शिवचंद्र मोळीश्वर संस्थान

मोळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

वनवासादरम्यान दंडकारण्यातून भ्रमण करताना श्रीरामांनी अनेक ठिकाणी शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली होती. त्यांपैकी एक शिवलिंग मेहकर तालुक्यातील मोळी या गावात आहे. शिवचंद्र मोळीश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्राचीन शिवालयातील शिवलिंग जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच, पंचक्रोशीतील असंख्य भाविक या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यासाठी व अभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या दिवशी मंदिरात संपन्न होणारा शिव-पार्वती विवाहसोहळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो.

पुराणांतील कथेनुसार, वनवासाच्या काळात श्रीरामांनी सुमारे दहा वर्षे दंडकारण्यात व्यतीत केली. मेहकर तालुका हा पूर्वी दंडकारण्याचाच एक भाग होता. सध्याच्या अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेनजीक विश्वी (ता. मेहकर) हे गाव वसलेले आहे. त्रेतायुगात विश्वामित्र ऋषींनी या गावात शिवलिंगाची स्थापना करून अनेक वर्षे तपश्चर्या केली. एकदा त्यांनी तेथे यज्ञ आयोजित केला असता परिसरातील दैत्यांनी या यज्ञात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. विश्वामित्र ऋषींच्या विनंतीवरून, त्या वेळी दंडकारण्यात वास्तव्यास असलेल्या श्रीराम आणि लक्ष्मण यांनी विश्वी येथे येऊन त्या दैत्यांचा संहार केला. त्यानंतर ते सध्याच्या मोळी या गावात आले. ही भूमी ऋषी-मुनींची तपोभूमी होती; येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. श्रीराम हे शिवशंकरांचे परमभक्त होते. शिवशंकरांची पूजा केल्याशिवाय ते दिनचर्येला सुरुवात करत नसत. त्यामुळेच त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली. येथील वास्तव्यानंतर ते लोणारकडे मार्गस्थ झाल्याची आख्यायिका आहे.

कालौघात येथे छोटे शिवमंदिर उभारण्यात आले आणि या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धारही झाला. काही वर्षांपूर्वी मोळी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा कायापालट केला. २०१८ मध्ये ग्रामस्थांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना केली. नवे भव्य मंदिर उभारण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदानही केले. राज्य सरकारने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेहकरपासून मोळी हे गाव सुमारे १३ किमी अंतरावर आहे. मंदिराला विस्तीर्ण परिसर लाभला आहे. ग्रामस्थांनी मंदिरासमोरच काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे सुबक दगडी दीपमाळ आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तसेच मंदिराच्या मागील बाजूला विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. भाविकांना बसण्यासाठी येथे बाकांची सुविधा आहे. मंदिरासमोरील नंदीमंडपात उंच वज्रपीठावर शिवाचे वाहन असलेल्या नंदीची मोठी पाषाणी मूर्ती विराजमान आहे. नजीकच असलेल्या वटवृक्षाखाली काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. भाविकांकडून त्यांचीही श्रद्धेने पूजा केली जाते. जवळच धुनी प्रज्वलित असते.

अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. उत्सवकाळात भाविकांच्या रांगेचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे. सभामंडपातील देवकोष्ठकांत विठ्ठल-रखुमाई व संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. सभामंडपात गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन दरवाजे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. या पिंडीच्या शाळुंकेवर पितळी पत्र्याचे आवरण व लिंगावर मुखवटा आहे. या मुखवट्याच्या मस्तकावर चंद्रकोर आणि गंगा आहे. पिंडीवर नागाने आपल्या फण्याने छत्र धरलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहावर वरच्या दिशेने निमुळते होत जाणारे उंच शिखर आहे. शिखरावरील देवकोष्ठकांमध्ये ऋषी-मुनींच्या मूर्ती आहेत. वरच्या बाजूस द्विस्तरीय आमलक व कळस आहेत.

मंदिर परिसरात असलेल्या सुसज्ज मंडपात उत्सवप्रसंगी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता व सायंकाळी सात वाजता आरती केली जाते. सायंकाळच्या आरतीपूर्वी हरिपाठाचे पठण होते. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव आहे. या उत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होतात. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. महाशिवरात्रीला गावातून शिवशंकरांची पालखीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. सायंकाळी मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने शिव-पार्वती विवाहसोहळा पार पडतो. या दिवशी संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. मंदिर परिसरात पूजा-प्रसाद तसेच विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने सजतात. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेली मंडळी या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. रामनवमीनिमित्त मंदिरातून शेगाव येथे पायी दिंडीचे प्रस्थान होते. श्रावण महिन्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सुमारे अडीच हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी गावातील तरुण मंडळी कावडीने जल आणून शिवलिंगावर जलाभिषेक करतात.

उपयुक्त माहिती:

  • मेहकर येथून १२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८२ किमी अंतरावर
  • मेहकर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

शिवचंद्र मौलीश्वर संस्थान

मोली, ताल. मेहकर, जिला. बुलढाणा

Back To Home