शिव मंदिर

चैतन्य नगर, नांदेड, ता. जि. नांदेड

महादेव हे शिवतत्त्व असून ते पंचतत्वांची अधिष्ठात्री देवता आहेत. शंकर हे कल्याणकारी असून भक्तांशी एकरूप होणारे दैवत आहे. महादेव ज्योतिर्लिंग स्वरूप असल्यामुळे ते विश्वरूप आहेत. देशात महादेवाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे ही शिवपिंडीच्या आकाराची आहेत. उज्जैन येथील श्री रणकेश्वर धाम, वाराणसी येथील बनखंडी महादेव मंदिर आणि खजुराहो येथील मातंगेश्वर मंदिर ही शिवपिंडीच्या आकाराची प्रसिद्ध मंदिरे आहेत. याच मालिकेतील एक शिवपिंडीच्या आकाराचे प्रसिद्ध मंदिर नांदेड मधील चैतन्य नगर येथे आहे. येथील हे जागृत देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिराचे बांधकाम व स्थापत्यशैली आधुनिक पद्धतीची असली तरी येथील शिवपिंडी प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की, पूर्वी गावाबाहेर व झाडाझुडपांनी वेढलेल्या या ठिकाणी महादेवाचे एक परम भक्त रोज ध्यानस्थ मुद्रेत महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन जात. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने भक्तास वर मागायला सांगितले. भक्ताने देवाला आपण कायमस्वरूपी येथेच स्थापित व्हावे, अशी विनंती केली. भक्ताच्या विनवणीनुसार महादेव शिवपिंडी रुपात येथे स्थापित झाले.

विमानतळ रस्त्यावर असलेल्या या मंदिराला आधुनिक पद्धतीची भक्कम तटबंदी आहे. तटबंदीच्या बाह्य बाजूला बसण्यासाठी आसने आहेत. तटबंदीत प्रवेशद्वार असून त्याजवळ पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात डावीकडे गणपती, सरस्वती, नागोबा, विठ्ठल-रखुमाई व हनुमान यांची एकमेकांशेजारी पाच लहान मंदिरे आहेत. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या या मंदिरांना दोन पायऱ्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर महिरपी कमानी व प्रवेशद्वारास काचेच्या झडपा (दारे) आहेत. मंदिरात वज्रपीठावर देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरांच्या छतावर गोलाकार शिखरे आणि त्यावर आमलक व कळस आहेत.

या मंदिरांच्या शेजारी प्रांगणात काचबंद दालनात महादेवाचे ध्यानस्थ मुद्रेतील मोठे चित्र व समोर शिवपिंडी आहे. प्रांगणात ध्वजस्तंभ व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिराच्या शेजारी अन्नछत्र, प्रसादालय व सभागृहाची इमारत आहे. मुख्य मंदिरासमोर एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेल्या सहा चौकोनी स्तंभांवर छत असलेला अर्धखुल्या स्वरूपाचा नंदीमंडप आहे. या मंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. नंदीमंडपाच्या छतावर नंदीचे भव्य शिल्प आहे. नंदी मंडपाची ही रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

पुढे महादेवाचे मुख्य मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या या मंदिरास पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत. आयताकार सभामंडपात दोन्ही भिंतींलगत भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. बंदिस्त स्वरुपाच्या सभामंडपात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

पुढे गोलाकार गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील लिंग पाषाणावर महादेवाचा पितळी मुखवटा व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरण्यासाठी तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. शिवपिंडीच्या बाजूला पितळी त्रिशूल व डमरू आहे. गर्भगृहात हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी उजवीकडे एक दरवाजा आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर शिवलिंगाच्या आकाराचे शिखर आहे. त्याच्या बाजूला मंदिराच्या छतावर सुमारे दहा फूट उंच पितळी त्रिशूल व डमरू आहे.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी महादेवास लघुरुद्र अभिषेक करून दिवसाची सुरुवात होते. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर भाविकांची गर्दी असते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. मंदिर विमानतळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असल्याने या गजबजलेल्या परिसरात येणारे भाविक देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात.

उपयुक्त माहिती:

  • नांदेड बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • नांदेड रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : विश्वस्त मंडळ, मो. ८७८८३२११४९, ९४२२१८९५७५

शिव मंदिर

चैतन्य नगर, नांदेड़, ता. जिला. नांदेड़

Back To Home