राजे नेमिवंतांचे श्रीराम मंदिर

मलकापूर, ता. मलकापूर, जि. बुलडाणा

विदर्भाचे प्रवेशद्वार अशी ख्याती असलेल्या मलकापूरमध्ये राजे नेमिवंतांचे श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. राजे नेमिवंत यांच्या हवेलीनजीकच असलेल्या या प्राचीन मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींबरोबरच श्रीराम यंत्र, श्रीयंत्र तसेच आद्य शंकराचार्यांच्या पादुकांचेही दर्शन घडते. येथील रामपंचायतनाच्या मूर्ती चित्रकूट येथील मंदिरातील मूर्तींच्या प्रतिकृती आहेत. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटावर मराठी व संस्कृत भाषेतील एक शिलालेखही आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात आजही पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते. रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या उत्सवांदरम्यान शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

हे मंदिर बांधणारे राजे नेमिवंत हे निजामाच्या काळात मलकापूर गावाचे जहागीरदार होते. मलकापूरमध्ये त्यांच्या दोन हवेल्या होत्या. त्यापैकी एक राहण्यासाठी वापरली जात असे, तर दुसऱ्या हवेलीचा वापर न्यायदानासाठी करण्यात येत असे. राजे नेमिवंतांच्या घराण्याचे मूळ पुरुष हरबाजी गोविंद गोवर्धन हे मूळचे मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील रहिवासी होते. आरंभी भिक्षुकी करणाऱ्या हरबाजी यांनी आपल्या कर्तृत्वाने पाटीलकी व कुलकर्णीपद संपादन करून लौकिक मिळवला. वृत्तीने धार्मिक असलेल्या हरबाजी यांनी इ.स. १८०० मध्ये मलकापूरमध्ये एक धर्मशाळा बांधून त्यात श्रीराम मंदिर उभारले. हरबाजी यांना निजामाकडून देवधाबे, माकोडी, सावरगाव, वर्धा व कपर्दिपूर या गावांची जहागिरी मिळाली होती. त्यापैकी कपर्दिपूर या गावाचे संपूर्ण उत्पन्न त्यांनी या मंदिरासाठी लावून दिले होते. ते १९४८ पर्यंत सुरू होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर व जहागिरी रद्दबादल करण्यात आल्यानंतरही सरकारकडून या मंदिराला दरवर्षी १,६४० रुपये वर्षासन दिले जाते. मंदिराची वहिवाट मात्र अद्यापही नेमिवंत यांच्या घराण्याकडेच आहे, असे ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – बुलडाणा डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ मध्ये नमूद आहे.

या मंदिरातील मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी एक शिलालेख आहे. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे. २८ सें.मी. उंची व २६ सें.मी. रुंदी असलेल्या या आठ ओळींच्या शिलालेखातील पहिल्या सात ओळी मराठीत आहेत आणि शेवटच्या ओळीत एक संस्कृत श्लोक आहे. ‘हरबाजी गोविंद गोवर्धन यांनी घाटच्या वराड प्रांतातील महाशुभस्थान मलकापूर येथे भट आळीत, लोकांनी दर्शन घेऊन मुख्य पावावे (पुण्य मिळवावे)’, या निमित्त राममंदिर व धर्मशाळा बांधल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. या शिलालेखात हरबाजी यांच्याबाबत त्रोटक माहिती देण्यात आली आहे.

हरबाजी गोविंद गोवर्धन यांची वृत्ती ज्योतिषाची म्हणजे जोशीपणाची होती. धरणगाव, कुंड, लेहे, हिंगणे व तांदूळवाडी या पाच गावांचे जोशीपण त्यांच्याकडे परंपरागत होते. याशिवाय पान्हेर, त्यामध्ये अंतर्भूत असलेले बहापूर तसेच अन्वराबाद अशा एकूण तीन गावांचे पांडेपण त्यांनी स्वतः संपादन केले होते. त्याचप्रमाणे त्याच प्रांतातील चांदूर परगण्यातील मेमिनाबादचे पांडेपणही त्यांनी मिळवले होते. त्यांनीच मलकापूर येथे जागा विकत घेऊन तेथे शके १७२२, रौद्रनाम संवत्सर, माघ शुद्ध दशमीच्या दिवशी (शनिवार) श्रीराम मंदिर व धर्मशाळा बांधून पूर्ण केली, असे या शिलालेखात नमूद आहे. या शिलालेखात ‘कृतम्’ एवं ‘पंच’ यांसारखे संस्कृत शब्द मधूनमधून आलेले आहेत. या शिलालेखातील मराठी भाषेवर फारसी भाषेची छाप आहे. परगणे मजकूर, मजरे, खरीदि, मौजे, सकरि, मुकदमी, सुभे आदी शब्दांच्या उपयोगावरून हे दिसून येते, असेही सरकारी गॅझेटियरमध्ये नमूद आहे.

शहरातील दुर्गानगर परिसरात दाट लोकवस्तीच्या भागात हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत लहानशा प्रांगणात प्रवेश होतो. समोरच महिरपी कमान असलेले मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर रुंद दगडी ओवऱ्या दिसतात. येथेच चार खांब असलेल्या एका दगडी घुमटीमध्ये दास मारुतीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या १.२३ मीटर उंचीच्या मूर्तीवर शेंदूरलेपन करण्यात आलेले आहे. दाक्षिणात्य शैलीतील, वज्रदंत असलेल्या या मूर्तीच्या कपाळावर टिळा आणि माथ्यावर सोनेरी मुकुट आहे. दोन्ही हात जोडलेली ही मूर्ती भाविकांचे जणू स्वागत करीत आहे, असे भासते.

श्रीराम यांच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर पादुका आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी शिलालेख आहे. गर्भगृहात मोठ्या दगडी पीठासनावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. पांढरेशुभ्र धोतर, सदरा व गळ्यात लाल उपरणे अशी मराठमोळी वेषभूषा असलेल्या श्रीराम व लक्ष्मण यांच्या मूर्तींच्या खांद्यावर धनुष्यबाण आहे. त्यांनी सोनेरी मुकुट परिधान केलेला आहे. सीतामातेला नऊवारी साडी नेसवण्यात आली आहे. तिच्या नाकात नथ तर गळ्यात मंगळसूत्र आहे. श्रीराम यांच्या डाव्या चरणांजवळ हनुमान आहे. श्रीराम मूर्तीसमोर रामयंत्र स्थापन करण्यात आले आहे. गर्भगृहातील देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत.

मुख्य गर्भगृहाजवळच, दुसऱ्या गर्भगृहसदृश खोलीत राजराजेश्वरी श्रीललिता महात्रिपुरसुंदरी ललितांबिका भगवती लक्ष्मीची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर तंत्रशास्त्राच्या आधारे स्थापन करण्यात आलेले श्रीयंत्र आहे. जवळच असलेल्या एका खोलीत श्रृंगेरी पीठाच्या आद्य शंकराचार्यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. नेमिवंत घराण्यातील श्रीनिवासराव नेमिवंत हे सात्त्विक, गुणसंपन्न आणि मंत्रविद्यावेत्ते होते. श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी चंद्रशेखर सरस्वती यांचे ते गुरुबंधू होते. शंकराचार्य स्वामी चंद्रशेखर सरस्वती यांनी या मंदिरात येऊन येथील आद्य शंकराचार्यांच्या पादुकांवर अभिषेकही केला होता, असे सांगितले जाते. या खोलीत आद्य शंकराचार्यांच्या शिष्यांच्या तसेच श्रीनिवासराव नेमिवंत यांच्या प्रतिमा आहेत. श्रीनिवासराव नेमिवंत यांची मूर्तीही येथे आहे. येथील मुख्य गर्भगृहावर सुंदर शिखर आहे.

हे मंदिर सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत दर्शनासाठी खुले असते. मुख्य गर्भगृहात सोवळे नेसूनच प्रवेश करता येतो. येथे रामनवमी, हनुमान जयंती तसेच दीपावलीसारखे विविध सण-उत्सव साजरे केले जातात. पूर्वी या उत्सवादरम्यान भीमसेन जोशी, प्रभा अत्रे, अजित कडकडे, हृदयनाथ मंगेशकर आदी नामवंत गायकांनी येथे आपली कला सादर केली होती.

उपयुक्त माहिती:

  • मलकापूर बस स्थानकापासून १.६ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ४६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून मलकापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध

राजाओं का श्री राम मंदिर

मलकापुर, ताल. मलकापुर, जिला. बुलढाणा

Back To Home