मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या विष्णूच्या दहा अवतरांपैकी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम सातवा अवतार मानून त्याची पुजा केली जाते. परंतू श्रीराम स्वतः भगवान शंकराची नित्य पूजा करीत असत, असा उल्लेख अनेक ग्रंथांत आढळतो. त्यामुळेच अनेकदा राम मंदिरात शिवलिंग अथवा शिवमंदिरात राममूर्ती पहावयास मिळतात. असेच शिवपिंडी असलेले राम मंदिर आटपाडी तालुक्यातील करगणी गावात आहे. या मंदिरातील देव जागृत व नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराबाबत अख्यायिका अशी की श्रीराम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना येथे वास्तव्यास होते. त्याचवेळी या परिसरात रावणाची बहीण शूर्पणखा हिचा मुलगा शंबरी हा सूर्यदेवाकडून कालखड्ग हे दिव्य अस्त्र मिळविण्यासाठी तपश्चर्येला बसला होता. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने आकाशातून त्याच्यासाठी कालखड्ग हे अस्त्र पाठविले. त्याचेवळी लक्ष्मण या ठिकाणी फुले गोळा करण्यासाठी आला होता. त्याने आकाशातून येणारे हे दिव्यअस्त्र हाताने पकडले व त्याला किती धार आहे, हे पाहण्यासाठी ते शेजारीच असलेल्या बांबुच्या बेटावर चालवले.
लक्ष्मणाच्या या कृतीने बांबुचे बेट पूर्णपणे कापले गेलेच, पण त्यासोबत या बनात तपश्चर्या करीत असलेला शंबरीही मारला गेला. शंबरीचे शीर कापले गेल्याने येथे रक्ताचे पाट वाहू लागले. त्यामुळे आपल्या हातून कोणी तपस्वी ब्राह्मण मारला गेला, असे लक्ष्मणाला वाटले. त्याने या पापातून मुक्ती मिळावी म्हणून शंकराची आराधना केली. तेव्हा महादेव प्रकट होऊन लक्ष्मणाला म्हणाले की मरणारा निष्पाप जीव नसून तो शंबरी हा दुष्ट राक्षस होता. हे दिव्य शस्त्र त्याच्या हाती लागू नये म्हणून महादेवाने हा योग घडवून आणला होता. त्यानंतर तेथे शिवलिंग प्रकट झाले. येथील मंदिरात असलेले शिवलिंग तेच असल्याचे संगितले जाते. लक्ष्मणाच्या हाती लागलेल्या काळखड्ग शस्त्राच्या नावावरून गावाला खड्गनी नाव पडले व पुढे त्याचा अपभ्रंश होऊन करगणी झाले.
हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराभोवती सुमारे बारा फूट ऊंचीची दगडी तटबंदी आहे. तटबंदीत भव्य व भक्कम दुमजली मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभ, वर तुळई व त्यावर छत आहे. छतावर नगारखाना आहे. नगारखान्याच्या दर्शनी भिंतीत मोठे घड्याळ आहे. येथील लेखात ‘श्री राम प्रवेशद्वाराच्या जीर्णोद्धाराच्या खर्चाची रक्कम रु तीस हजार व सन १९५८’ असा उल्लेख आहे. प्रवेशद्वारात वर महिरपी कमान व त्यावर मध्यभागी कमळ फुलाची नक्षी आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या सात हस्तांपैकी मधल्या हस्तावर लहान झुंबर साकारले आहे. तुळईवर एक व प्रवेशद्वाराच्या मंडारकावर दोन कीर्तीमुख शिल्पे आहेत. प्रवेशद्वारात आतल्या दोन्ही बाजूस लाकडी झडपा असलेले पहारेकरी कक्ष आहेत. पहारेकरी कक्षातून मंदिराच्या नगारखान्याकडे जाण्यासाठी जीना आहे. नगारखान्यावर कौलारू छत आहे. पाहरेकरी कक्षाच्या भिंतीस लागून दोन वीरगळ आहेत. मंदिराच्या तटबंदीत डाव्या व उजव्या बाजूस आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. उजव्या बाजूच्या उंचावरील प्रवेशद्वारातून प्रांगणात येताना सात पायऱ्या उतरून यावे लागते. या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस स्तंभ व त्यावर सज्जा असलेली कमान आहे. येथे तटबंदीजवळ दोन समाध्या आहेत. समाधीच्या पाषाण भिंतीत खालील थरात उंट, हत्ती, घोडे, मोर, व्याल आदी पशू पक्षांची शिल्पे व वरच्या थरात मारुती व गणपती यांच्या मूर्ती आहेत. येथे समाधीजवळ काही वीरगळ आहेत.
मंदिराच्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणात मंदिराच्या बाजूला एका चौथऱ्यावर तुलसी वृंदावन आहे. या चौथऱ्याजवळ नागशीळा आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात दोन नक्षीदार स्तंभ आहेत. हे स्तंभ वर्तुळ, चौकोन, षट्कोन, अष्टकोन अशा विविध भौमितिक आकारात आहेत. त्यांच्या शीर्षभागी चौकोनी कणी व त्यावरील हस्तांवर तुळया आहेत. तुळयांवर छत आहे. मुखमंडपात भाविकांना बसण्यासाठी दगडी कक्षासनांची व्यवस्था आहे. मुखमंडपात स्तंभ, भिंती व छतावर विविध सुरसुंदरी व यक्षशिल्पे तसेच पानाफुलांच्या नक्षी आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. मंडारकावर चंद्रशीळा व दोन्ही बाजूस कीर्तीमुखे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभ व त्यावरील तुळईवरील तोरणात यक्ष व शिखर नक्षी आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या (गूढमंडप) सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभपाद स्तंभांपेक्षा अधिक रूंद आहेत. यातील एका स्तंभावर मयूरयुगुल तर दुसऱ्या स्तंभावर अष्टभुजा महिषासुरमर्दिनी यांची शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपातील जमिनीवर शिवपिंडी, कासव व त्याबाजुच्या चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याशिवाय डाव्या बाजूच्या देवकक्षात श्रीकृष्णाची व उजवीकडे श्रीदत्त यांच्या मूर्ती आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीच्या वरील बाजूस तोरणात मध्यभागी लक्ष्मी, सरस्वती व पार्वती देवी यांच्या मूर्ती आहेत. त्यासोबतच व्यालशिल्पे व कीर्तीमुख आहेत. मंडारकास मध्यभागी चंद्रशिला व दोन्ही बाजूस कीर्तीमुख आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पानाफुलांची नक्षी असलेले जाळीदार गवाक्ष आहेत.
अंतराळातील भिंतीवर विविध शिल्पे, भौमितिक आकृत्या व पानाफुलांची नक्षी आहे. छतावरील चौकोनात विविध आकारातील नक्षी व चारही बाजूंना झुंबर साकारलेले आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी, ललाटबिंबावर गणेश शिल्प व ललाटपट्टीवरील तोरणात विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. वज्रपिठावर डाव्या बाजूला शंकराची व उजव्या बाजूला मारूतीची मूर्ती आहे. सर्व मूर्ती उंची वस्त्रे व अलंकारांनी सुशोभित आहेत. वज्रपिठासमोर जमिनीवर शिवपिंडी, त्यावर छत्र धरलेला पितळी पंचफणी नाग व मुखवटा आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजूला सुरक्षा कठडा आहे. मुखमंडपाच्या छतावर मेघडंबरी व त्यावर घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. अंतराळाच्या छतावर आयताकार मेघडंबरी, त्यावर चारही कोनांवर चार लघू शिखरे, आमलक व त्यावर कळस आहेत. मध्यभागी घुमटाकार शिखर व त्यावरील आमलकावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर बारा थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरात खालच्या दोन थरात तिनही बाजस देवकोष्टके व त्यावरील शिखरावर कळस आहेत. शिखराच्या प्रत्येक थरात २४ उठाव शिल्पे व नक्षी आहेत. शिखराच्या चारही भिंतीवर मधल्या पट्टयात खालपासून वरपर्यंत नक्षीपट आहेत. शिखराच्या शीर्षभागी चारही कोनांवर चार उपशिखरे, त्यावर कळस व मध्यभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर कळस आहे. मंदिराच्या छतावरील कठडा व शिखर १९७५ साली बांधण्यात आलेले आहेत.
मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यबाजूस देवकोष्टके आहेत. मंदिराच्या भोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गाजवळ प्राचीन पाषाणपात्र आहे. याशिवाय प्रांगणातील औदुंबाराच्या पाराजवळ नागशिला आहेत. महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक जत्रोत्सव येथे साजरा केला जातो. यात्रेनिमित्त खिल्लार बैलांचा मोठा बाजार येथे भरतो. येथे श्रीराम जयंती उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. यावेळी कुस्त्यांचे जंगी सामने आयोजीत केले जातात. संपूर्ण जिल्ह्यातील अनेक कुस्तीगीर व पेहलवान या सामन्यात भाग घेतात. मंदिरात मकरसंक्रांतीच्या दिवशी वाण घेऊन येणाऱ्या महिलांची प्रचंड गर्दी होऊन परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. श्रावण महिन्यात आठ दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत केला जातो. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.