हिंदू धर्मात ग्रामसंस्कृती उदयास आल्यापासून वेशीवरचे अथवा शिवेवरचे देव व देवता अस्तित्वात आहेत. अशी मान्यता आहे की शेंदूरचर्चित, तसेच अकार–उकारविरहित हा देव बाह्य शक्तींपासून गावाचे रक्षण करतो. हे ग्रामदैवत गावकऱ्यांच्या पीक–पाण्याचे व गुराढोरांचे रक्षण करते. तसेच गावाचे वाईट शक्ती व रोगराईपासून बचाव करण्याचे कार्यही हे देव करतात. शिवेवर शक्यतो देवी किंवा हनुमानाचे मंदिर असते. परंतु, नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावाच्या शिवेवर मात्र स्वयंभू गणेश मंदिर आहे. येथील जागृत गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की कंधार गावात साधू महाराज नावाचे एक सिद्ध पुरुष होते. ते नेहमी गणेशभक्तीत लीन असत. एके दिवशी साधू महाराजांच्या स्वप्नात गणपती आले. आपण गावाच्या शिवेवर मनकर्णिका नदीच्या तीरावर मुंग्यांच्या वारुळाखाली आहोत, तरी आपल्याला तेथून बाहेर काढावे, असा दृष्टांत त्यांनी दिला. साधू महाराज आपले शिष्यगण व लवाजमा घेऊन नदीच्या तीरावर आले. दृष्टांतात मिळालेल्या संकेतानुसार नदीतीरावरील घनदाट झाडीत असलेले वारूळ त्यांनी शोधून काढले. तेव्हा तिथे त्यांना वारुळाखाली स्वयंभू गणेश मूर्ती पालथी पडली असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या शिष्यगणांना मूर्ती उभी करण्यास सांगितले व स्वतः ध्यानस्थ बसले. सुमारे शंभर शिष्य व तेवढेच गावकरी यांनी जवळपास चार तास प्रयत्न करूनही मूर्ती जागेवरून हलली नाही. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी साधू महाराजांना आपणच काहीतरी उपाय करण्याची विनंती केली.
शिष्य व गावकऱ्यांच्या विनंतीनुसार महाराजांनी मूर्तीला स्पर्श करताच मूर्ती आपोआप सरळ झाली. मग महाराजांनी याच ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. पुढे गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिर बांधले. ही आख्यायिका “साधू सुधा” या साधू महाराजांच्या चरित्रग्रंथात आढळते.
ही मूर्ती सुमारे आठशे वर्षे प्राचीन आहे. ती मूलतः कंधार शिलालेखात उल्लेख केलेल्या ‘मंडल सिद्धिविनायक’ या मंदिरातील असावी, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करतात. याच मंडल सिद्धिविनायक मंदिरास राष्ट्रकूट राजांनी दिलेल्या दानांची नोंद काही शिलालेखांत आढळते. पुढे कालांतराने ही मूर्ती मातीखाली गाडली गेली असावी. हल्ली या गणपतीस ‘साधू महाराजांचा गणपती’ या नावानेही संबोधले जाते. या परिसरात राष्ट्रकूटकालीन मंदिरांचे अनेक अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आहेत, तर काही अवशेष कंधार किल्ल्याच्या परिसरात आढळतात.
गावाच्या शिवेवर मुख्य रस्त्यालगत नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. मंदिराभोवती सिमेंटच्या स्तंभिका व त्यात स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावून तटबंदी तयार करण्यात आली आहे. तटबंदीत स्वागतकमान आहे.
या स्वागतकमानीत दोन्ही बाजूला दोन चौथरे आहेत. या दोन्ही चौथऱ्यांवर प्रत्येकी दोन स्तंभ आहेत. स्तंभांवर आडवा सज्जा आहे, ज्याच्या मध्यभागी असलेल्या देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. देवकोष्ठकाच्या दोन्ही बाजूस शुभचिन्हांकित बाशिंगे व लघूशिखरे आहेत. स्वागतकमानीपासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या पायवाटेवर व प्रांगणात तटबंदीला लागून भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत.
मंदिराची रचना साधी असून त्यात फक्त गर्भगृह आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. गर्भगृहात सभोवती कठडा आहे. कठड्यात स्तंभ आहेत, ज्यावर तुळई व त्यावर छत आहे. छताला पितळी घंटा व काचेचे रोषणाईयुक्त झुंबर टांगलेले आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहेत. स्तंभांवर पानफुलांची नक्षी आहे. कठडा व छत यांच्या दरम्यान लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. मंदिरात मध्यभागी जमिनीवर गणेशाची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. शेंदूरचर्चित ही मूर्ती नैसर्गिक स्वरूपात आहे, मूर्ती सुमारे साडेपाच फूट उंच व साडेचार फूट रुंद आहे. गणेश मूर्तीच्या बाजूला पायाजवळ गणपतीचे वाहन असलेली मूषक मूर्ती आहे.
मंदिराच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखराच्या खालील पहिल्या अष्टकोनी थरात आठ देवकोष्ठके आहेत, ज्यात अष्टविनायक शिल्पे आहेत. शिखराचा दुसरा थर गोलाकार व निमुळता असून त्यावर स्तंभनक्षी आहेत. कमलदलमंडळाने शिखराचे दोन्ही थर विभागले आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत, ज्यावर कळस व ध्वजपताका आहे.
श्रीगणेश जयंती व भाद्रपद मासातील दहा दिवसांचा पार्थिव गणेशोत्सव हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीस मंदिरात जत्रा भरते. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवास मिष्टान्न व मोदक अर्पण केले जातात. उत्सवाच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.