहे. येथील छत लाकडाचे असून त्यास पितळी घंटा, हंड्या तसेच झुंबरे टांगलेली आहेत. छतालगतच्या भागात भगवान विष्णुच्या दशावतारांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. या महामंडपातील स्तंभ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गोमंतकातील काष्ठशिल्पकलेचा सुंदर नमुना म्हणून येथील स्तंभ पाहिला जातो. या स्तंभाच्या वरच्या दोन स्तरांत विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच्यावरील भागात अनेक नागप्रतिमा कोरलेल्या आहेत. दुसऱ्या कोरीव स्तंभावर चांदीच्या पत्र्याचे बारीक नक्षीकाम असलेले आवरण चढवण्यात आलेले आहे. या खांबावर देवाचा कौल घेतला जातो.

अंतराळाच्या रुंदसर द्वारचौकटीवरही कोरीव नक्षीकाम आहे. चौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे, तर उतरांग भागात शेषशायी विष्णू आणि त्याच्या बाजूस गरुड व हनुमंतांची शिल्पे कोरलेली आहेत. येथील भिंतीवर वैष्णव द्वारपाल तसेच बाजूच्या स्तंभांवर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. गर्भगृहात पितळी पत्र्याने मढवलेल्या अधिष्ठानावर अनंतशायी विष्णूची आडवी पाषाण मूर्ती विराजमान आहे. यात भगवान विष्णू पहुडलेल्या स्थितीत आहेत. एका पाय गुडघ्यात वाकवून दुसऱ्या पायावर टाकलेला आहे. एका हाताने मस्तकास आधार दिलेला आहे. खालच्या दुसऱ्या हाताने नाभीतील कमळाचा देठ पकडलेला आहे. वरचा एक हात देहावर ताणून ठेवलेला आहे, तर दुसऱ्या हातात शंख आहे. विष्णूच्या नाभीतून कमलपुष्प आले असून त्यावर चतुर्मुख ब्रह्मा आहे. विष्णूच्या पायांजवळ लक्ष्मीमाता आहे. मूर्तीवर सात फण्यांच्या अनंतशेषाने छत्र धरलेले आहे. याशिवाय या मूर्तीशिल्पामध्ये मधु आणि कैटभ हे दानव, तसेच देवसेवकांचीही शिल्पे दिसतात. मूळच्या सुंदर पाषाणमूर्तीवर वस्त्रे, मुकूट तसेच मुखवटा चढवण्यात आला आहे.

या मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, वामन जयंती, नरसिंह जयंती याच प्रमाणे अक्षय्य तृतीया, विजयादशमी, दीपावली, नवरात्र, श्रावणी सोमवार आदी सण आणि उत्सव धार्मिक पद्धतीने व उत्साहात साजरे केले जातात. अनंत चतुर्दशी (भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी) हा येथील एक महत्त्वाचा उत्सव असतो. या दिवशी विष्णूचे विशेष व्रत केले जाते. गोव्यात अनंत चतुर्दशीच्या व्रताची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा खास करून गोव्यातील माध्व वैष्णव संप्रदायातील सारस्वतांत त्याच प्रमाणे कऱ्हाडे ब्राह्मणांत पाहावयास मिळते. शेषशायी अनंताच्या पूजनामुळे या व्रताचा प्रसार गोव्यात झाल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात या दिवशी अभिषेक, महाप्रसाद तसेच कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मंदिरात पंचायतन अभिषेक, महानैवेद्य, लघुरूद्र, लघुविष्णु, विष्णूयाग आदी देवकृत्येही केली जातात.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून १० किमी आणि पणजी येथून २८ किमी अंतरावर
  • फोंडा येथून राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६३६८३९४९
Back To Home