श्रीधर महाराज सेवा मंदिर

घाटपुरी, खामगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या कुशीत वसलेले घाटपुरी हे क्षेत्र आज ‘विदर्भाची पंढरी’ आणि वारकरी संप्रदायाचे एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. या भूमीत भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम घडवून आणण्याचे श्रेय थोर संत श्री सद्गुरू श्रीधर महाराज यांना जाते. त्यांनी समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत अंगीकारून ‘माणुसकी हाच खरा धर्म’ ही वैश्विक शिकवण दिली आणि भागवत धर्माची पताका भारतभर फडकवली. आज घाटपुरी येथील श्रीधर महाराज सेवा मंदिर संस्थान हे अन्नदान, गो-सेवा, आरोग्य आणि संस्कारांचे एक चैतन्यमय केंद्र बनले आहे. येथील शिस्तबद्ध व्यवस्थापन, अखंड चालणारे अन्नछत्र आणि निस्वार्थ लोकसेवा यांमधून आजही महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती येते, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे.

श्री सद्गुरू श्रीधर महाराजांचा जन्म १८८५ साली खामगाव येथे झाला. त्यांनी भारतभर तीर्थयात्रा करून भागवत धर्माचा प्रचार केला आणि मठ व मंदिरांची स्थापना केली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीयतेच्या विळख्यात अडकला होता, तेव्हा श्रीधर महाराजांनी आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. त्यांनी भक्तीला केवळ कर्मकांडापुरते मर्यादित न ठेवता तिला लोकसेवेशी जोडले. महाराजांचे राहणीमान अत्यंत साधे, पण विचार मात्र उत्तुंग होते. त्यांनी विठ्ठल भक्तीचा प्रसार करताना नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले.

श्रीधर महाराजांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी घाटपुरीला प्राप्त करून दिलेले ‘विदर्भाची पंढरी’ हे स्वरूप. ज्या गोरगरीब वारकऱ्यांना पंढरपूरची वारी करणे शक्य नसे, त्यांच्यासाठी महाराजांनी घाटपुरी येथेच विठ्ठल भक्तीचे केंद्र उभे केले. त्यांनी येथे वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकवली आणि विदर्भातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी हे हक्काचे विश्रांतीस्थान निर्माण केले. आजही आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे जमणारा अलोट जनसागर महाराजांच्या या कार्याची साक्ष देतो.

श्रीधर महाराजांच्या कार्यात जातीभेदाला तीळमात्रही थारा नव्हता. त्यांच्या हृदयात सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी प्रेमाचे स्थान होते. ‘माणुसकी हाच खरा धर्म’ ही अमूल्य शिकवण त्यांनी केवळ आपल्या प्रवचनांमधूनच मांडली नाही, तर ती स्वतःच्या आचरणातूनही सिद्ध केली. संकटात सापडलेल्या दीनदुबळ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक उभारी देण्याचे महान कार्य त्यांनी आयुष्यभर केले. २५ जून १९७५ रोजी महाराज ब्रह्मलीन झाले; मात्र त्यांनी दिलेली हीच विचारांची शिदोरी आजही खामगाव परिसरातील हजारो कुटुंबांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. भाविक आजही मोठ्या निष्ठेने महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात.

कोणत्याही संताचे कार्य हे त्यांच्या पश्चातही जोमाने पुढे नेण्याचे काम त्यांचे शिष्य करत असतात. श्रीधर महाराजांना रामभाऊ महाराज चोपडे यांच्यासारखे निष्ठावान शिष्य लाभले. रामभाऊ महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीधर महाराजांच्या चरणी अर्पण केले होते. महाराजांच्या निधनानंतर घाटपुरी संस्थानाचा कायापालट करण्यात, तेथे शिस्त लावण्यात आणि अन्नदानाची अखंड परंपरा सुरू ठेवण्यात रामभाऊ महाराजांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या गुरूंनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष केला. आजही घाटपुरी संस्थानात जी स्वच्छता, व्यवस्थापन आणि शांतता अनुभवता येते, त्याचे श्रेय रामभाऊ महाराजांच्या कठोर परिश्रमाला आणि गुरुभक्तीला जाते. घाटपुरी येथील मुख्य चौकात श्रीधर महाराज सेवा मंदिर व वारकरी भवन स्थित आहे. मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी येथील मूळ मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी अंतराळ व गर्भगृह आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या देवकोष्ठकांमध्ये गणपती व तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. येथून अंतराळात प्रवेश होतो. पुढे गर्भगृहात एका उंच वज्रपीठावर काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. या गर्भगृहाच्या मागील बाजूने सभामंडपातून तळमजल्यावर असलेल्या श्रीधर महाराज यांच्या समाधीस्थानाकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या समाधी स्थानावर एका उंच वज्रपीठावर श्रीधर महाराजांची मूर्ती आहे.

या मुख्य मंदिराच्या मागील बाजूस रामभाऊ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचनाही मूळ मंदिराप्रमाणेच आहे. येथील गर्भगृहात वज्रपीठावर संत ज्ञानेश्वरांची संगमरवरी मूर्ती आहे व या गर्भगृहाखाली असलेल्या तळघरात रामभाऊ महाराज यांचे समाधी स्थान आहे. येथील वज्रपीठावर त्यांची मूर्ती व त्यासमोरील चौथऱ्यावर पादुका आहेत.

या मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामध्ये चैत्र वद्य तृतीया ते दशमी या काळात रामभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाथा पारायण आणि कीर्तन सप्ताह आयोजित केला जातो. ज्येष्ठ वद्य षष्ठी ते द्वादशी या दरम्यान श्री सद्गुरू श्रीधर महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा होतो. यामध्ये श्रीमद् भागवत सप्ताह आणि भव्य मिरवणूक (शोभायात्रा) काढली जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा या काळात पंढरपूर वारी, कार्तिक शुद्ध तृतीया ते त्रयोदशीला आळंदी वारी, पौष शुद्ध चतुर्थी ते वद्य त्रयोदशी या काळात त्र्यंबकेश्वर वारी आणि फाल्गुन शुद्ध नवमीपासून येथून संत एकनाथ महाराज दर्शनासाठी पैठणसाठी पायी दिंडी निघते. याशिवाय नवरात्रीत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत नऊ दिवस अखंड महाप्रसाद वितरण केले जाते. पौष महिन्यातील पहिल्या रविवारी क्षेत्र महासिद्ध महाराज धानोरा येथे दिंडी व भंडारा, तर मार्गशीर्ष वद्य दशमी ते माघ प्रतिपदेपर्यंत मुक्ताई यात्रा उत्सव साजरा होतो. प्रत्येक दशमीला नगर प्रदक्षिणा आणि दिंडी काढण्यात येते. एकादशीला मंदिरात भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतात आणि दर पंचमीला संस्थानामध्ये अन्नदानाचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५० किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून खामगावसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

श्रीधर महाराज सेवा मंदिर

घाटपुरी, खामगांव, ताल. खामगांव, जिला. बुलढाणा

Back To Home