गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या नांदेड शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. शीख धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या या शहरात अनेक प्राचीन हिंदू मंदिरे देखील आहेत. यात शहरातील होळी परिसरात असलेल्या सरदेशपांडे यांच्या सुमारे ४०० वर्षे जुन्या वाड्यातील श्रीराम मंदिराचे स्थान प्रसिद्ध आहे. शहराच्या गजबजलेल्या भागात असूनही या मंदिरात शांतता व प्रसन्नतेची अनुभूती येते. या मंदिरातील श्रीरामाचे स्थान हे अतिशय जागृत असून येथील देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की येथील जुन्या वाड्यात अठराव्या शतकात हे मंदिर बांधले गेले. सुमारे पंधराव्या शतकापासून नांदेड येथील सरदेशपांडे यांच्या घराण्यात रामाची सेवा सुरू होती. पुढे मुकुंदराव सरदेशपांडे यांना श्रीरामाने दृष्टांत देऊन, आपण गोदावरी नदीत असल्याचे सांगून तेथून बाहेर काढावे, असा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी गोदावरीत शोध घेतला असता, त्यांना रामाची मूर्ती सापडली. परंतु ती मूर्ती भंगलेली असल्याने त्यांनी त्यामूर्तीसारखीच दुसरी मूर्ती घडवून घेतली व येथे तिची स्थापन केली. तेव्हापासून हे मंदिर नांदेड शहर व जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
प्राचीन बांधणीच्या या वाड्यास असलेल्या भक्कम तटबंदीत मंदिराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वारास लाकडी द्वारशाखा व मजबूत झडपा आहेत. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर अरुंद पायवाटेच्या दोन्ही बाजूला वाड्यातील कक्षांच्या मागील भिंती आहेत. पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देखील दीपकोष्ठके आहेत. या प्रवेशद्वारालाही लाकडी द्वारशाखा व झडपा आहेत. येथून काही पावलांवर मंदिराचा सभामंडप आहे. सभामंडपात प्रवेशद्वार सोडून सभोवार चौथरे आहेत. चौथऱ्यावर समोरील बाजूस लाकडी स्तंभ आहेत. स्तंभांचा खालील भाग चौकोनी आणि वरील भागावर षटकोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यांवर महिरपी कमानी आहेत. कमानीवर वरील मजल्याचा सज्जा आहे. सभामंडपात डावीकडे लहान गर्भगृह आहे. येथील वज्रपीठावर दास हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपातील देवकोष्टकांत सरदेशपांडे यांच्या पूर्वजांच्या तसबिरी आहेत.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चौथऱ्यापुढे मुख्य गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास उभ्या धारेची नक्षी असलेल्या लाकडी द्वारशाखा व स्तंभशाखा आहेत. त्यांवर महिरप व पुष्पनक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, जानकी व मारूती यांच्या पाषाणी व पितळी मूर्ती आहेत. वज्रपीठावर इतर काही देवतांच्या धातूच्या मूर्ती व मुखवटे देखील आहेत. वज्रपीठाच्या दोन्ही बाजूस दोन नक्षीदार स्तंभ असून त्यांवर महिरपी कमान आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावरील भिंतींत दीपकोष्ठके आहेत.
मंदिरात चैत्र पाडवा ते राम नवमी हा नऊ दिवसांचा श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसांत मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नवमीला मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना कैरीच्या पन्ह्याचे तीर्थ देण्यात येते. महाप्रसादात भाविकांना खिचडी आणि कैरीचे लोणचे देण्यात येते. यासाठी सरदेशपांडे घरातील सर्व सदस्य आठ दिवस आधीपासून स्वयंपाकाच्या व उत्सवाच्या तयारीला लागतात. यावेळी परिसरातील शेकडो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.
मंदिरात चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्मोत्सव, कार्तिक पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दर मंगळवारी, शनिवारी व गुरुवारी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.