श्रीराम मंदिर / रामतीर्थ

आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीनजीक उगम पावलेल्या हिरण्यकेशीचा वाहता प्रवाह, त्या जलशक्तीने फोडलेले प्रस्तर आणि त्यातून निर्माण झालेला धबधबा, त्या भोवती घनगर्द वनराई, अशा निसर्गरम्य वातावरणात आजऱ्यातील राम मंदिर/ रामतीर्थ स्थित आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार हा परिसर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळेच या मंदिरास रामतीर्थ असे संबोधले जाते. येथील मंदिर सुमारे ४०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या नजीकच दत्तात्रेयाचे मंदिर आहे. या रामतीर्थावर अनेक साधुसंतांनी तपसाधना केल्याचे सांगण्यात येते.

या मंदिराची आख्यायिका अशी की प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात असताना काही काळ आता जेथे मंदिर आहे त्या परिसरात वास्तव्यास होते. त्या वेळी हिरण्यकेशी नदीला महापूर आला होता. परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे अनेक जिवांची हानी होऊ लागली होती. तेव्हा या जंगलातील समस्त प्राण्यांनी श्रीरामांना हा महापूर थोपविण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामांनी नदीतिरावर एक भलामोठा धोंडा टाकून हिरण्यकेशी नदीस मर्यादा घातली. असे सांगितले जाते की आजही मोठा पूर आला तरी हिरण्यकेशी रामतीर्थ मंदिराच्या पायरीची मर्यादा ओलांडत नाही. कालांतराने नाशिकमधील एका भक्तास श्रीरामांनी स्वप्नदृष्टांत दिला आणि त्यातील आज्ञेनुसार त्याने येथे हे मंदिर बांधले.

आजऱ्यातील वनपरिसरात, हिरण्यकेशी नदीच्या पात्रालगत उभ्या असलेल्या या मंदिराच्या परिसरास लोखंडी प्रवेशद्वार आहे. तेथून काही अंतरावर मंदिर आहे. मंदिरासमोर प्रांगणात पत्र्याचा मंडप टाकलेला आहे. येथे तुलसीवृंदावन आहे. वर्तुळाकार पायावर उभ्या असलेल्या या अष्टकोनी वृंदावनावर विविध देवतांची चित्रे आहेत. तुलसीवृंदावनाच्या शेजारी यज्ञकुंड आहे. मंदिराची वास्तू दुमजली घडीव पाषाणात बांधलेली आहे. मंदिराच्या सभामंडपास लाकडी प्रवेशद्वार आहे. त्याच्या द्वारशाखांवर कोरीव नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लहान दीपकोष्ठके आहेत.

सभागृहात प्रत्येकी तीन लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभ चौकोनी दगडी पायावर आहेत. खाली असलेल्या दगडी पायामुळे स्तंभाचे वाळवी पाण्यापासून रक्षण होते. स्तंभांवर तुळई त्यावर लाकडी तख्तपोशी आहे. सभामंडपात बाहेर पडण्यासाठी उजव्या डाव्या बाजूस दरवाजे आहेत. बंदिस्त प्रकारच्या या सभांडपात उजेड हवा येण्यासाठी अनेक खिडक्या आहेत. सभामंडपात डावीकडे एका भिंतीलगत एका हाताने उंचावलेली गदा आणि दुसऱ्या हाताने पायतळीच्या दैत्याचे धरलेले केस अशा स्वरूपातील हनुमानाची मोठी पाषाणमूर्ती आहे. येथे संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री सिद्धारूढ महाराज, महंत जयरामदास महाराज, कृपालू महाराज, दत्तभक्त सद्‌गुरू हरिकाका आदी संत महात्म्यांच्या तसबिरी लावलेल्या आहेत

पुढे काहीसे उंचावर चार नक्षीदार लाकडी गोलाकार स्तंभ असलेले मंदिराचे गर्भगृह आहे. गर्भगृहाचे स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. स्तंभांच्या वरच्या भागात नक्षीदार देवकोष्टकांत मध्यभागी श्रीरामसीतालक्ष्मण हनुमान यांची प्रतिमा आहे. त्याच्या एका बाजूस गदाधारी हनुमान दुसऱ्या बाजूस पंचमुखी हनुमानाची चित्रे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर संगमरवरी चौथऱ्यावरील चांदीच्या चौरंगावर श्रीरामपरिवाराची पूजेसाठीची तसबीर आहे

गर्भगृहात मोठे दगडी वज्रपीठ आहे. त्याच्या बाजूला असलेल्या स्तंभांवर द्वारपालांच्या मूर्ती आहेत. वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता हनुमानाच्या संगमरवरी घडीव मूर्ती आहेत. एरवी हनुमानाची मूर्ती श्रीरामासमोर नमस्कार मुद्रेत असते. या मंदिरात मात्र हनुमानास श्रीरामलक्ष्मणसीता यांच्या रांगेतच स्थान आहे. या मूर्तींच्या मागे असलेल्या चंद्राकार प्रभावळीवर मध्यभागी सूर्य दोन्ही बाजूला पर्णलता नक्षी आहे. प्रभावळीच्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे. वज्रपीठावर मुख्य मूर्तींच्या समोर हनुमान आणि श्रीरामाचे पितळी मुखवटे तसेच विविध देवदेवतांच्या लहान पितळी मूर्ती आहेत. वज्रपीठाच्या खालच्या बाजूलाही हनुमानाची मोठी पाषाणमूर्ती आहे. येथे काही शेंदूरचर्चित गोल पाषाण आहेत. गर्भगृहातील एका कोपऱ्यात महालक्ष्मीची मूर्ती आहे

मुख्य मंदिराच्या शेजारी मारुती मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल स्वरूपात वानर मूर्ती आहेत. द्वारशाखा नक्षीकामाने सुशोभित आहेत. मंदिरात राक्षसावर गदाप्रहार करणाऱ्या युद्धरत हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराचे शिखर कलात्मक नक्षीकामाने सुशोभित आहे. मंदिराबाहेर श्रीरामांचे चरण चिन्ह असलेले अनेक पाषाण आहेत. बाजूला खडकावर ध्यानस्थ शंकराची सुमारे सहा फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला त्रिशूल डमरू आहे. या मूर्तीच्या मागे कैलास पर्वत साकारलेला आहे. येथून काही अंतरावर दत्तात्रेयाचे हेमाडपंती शैलीतील प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात विविध देवतांचे पाषाण आहेत. मंदिरात मध्यभागी अष्टकोनी पाषाणात कोरलेली कासवमूर्ती समोरील देवकोष्टकात शिवपिंडी आहे. भिंतीवर दत्तात्रेयांची मोठी प्रतिमा आहे.

मंदिरासमोर असलेले रामतीर्थ कुंड रामतीर्थ धबधबा हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे पर्यटकांची तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कायम वर्दळ असते. येथील वनराई खळखळत्या पाण्यामुळे मंदिरांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहत असते. नदीपात्रात असलेल्या रामतीर्थ कुंडाचे दर्शन घेण्यासाठी या नदीवर मंदिरापासून कुंडापर्यंत पूल बांधलेला आहे. या पुलामुळे भाविक पर्यटकांना नदीपात्रातील रामतीर्थ कुंडापर्यंत पोचणे पूजाविधी करणे शक्य होते.

मंदिरात रामनवमी, दसरा, दिवाळी, हनुमान जयंती, दत्त जयंती आदी वार्षिक उत्सव साजरे जातात. हे जागृत स्थळ असून देव नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हजारो भाविक वार्षिक उत्सवावेळी देवाच्या दर्शनाला येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा हेमृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे जन्मगाव आहे. महाभारतातीलकर्णया व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी प्रचंड गाजली. सप्टेंबर १९९५ रोजी या पुस्तकालाभारतीय ज्ञानपीठसंस्थेतर्फे मूर्तिदेवी हा पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले मराठी लेखक ठरले होते.

उपयुक्त माहिती

  • आजरा बस स्थानकापासून किमी, तर कोल्हापूर येथून ८५ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : विलास बाबा नलवडे, सेवेकरी, मो. ८२७५३५७११७
Back To Home