श्रीबालाजी मंदिर / व्यंकटगिरी पर्वत,

राजूरघाट, ता. मोताळा, जि. बुलडाणा

अजिंठा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावर, निसर्गरम्य परिसरात श्रीबालाजींचे सुंदर मंदिर साकारले आहे. साडेसोळा एकरच्या विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या देखण्या मंदिरात तिरुमला येथील मुख्य मंदिरातील बालाजींच्या मूर्तीच्या प्रतिकृतीचे दर्शन होते. पल्लव शैलीतून विकसित झालेल्या चौल स्थापत्य शैलीत उभारण्यात आलेले हे मंदिर हजारो भाविक तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे होणाऱ्या चार दिवसीय ब्रह्मोत्सवादरम्यान श्रीबालाजींचा श्रीपद्मावती व श्रीमहालक्ष्मी यांच्याशी होणाऱ्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक येथे उपस्थित असतात.

बुलडाणा-मलकापूर महामार्गावरील राजूर घाटाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. परिसरातील नदी, नाले तसेच लहान-मोठ्या डोंगरांमुळे येथील निसर्गसौंदर्यात भर पडते. पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेल्या या घाटातून बुलडाण्याकडून मलकापूरकडे जाताना व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर दिसते. बुलडाण्यातील उद्योजक अरुण दिवटे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आले आहे. बालाजीचे परम भक्त असलेले दिवटे दर्शनासाठी नियमितपणे तिरुपती येथे जात असत. बुलडाण्यातही बालाजींचे मंदिर असावे, ही कल्पना त्यांच्या मनात आली आणि ती त्यांनी आपल्या मित्रांना बोलून दाखवली. त्यांनीही ही संकल्पना उचलून धरल्यानंतर हे मंदिर उभारण्यासाठी ‘श्री बालाजी सेवा समिती’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर या मित्रांनी निधी उभारून व्यंकटगिरी पर्वतावर साडेसोळा एकर जमीन विकत घेतली व ती जमीन बालाजी सेवा समितीला दान करण्यात आली. १६ फेब्रुवारी २००४ रोजी कांची कामकोठी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. चेन्नईचे वास्तुशिल्पकार पी. आर. राजन यांच्या मार्गदर्शनाखाली २० शिल्पकार व असंख्य कामगारांनी सुमारे ६ वर्षे अथक परिश्रम करून ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत हे भव्य मंदिर उभारले. ९ ते १२ डिसेंबर २०१० या कालावधीत कांची कामकोठी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यास इंदूरच्या सिद्धकुटी येथील प.पू. लोकेशानंदजी महाराज देखील उपस्थित होते. मंदिराला ४५६ चौरस फुटांचे गर्भगृह आणि ५१ फूट उंचीचे गोपुरम आहे.

मंदिराच्या कमानीतून आत आल्यावर काही अंतरावर वाहनतळाची सुविधा आहे. परिसरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. काही अंतरावर एका चौथऱ्यावर हनुमानाच्या २१ फूट उंचीच्या मूर्तीचे दर्शन होते. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मोठी घंटा टांगलेली आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत आहे आणि येथील देवकोष्टकांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर शिखर आहे. सुबक कोरीव काम असलेल्या या शिखरावर अनेक मूर्तीही कोरलेल्या आहेत. लाकडी प्रवेशद्वारावरही सुंदर कलाकुसर आहे आणि त्यावर देव-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला ३५ फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या स्तंभाला आलिंगन देण्याची पद्धत आहे. या स्तंभासमोरील देवळीत श्रीविष्णूंचे वाहन असलेले गरुडदेव विराजमान आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात श्रीराम, श्रीविष्णू आणि कल्की यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात भाविकांच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे आहेत, तर वरच्या भागात शेषशायी विष्णू व श्रीलक्ष्मीची प्रतिमा आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणात घडवलेली सुंदर मूर्ती आहे. तिरुमला येथील बालाजींच्या मूर्तीची ही प्रतिकृती आहे. मूर्तीच्या मस्तकावर सुंदर मुकुट, कपाळावर पच्चकर्पुराचा मोठा शुभ्र तिलक (नामम्) आहे. मूर्तीच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र, डाव्या हातात शंख, खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे, तर खालचा डावा हात कमरेवर विसावलेला आहे. या मूर्तीजवळ श्रीलक्ष्मी आणि श्री पद्मावतींच्या धातूच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भोवताली असलेल्या आडव्या मंडपातील भिंतींवर श्रीबालाजींच्या जीवनचरित्रातील काही प्रसंग कोरलेले आहेत. येथे श्रीगणेश, श्रीलक्ष्मी, श्रीपद्मावती तसेच वराहस्वामींची छोटी मंदिरे आहेत.

हे मंदिर सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत दर्शनासाठी खुले असते. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी येथे ब्रह्मोत्सव होतो. त्यानिमित्त येथे चार दिवसांचा सोहळा होतो. पहिल्या दिवशी होमकुंडात दाक्षिणात्य पद्धतीने होम-हवन झाल्यावर बालाजींच्या मूर्तीची पूजा करण्यात येते. दुसऱ्या दिवशी गणेश व वराहस्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करण्यात येतो. नंतर पूजा झाल्यावर त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या दिवशीही होम-हवन करण्यात येते. तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी आणि पद्मावतीच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करण्यात येतो. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास श्रीबालाजी, श्रीपद्मावती आणि श्रीलक्ष्मींच्या उत्सवमूर्ती मंदिरातून बाहेर काढण्यात येतात. पालखीतून या मूर्तींची परिसरात मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने श्रीबालाजी, श्री पद्मावती आणि श्री महालक्ष्मी यांचा विवाह सोहळा पार पडतो. या सोहळ्यानंतर विवाहानिमित्त महाप्रसादाची पंगत लागते. चौथ्या दिवशी श्रीबालाजींवर १०८ जोडप्यांद्वारे १०८ कलशांतून अभिषेक करण्यात येतो. या दिवशीही भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. ब्रह्मोत्सवादरम्यान मंदिर परिसरात प्रवचन, काल्याचे कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • मोताळा येथून १८ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५ किमी अंतरावर
  • मोताळा व बुलडाणा येथून राजूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२२८८१७७३, ९९६००६९६१९

श्री बालाजी मंदिर/वेंकटगिरी पर्वत,

राजुरघाट, ताल। मोटाला, जिला. बुलढाणा

Back To Home